नवीन लेखन...

पाक धार्जिण्या नेत्यांमुळे जम्मू-काश्‍मीरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता

मुख्यमंत्री सईदवर लगाम घाला नाही तर सरकार बरखास्त करा
पीडीपीचे सरकार आल्यापासून फुटीरतावाद्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. कारण, देशाच्या विरोधात युद्ध पुकारणारा फुटीरतावादी मसरत आलम याच्या सुटकेनंतर आता मुख्यमंत्री सईद यांनी आशिक हुसेन फक्तू या फुटीर नेत्याला सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सईद यांनी आपल्या पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच जी भीषण वक्तव्ये केली आहेत ती धक्कादायक आहेत. जम्मू-काश्‍मिरातील निवडणुका पाकिस्तान, दहशतवादी संघटना आणि फुटीरतावादी हुर्रियत परिषदेच्या नेत्यांनी दिलेल्या सहकार्यांमुळेच यशस्वी होऊ शकल्या, असे विधान त्यांनी केले. हे विधान सहज जाता जाता नाही, तर या विधानाचे तपशीलवार विश्‍लेषण करून त्यांनी या सहकार्याबद्दल पाकिस्तानचे आणि दहशतवादी संघटनांचे आभारही मानले आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या अफझलला फाशी देण्याच्या निर्णयाची खिल्ली
सईद दर दिवशी देशाचा रक्तदाब वाढवीत आहे. जम्मू संसदेवर हल्ला चढविणारा अफझल गुरूला देशाच्या न्यायव्यवस्थेने फाशीची शिक्षा सुनावली. मुफ्तींना तिहारच्या तुरुंगात गाडलेला दहशतवादी अफझल गुरुचा मृतदेह काश्मिरात नेऊन त्यावर मजार उभारायची आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे गोपनीय अहवाल मिळाल्यामुळे अफझलचा मृतदेह त्याच्या नातलगांना देण्याऐवजी सरकारनेच दिल्लीच्या तिहार जेल परिसरात त्याच्यावर सरकारी खर्चाने अंत्यसंस्कार केले होते. हे माहीत असूनही पीडीपीच्या राजा मंजूर अहमद, मोहम्मद अब्बास वानी, दिलावर वीर, अडव्होकेट मोहम्मद युसुफ, एजाझ अहमद मीर, नूर मोहम्मद शेख या नेत्यांनी अफझल गुरुचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली . जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेवर आल्यानंतर लोकप्रतिनिधी असूनही पीडीपी नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या अफझलला फाशी देण्याच्या निर्णयाचीच खिल्ली उडवली आहे.

भारताच्या पवित्र संसदेवर हल्ला करण्याचे महापातक, आपल्या साथीदारांसमवेत करणार्‍या या देशद्रोहीला अवास्तव महत्व देऊन, त्याच्या अवशेषांवर एखादे स्मारक बांधून त्या गुन्हेगाराचे उदात्तीकरण करण्याचे व त्याचे महत्व अकारण वाढवून त्याला हुतात्मापण बहाल करण्याची ही हीन कृती भारताने कदापि मान्य करू नये.

मसरत आलम भट २०१० मधल्या काश्मि्र दंगलीचा सुत्रधार
मसरत आलम भट या काश्मीर मुस्लीम लीगच्या अध्यक्षाला तुरुंगातून सोडवून त्याच्या घरी सुखरूप पोहोचवून मुफ्तींनी देशद्रोही क्रुत्य केले आहे. २०१०मध्ये त्याने काश्मिरात घडवून आणलेल्या दंगलीत ११२ जण ठार झाले, तर ४५०० सीआरपीएफ़ जवान, पोलीस त्यात जखमी झाले.सुरक्षा यंत्रणावर हल्ले चढविण्याच्या अनेक योजना आखण्याचा व त्या अमलात आणण्याचा आरोप त्याच्यावर आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली त्याला सहा वेळा अटक झाली असून, तो बराच उशिरा व पोलिसांची भरपूर दमछाक करून तुरुंगात डांबला गेला आहे. १८ आॅक्टोबर २०१० पासून तुरुंगात असलेल्या या मसरतला मुफ्तींच्या सरकारने निर्दोष सोडून त्याच्या श्रीनगरातील घरी सुखरूप पोहचविण्याची कामगिरी आता केली आहे.मसरत आलम भटला लगेच पुन्हा तुरुंगात टाकले पाहीजे.

हुर्रियत कॉन्फरन्सच्या सईद अली शाह गिलानी यांचे प्रक्षोभक वक्तव्य
य़ाच दरम्यान दिल्लीमध्ये पाक उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी फुटीरतावादी नेते गिलानी यांची भेट घेतली. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांची भेट घेणारे हुर्रियत कॉन्फरन्सच्या जहाल गटाचे नेते सईद अली शाह गिलानी यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केले असून, जम्मू-काश्मीर हे भारताचे अंगच नाही. हा एक वादग्रस्त प्रदेश आहे आणि भारताने ही सत्यता मान्य करायलाच हवी, असे म्हटले आहे.

फुटीरतावादी नेता मसरत आलमच्या सुटकेवरून देशभरात राजकीय वादळ उठले असताना, गिलानी म्हणाले की, मसरतवरील सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. त्याची मुक्तता हा फार मोठा विषय नाही. त्याला न्यायालयाने मुक्त केले आहे. यापूर्वीही त्याला अनेकदा जामीन मिळाला आहे. न्यायालयाने त्याच्यावरील सर्व आरोप आधीच खारीज केले आहेत. त्याला मी चांगल्या प्रकारे ओळखतो. तो चांगला माणूस आहे. सईद अली शाह गिलानीना पब्लिक सेफ्टी अक्टअंतर्गत व त्यांचा वयाचा विचार न करता पुन्हा तुरुंगात टाकले पाहीजे.

फक्तूची सुटका झाल्यास दहशतवाद वाढण्याचा धोका
जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेते मसरत आलम याच्या सुटकेच्या मुद्यावरून गदारोळ सुरुच आहे. या दरम्यान पीडीपी सरकारने 22 वर्षांपासून तुरुंगात कैद असलेल्या आणि हत्यांचा आरोप असलेल्या दहशतवादी डॉ. मोहंमद कासीम फक्टुसह इतर 800 “राजकीय'( दहशतवादी???) कैद्यांना सोडण्याची तयारी सुरू केली आहे. मुफ्तींच्या या कारभाराविषयी सुरक्षा दलांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आलमनंतर फक्तूचीही सुटका झाल्यास खोऱ्यातील वातावरण चिघळण्याचा व दहशतवादाची व्याप्ती वाढण्याचा धोका आहे. फक्तू हा जमियत-अल-मुजाहिदीन या इस्लामी संघटनेचा एकेकाळचा टॉप कमांडर आहे. मानवाधिकार कार्यकर्ता एच. एन. वांच्छू यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. फुटिरतावादी महिलेशी विवाह केलेल्या फक्तूचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांनी 2010 मध्ये झालेल्या दगडफेकीनंतर तुरुंगात कैद असणारे आणि ज्यांची सुटका करता येईल अशा फकटूसह ३५ कैद्यांची फाईल मागवली आहे. त्यांना जेकेएलएफ, हुर्रियतचा गिलानी गट, मीरवाइज गट, शब्बीर शाहसह इतर गटांचे नेते यांचा पाठींबा आहे. पब्लिक सेफ्टी अॅक्टअंतर्गत हे ३५ जण तुरुंगात कैद आहेत. यादरम्यान, मसरत आलमने पुन्हा विखारी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, ‘बलिदान वाया जाणार नाही. आम्ही स्वातंत्र्य मिळवूनच दम घेऊ.’राष्ट्रद्रोहासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या मसरतला पकडण्यासाठी दहा लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते. अशा देशविघातक गुन्हेगाराची राजकीय कैदी म्हणून मुक्तता करण्याचे धाडस दाखवणारे सईद सरकार कोणत्या मानसिकतेचे आहे, हेच दिसून येते.

सईद पाकिस्तानधार्जिणे नेते
हा सारा घटनाक्रम आचंबित करणारा आहे. राष्ट्रप्रेमी भारतीय नागरिकाला अस्वस्थ करणारा आहे .यापूर्वी यशस्वीपणे पार पडलेल्या निवडणुकांबद्दल पाकिस्तानचे आभार कोणी मानले होते काय? भारतातील एका राज्यात होणाऱ्या निवडणुकांशी इतर देशांचा संबंधच काय हा साधा प्रश्‍न आहे. सईद यांनी आपल्या विधानांनी सारा देश अस्वस्थ करून ठेवला आहे. जम्मू-काश्‍मिरात झालेल्या सत्तांतरामुळे तेथे काही चांगले घडू शकेल, या आशेवरच पाणी फेरले गेले आहे. सईद यांच्यासारख्या मनोवृत्तीच्या नेत्यांकडे राज्याची सूत्रे गेली असल्याने त्या राज्याच्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना करवत नाही.

हेच सईद व्ही. पी. सिंह पंतप्रधान असतानाच्या काळात देशाचे गृहमंत्री होते. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे, म्हणजे रुबिया सय्यद मुफ्ती यांचे अपहरण झाले होते. ते अपहरण यानी स्वत:च्या संकुचित राजकारणासाठी घडवून आणले होते .तिच्या सुटकेच्या बदल्यात या महाशयांनी पाच कडव्या दहशतवाद्यांना सोडून दिले होते. यामुळे मुफ्ती महाशय राज्याला कुठे घेऊन जाणार, हे सहज लक्षात यावे. भारताने साऱ्या देशाची सुरक्षा आणि सुरक्षाविषयक गुपिते गृहमंत्री म्हणून त्यांच्या हाती विश्‍वासाने सोपवली होती; परंतु त्यांनी आपले खायचे दात पुन्हा दाखवले आहेत. १६ वर्षांपूर्वी देशाचे गृहमंत्रिपद आणि दहा वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रिपद भूषवलेली व्यक्ती एवढी अपरिपक्व कशी काय वागू शकते? सईद यांच्यासारख्या पाकधार्जिण्या नेत्यांमुळेच जम्मू-काश्‍मीरची समस्या अधिक गुंतागुंतीची बनते. अशी पाकधार्जिणी विचारसरणी बाळगणाऱ्यांच्याच हातात पुन्हा या संवेदनशील राज्याची सूत्रे जावीत, यासारखे दुर्दैव नाही.

राज्य देशाच्या हिताचा विचार नाही
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री झालेले मुफ्ती मोहम्मद सईद हे भारतीय नागरिक आहेत की पाकिस्तानी, असा प्रश्‍न उपस्थित करावा लागत आहे. जाणीवपूर्वक ते ही कृती करीत आहेत. भारतीय जनता पार्टीने तीव्र स्वरूपाचा आक्षेप घेतल्यानंतरही सईद यांचे बरळणे सुरूच असल्याने, ते सगळे काही समजून उमजूनच बोलत आहेत, हे स्पष्ट आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, त्यामुळे आधी प्रदेशाचा विकास करावा, राज्याचे हित बघावे, असा विचार न करता ते आपली राजकीय पोळी शेकण्याचा आणि जनाधार आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जम्मू-काश्मीरच्या राजकारणातील त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांना मागे ढकलण्यासाठीच सईद यांनी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. राज्याचे आणि देशाचे हित त्यांच्या ताळेबंदात कुठेच दिसत नाही. यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून देशाच्या सीमेचे अन् काश्मिरातील जनतेचे रक्षण करणार्‍या आमच्या शूर जवानांचे मनोधैर्य खच्ची होऊ शकते.

मुख्यमंत्री सईदना लगाम घाला
जनमताचा आदर करण्याच्या प्रामाणिक उद्देशाने भाजपाने पीडीपीशी समझोता केला आणि मुफ्ती मोहम्मद सईद मुख्यमंत्री झाले. काश्मीर खोर्‍यातील जनतेची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, काश्मीर खोर्‍याचा विकास झाला पाहिजे, तेथील जनता राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सहभागी झाली पाहिजे, हे भाजपाने आधीच म्हटले होते. भाजपाशिवाय कोणत्याही पक्षाने विकासाच्या मुद्याला हात घातला नव्हता- ना कॉंग्रेसने, ना पीडीपीने. नॅशनल कॉन्फरन्स तर आधी सत्तेत होतीच. कुणीच कधी काश्मीरची वा तेथील जनतेची चिंता वाहिली नाही. सगळ्यांनी आपली राजकीय शक्ती वाढविण्यातच वेळ खर्ची घातला.पण आता भाजपा पण आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा डाव ओळखण्यात अपयशी ठरल्याचे दिसते आहे.

गेल्या पंचवीस वर्षांच्या महत प्रयत्नानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे आणि जनतेची दहशतवाद्यांच्या विळख्यातून मुक्तता झाली आहे. आता घड्याळाचे काटे उलटे फिरवून मुफ्ती आणि त्यांची सैतानी टोळी काश्मिरी जनतेला पुन्हा दहशतवाद्यांच्या तावडीत देणार असेल, तर तो भयंकर राष्ट्रीय गुन्हा ठरेल. मुफ्तीजी, तुमच्या निष्ठा कुणाबरोबर आहेत, एकदा कळू द्या. आत्ताच सडेतोडपणे स्पष्ट शब्दांत अशा देशविरोधी मागण्या करणार्‍यांना खडसावून सांगणे इष्ट राहील. देशहिताचा विचार ते लोक जर करीत नाहीत, तर दरवेळी बाकीच्यांनी त्यांना किती समजून घ्यायचे, याचाही विचार व्हायला हवा. भाजपसारख्या प्रखर राष्ट्रप्रेमी पक्षाकडून आता सारवासारव होता उपयोगी नाही. मुख्यमंत्री सईद यांना लगाम घालण्याचे काम भाजपला अधिक जबाबदारीने पार पाडावे लागणार आहे. वेळप्रसंगी जम्मू-काश्‍मिरातील सत्तेवर पाणी सोडण्याचे धारिष्ट्यही भाजपला दाखवावे लागेल.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..