कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा.
काही वर्षांपूर्वी सध्याच्या युगाला जाहिरातीचे युग म्हणून संबोधले जायचे, आता परिस्थिती बदलली आहे. किमान भारतापुरती तरी नक्कीच बदलली आहे. आता हे युग माफियांचे युग म्हणून ओळखले जात आहे. कोणत्याही शब्दापुढे ’माफिया’ जोडले तरी तो शब्द अर्थपूर्ण होईल, याची खात्री आहे. वाळू माफिया, तेल माफिया, बांधकाम माफिया, दूध माफिया, शिक्षण माफिया, कोणताही शब्द जोडा ती जमात हजर होईल. लोकांना जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे ,त्या त्या गोष्टींवर आता माफियांचे वर्चस्व आहे. हे माफिया तयार होतात कसे, त्यांची ताकद कशी वाढते, त्यांच्या पाठीशी कोण असतात, ही सगळी उघड गुपीते आहेत, सगळ्यांना सगळे ठाऊक असते; परंतु कुणी बोलायला तयार नसतात, कारण एकच या लोकांची ताकद इतकी प्रचंड असते की प्रसंगी ही मंडळी सरकारलादेखील वेठीस धरू शकतात. बरेचदा तर सरकारमधील मंडळीच पडद्याआडून माफियागिरी करीत असतात. नगर जिल्ह्यातील दूध भ्रष्टाचार प्रकरणाने ही बाब अधोरेखित केलेली आहेच. दूध भेसळीचा प्रचंड मोठा धंदा या जिल्ह्यातून निर्वेधपणे सुरू होता; परंतु एका सजग पोलिस अधिकार्याच्या कर्तव्यनिष्ठेने हा गोरखधंदा उघडकीस आला आणि काही काळापुरता का होईना, या धंद्याला चाप बसला; परंतु ही या माफियांची तात्पुरती माघार होती. काही काळाने त्यांचा हा धंदा पुन्हा तेवढ्याच जोमाने सुरू होणार, कारण त्यात कुणी एक व्यक्ती गुंतलेला नाही. अगदी खालपासून वरपर्यंत एक मोठी साखळी त्यात आहे आणि त्या साखळीतील काही मोहरे इतके मोठे आहेत की त्यांच्यापर्यंत पोलिसांचे हात पोहचूच शकत नाही, कुणी तशी हिंमत करतो म्हटले तर त्याची एका रात्रीतून गडचिरोलीच्या जंगलात बदली होईल. सांगायचे तात्पर्य की इथे प्रत्येकच क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आहे. तो भ्रष्टाचार करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे माफिया आहेत.
या लोकांची एक समांतर व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेला छेद देण्याची ताकद इथल्या पोलिस किंवा प्रशासनात नाही. एक साधा प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्या प्रचंड वाढत असताना आणि दूध देणार्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना दुधाचे उत्पादन मात्र वाढत आहे, ते गणिती शास्त्राच्या कोणत्या नियमाने? ज्या जनावरांपासून दूध मिळते त्या जनावरांची संख्या कमी झाली तर स्वाभाविकच दुधाचे उत्पादनही कमी व्हायला हवे; परंतु तसे होताना दिसत नाही.
एकीकडे गोधन प्रचंड प्रमाणात कमी होत आहे आणि दुसरीकडे राज्यात दुधाचा महापूर येत आहे. सरकारची आकडेवारीच सांगते की स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात गोधनाची संख्या ८० कोटी होती. त्यावेळची लोकसंख्या विचारात घेतली तर एका माणसामागे दोन जनावरे असे प्रमाण होते. १९९३ मध्ये लोकसंख्या ८० कोटींवर गेली आणि गोधन ४० कोटींवर आले, म्हणजे हेच प्रमाण दोन माणसामागे एक जनावर असे उलट झाले. २०११ मध्ये तर परिस्थिती अधिकच खालावली आहे. आता लोकसंख्या १२० कोटींवर पोहचली आणि जनावरांची संख्या १२ कोटींवर आली आहे. म्हणजेच दहा माणसांमागे एक जनावर असे प्रमाण झाले. अधिक आश्चर्याची बाब म्हणजे पूर्वीच्या तुलनेत दैनंदिन जीवनात दुधाचा वापर करणार्यांची संख्या प्रचंड वाढली, प्रतिमाणशी दुधाचा वापर वाढला तरीदेखील लोकांना पुरेशा प्रमाणात दूध उपलब्ध होत आहे. हे दूध येते कुठून? शेत जमिनीच्या बाबतीत असे म्हणता येईल की आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीखालील जमिनीचे प्रमाण कमी झाले तरी शेतीचे उत्पादन वाढले; परंतु दुधाच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. दूध देण्याची जनावरांची क्षमता मर्यादीत असते, उलट दुधाळ जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट येत आहे. देशातील गोधन प्रचंड वेगाने कमी होत आहे. मोगल व इंग्रज येण्यापूर्वी आमच्या देशात गाईची हत्या करणार्याला मृत्युदंड मिळायचा, मात्र इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला तेव्हा या देशात ३०० कत्तलखाने होते, आता त्यांची संख्या ३०००० झाली आहे आणि हे कत्तलखाने आता अधिक आधुनिकदेखील झाले आहेत. पूर्वी मुंबईच्या देवनार कत्तलखान्यात रोज सरासरी चार हजार जनावरांची कत्तल व्हायची, मात्र आता सेनेचा भगवा ज्या मुंबई महानगरपालिकेवर फडकतोय ती महानगरपालिका तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून लवकरच त्याचे आधुनिकरण करणार आहे. त्यानंत रोज बारा हजार जनावरे तेथे कापली जातील. हैदराबादच्या कत्तलखान्यातही दररोज हजारो जनावरांची कत्तल होते. इतक्या मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल होत असताना दुसरीकडे दुधाचे उत्पादन मात्र आश्चर्यकारकरित्या वाढताना दिसत आहे. काही जनावरांचा संकर वगैरे करून दूध उत्पादन वाढविले जात असले तरी एकूण दुधाचे उत्पादन आणि दुधाळ जनावरांची संख्या यांचे प्रमाण लक्षात घेता कुठेतरी प्रचंड फसवेगिरी होत आहे, हे सहजच लक्षात येते. ही फसवेगिरी भेसळीच्या माध्यमातून होत आहे. दुधामध्ये प्रचंड प्रमाणात भेसळ केली जाते. नगर जिल्ह्यात पोलिसांनी जेव्हा बड्या राजकीय धेंडांच्या दूध संघावर छापे घातले, तेव्हा अशा भेसळीच्या अनेक सुरस कथा समोर आल्या. बाजारात साधारण बारा रुपये लिटर या भावाने मिळणार्या एका विशिष्ट रसायनापासून तब्बल दहा ते बारा लिटर दूध तयार केले जात असल्याचे दिसून आले. केवळ या नकली रासायनिक दुधाचीच विक्री होत नव्हती तर दुधापासून मावा वगैरे इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करून विकल्या जायचे. यात अर्थातच प्रचंड कमाई व्हायची किंवा होत आहे. ही भेसळ शोधून काढण्यासाठी नगर जिल्ह्यात पोलिसांनी छापे टाकायला सुरुवात केल्यानंतर या जिल्ह्याचे दूध संकलन एकदम पंचविस टक्क्यांवर आले. राजकीय धेंडांच्या या दूध संघात पूर्वी दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाचे संकलन व्हायचे; परंतु पोलिसांनी भेसळयुक्त दूध शोधायला सुरुवात केली आणि दूध संकलनाचा आकडा ४० ते ५० हजार लिटरवर उतरला. तिकडच्या नेत्यांची, माफियांची समृद्धी या अशा भेसळीतूनच फुलत गेली आहे. वर म्हटल्याप्रमाणे ही माफियागिरी मोडून काढण्याची ताकद इथल्या व्यवस्थेमध्ये नाही, कारण ही व्यवस्थाच त्या माफिया साम्राज्याची गुलाम आहे. अण्णा हजारे तिकडे दिल्लीत लोकपाल विधेयक संमत करून घेण्याचा प्रयत्न करीत आ ेत. त्यांच्यासोबत किरण बेदी वगैरेंसारखे लोक आहेत, कदाचित त्यांच्या नैतिक दबावामुळे हे विधेयक संमत होईलही; परंतु अशा कोणत्याही कायद्याने इथल्या भ्रष्टाचाराला आळा बसण्याची शक्यता नाही. केवळ कायदा होणे किंवा असणे महत्त्वाचे नाही, तो कितपत प्रामाणिकपणे राबविला जातो, हे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे आणि त्यादृष्टीने विचार केला तर अशा कायद्यांमुळे फार काही फरक पडेल असे वाटत नाही. आधीपासून अनेक कायदे असूनही प्रत्येक क्षेत्रात माफियांचा सुळसुळाट झालेला आहेच ना? कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा. तसेही दूध हे काही आपले नैसर्गिक अन्न नाही. दूध आपल्या आहाराचा अविभाज्य भाग नाही. त्या त्या जनावराचे दूध त्या त्या जनावराच्या वासरांसाठी तयार झालेले असते, ते दूध त्यांनाच पचू शकते, त्यांच्याचसाठी पौष्टिक ठरू शकते. दूध आपल्या पोटात गेल्यावर ते पोटातील आम्लधर्मी घटकांमुळे तसेच खाल्लेल्या अन्नातील मिठामुळे तत्काळ फाटते आणि त्यानंतर ते पचविण्यासाठी आपल्या पचन संस्थेला अतिरिक्त ताकद खर्च करावी लागते. दुधाचे पचन करताना आपल्या किडनीवरही ताण येतो आणि त्यात ते दूध रासायनिक, भेसळयुक्त असेल तर आपल्या शरीराची केवळ नासाडीच होते. लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे. विषयुक्त दूध प्राशन करून दूध माफियांची तिजोरी भरण्यापेक्षा या दुधालाच आपल्या आहारातून हद्दपार करणे कधीही अधिक हिताचे ठरणार आहे.
प्रकाश पोहरे,
मुख्य संपादक,
दै. देशोन्नती.
प्रकाशित दिनांक ः २७ मार्च २०११
— प्रकाश पोहरे
Leave a Reply