पाकिस्तानमधील परिस्थिती पाहुण्या खेळाडूंनी जिवंतपणे परत घरी पोहचण्यासारखी नसल्याने पाकिस्तानमध्ये खेळायला आजकाल कोणताही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्रयस्थ भूमीवर सामने खेळविणे हा त्यावरील एक उपाय होता पण त्रयस्थ ठिकाणे ही निकाल-निश्चितीची निश्चित सुविधा असलेली ठिकाणे बनलेली आहेत. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शारजामधील कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे ती या कारणामुळेच. (ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. आठवा. शारजात आपण शेवटचे कधी खेळलो?)
पाकिस्तानी क्रिकेटच्या भल्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या घरी त्यांच्याविरुद्ध मालिका खेळण्याचे मान्य केले. हा कार्यक्रम काहीसा शरद पवारांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठीही होता. पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारत राजी नाही आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आंक्रिप) उपाध्यक्ष होऊ न शकण्यामध्ये पवारांचा – पर्यायाने भारतीयांचा – हात आहे ही सांगीवांगीची गोष्ट तथाकथित गोर्यांना कशी खपणार? भावना कोणती का असेना आम्हाला उभे करण्याचा प्रयत्न करत असणार्यांच्याही डोक्यावर आम्ही मिर्या वाटणारच आणि स्वत:च्याच कमरेखालच्या वस्त्राच्या निर्या सोडून दाखविणारच ही वृत्ती इंग्लंडच्या दौर्यावरील अर्ध्याहून अधिक संघाने दाखवून दिलेली आहे.
सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणाने क्रिकेटमधील पैजेच्या पैशांची भूमिका पुन्हा एकदा उघड केली आहे.
कसोटी क्रिकेटच्या अगदी प्रारंभकाळी सामन्यावरील पैजांना अधिकृत मान्यता होती. सामन्याच्या जाहिरातीबरोबरच सट्टेबाजारातील भावही दिले जात. आता पुन्हा चर्चेत आलेल्या सिडनीतील पाक-ऑसी कसोटीचे उदाहरण घेऊया.
दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाकडे दहा धावांची आघाडी असताना त्यांचे केवळ दोन गडी शिल्लक होते. पाकिस्तान हरण्याचे आणि कांगारूंनी जिंकण्याचे ‘ऑड्स’ 40 : 1 असे होते. निकालाच्या बाबतीत याचा अर्थ असा होतो – पाकिस्तान जिंकणारच आहे, हरलेच तर मी (पाकिस्तान जिंकणार अशी खात्री असलेला) तुम्हाला (जर पाकिस्तान हरणारच असे तुमचे म्हणणे असेल तर) 40 रुपये देईन. हा झाला
सरळसरळ धंदा. सटोडिया किंवा बुकीला
(तुमच्या-माझ्यातला मध्यस्थ) त्याचा टक्का मिळतच असतो.
आता गंद्या धंद्याकडे – स्वतःचा काही पैसा वापरून (आणि त्यातला काही हिस्सा खेळाडूंना देऊन) सटोडिया हा निकाल बदलवू शकतो. म्हणजे पाकिस्तान जाणूनबुजून हरू शकते आणि सटोडियाने स्वतःचा किंवा स्वतःच्या काही हस्तकांचा पैसा पाकिस्तान हरणारच या बाजूने (म्हणजे अल्पसंख्याकांच्या बाजूने) लावलेला असतो. सटोडिया आणि संबंधित खेळाडू दोघेही मालामाल !
‘त्या’ कसोटीत कांगारूंची आघाडी अखेर दीडशेच्या वर गेली होती. पाकिस्तानचा यष्टीरक्षक कमरान अकमलने पाच झेल सोडले होते आणि पाकिस्तानच्या फलंदाजांनी हाराकिरी केलेली होती. सामना जितका लहान तितका निकाल निश्चित करण्याचा किंवा निकाल बदलविण्याचा आवाका मोठा. विसविशीत (टी20) सामन्यांच्या बाबतीत ही शक्यता फारच ठळक बनते.
सध्या चर्चेत असलेल्या प्रकाराला ‘स्पॉट-फिक्सिंग’ असे नाव आहे. सामन्याचा निकाल निश्चित करण्यापेक्षा छोट्या-छोट्या घटनांवर लक्ष इथे केंद्रित केले जाते. ‘आपण काय करू किंवा करवू शकतो’ हे दाखविण्यासाठी सध्या चर्चेत असलेल्या सटोडियाने नो-बॉल-निश्चिती केल्याचे उघड झाले आहे.
सभ्यांचा हा खेळ सभ्यसदृश रहावा यासाठी पाकिस्तानचा हा इंग्लंड दौरा आंक्रिपने तातडीने रद्द केला पाहिजे आणि दोषी खेळियांवर आयुष्यभरासाठी बंदी घातली पाहिजे. पाकिस्तान मंडळ कारवाई केल्याचा देखावा करते आणि नंतर या देखाव्यात केलेली कारवाईही मागे घेते असा इतिहास आहे.
पाकिस्तानमधील परिस्थिती पाहुण्या खेळाडूंनी जिवंतपणे परत घरी पोहचण्यासारखी नसल्याने पाकिस्तानमध्ये खेळायला आजकाल कोणताही आंतरराष्ट्रीय संघ तयार नसतो. त्रयस्थ भूमीवर सामने खेळविणे हा त्यावरील एक उपाय होता पण त्रयस्थ ठिकाणे ही निकाल-निश्चितीची निश्चित सुविधा असलेली ठिकाणे बनलेली आहेत. भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शारजामधील कोणत्याही सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे ती या कारणामुळेच. (ही गोष्ट अनेकांना माहित नसेल. आठवा. शारजात आपण शेवटचे कधी खेळलो?)
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply