मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. वर्तमानही काही वेगळे नाही आणि भविष्यावरदेखील युद्धाचे सावट पडलेले स्पष्ट दिसत
आहे. रक्तरंजित युद्धाचा आणि मानवाचा हा अन्योन्य संबंध निर्माण का झाला, युद्ध कशासाठी लढली जातात, या प्रश्नांची उत्तरे
केवळ साम्राज्यविस्तार असे दिले जात असेल तर ते अतिशय त्रोटक ठरेल. साम्राज्यविस्तार हे वरकरणी दिसणारे कारण आहे.
कोणताही राजा, कोणतेही राज्य किंवा देश केवळ आपल्या देशाच्या नकाशाची लांबी-रूंदी वाढविण्यासाठी युद्धे करीत नाही. तसे
असते तर सहारासारख्या वाळवंटासाठी किंवा बर्फाने सदैव आच्छादित पर्वतमय प्रदेशासाठी युद्ध लढल्या गेली असती. परंतु तसे
झाले नाही आणि कधी काळी झाले असेलही तर अशा ठिकाणाचा संबंध त्याला लागून असलेल्या समृद्ध भूप्रदेशाशी राहिला
असेल. 1962 च्या युद्धात चीनने आपला ‘गवताची काडीदेखील उगवू न शकणारा'(अवतरणातील हे निलाजरे वक्तव्य आपल्याच
तत्कालीन महान! नेत्याचे आहे) हजारो चौरस किलोमीटर प्रदेश बळकावला तो काश्मीर, लडाख आणि भारताच्या इतर
सीमावर्ती प्रदेशाकडे लक्ष ठेवूनच.आज आपणही कारगिल, सियाचीनच्या दुर्गम बर्फाळ पहाडांचे कोट्यवधी रूपये खर्च करून
संरक्षण करतोय ते काश्मीरच्या सौंदर्यावरील आपला हक्क शाबूत राखण्यासाठीच.थोडक्यात, साम्राज्य विस्तारासाठी केली जाणारी
युद्धे ही केवळ साम्राज्यविस्तारासाठी नसतात तर तो विशिष्ट भूप्रदेश ताब्यात घेऊन तेथील चल-अचल संपत्तीचे, उपलब्ध
होणाऱ्या मनुष्यबळाचा वापर करून आपल्या प्रांताची समृद्धी वाढविण्याच्या उद्देशाने युद्धे लढली जातात. जिंकलेल्या प्रदेशाची
राखरांगोळी करण्यातच धन्यता मानणारे मध्ययुगीन मोगल राजे त्याला अपवाद ठरू शकतील, परंतु बहुतेकांनी आपल्या
राज्याची, देशाची समृद्धी वाढविण्यासाठीच जिंकलेल्या प्रदेशाचा उपयोग केला. त्यामुळे विविधतेने नटलेले समृद्ध प्रदेश नेहमीच
आक्रमकांचे आवडते लक्ष्य
ठरत आले आहेत. लष्करी
आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणंदेखील बरेचदा युद्धाचे केंद्र ठरली
आहेत. पूर्वीच्या काळी भारतातून होणाऱ्या सागरी व्यापारावर तसेच समुद्रमार्गे येणाऱ्या आक्रमकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी
जंजिऱ्याचा किल्ला अतिशय मोक्याचा समजला जात असे. त्याचे हे महत्त्व जाणूनच शिवाजी राजांनी हा जंजिरा घेण्यासाठी
बराच प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात संभाजीराजांनी सुद्धा प्रयत्न सोडले नाहीत. परंतु मजबूत तटबंदी आणि अभेद्य सुरक्षेमुळे मराठा
साम्राज्यात जंजिऱ्याचा समावेश होऊ शकला नाही. सांगायचे तात्पर्य, युद्धे केवळ विध्वंसासाठीच लढली जात नाहीत. राखेच्या
ढिगाऱ्यावर कोणालाच राज्य करायचे नसते. युध्दे जिंकली जातात ती जिंकलेले प्रदेश संपविण्यासाठी नव्हे तर ते प्रदेश आपल्या
अधिपत्याखाली आणून त्यांचे विविधप्रकारे शोषण करण्यासाठी. या शोषणातूनच जेत्यांची समृद्धी बहरत असते. सर्व सोन्याची
अंडी एकदाच मिळविण्यासाठी ती अंडी देणारी कोंबडी कापण्याचा मूर्खपणा केवळ कथेतच संभवतो, प्रत्यक्षात नाही. याबाबतीत
इंठाज सर्वाधिक बेरकी ठरले. बळाचा कमीत कमी वापर करीत त्यांनी खंड:प्राय हिंदुस्थानवर आपले अधिपत्य प्रस्थापित केले
आणि त्यानंतरची त्यांची दीडशे वर्षाची राजवट बेमालूम शोषणाचा आदर्श? प्रस्थापित करणारी ठरली. एकेकाळच्या समृद्ध
भारताची श्रीमंती कलाकलाने कमी होत गेली आणि तिकडे इंग्लंडच्या राणीच्या मुकुटातील कोहिनूरची चमक दिवसेंदिवस निखरू
लागली. हिंदुस्थानचा गळा हळूहळू चिरल्या जात होता आणि तो चिरणाऱ्या इंठाज कसायाचे कौशल्य इतके बेमालूम होते की
अर्ध्या हिंदुस्थानला त्याची वेदना जाणवलीच नाही. साहेबांचे राज्य आले म्हणून हिंदुस्थानचे भले झाले, असे म्हणणाऱ्यांची
संख्या त्याकाळी कमी नव्हती. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात हजारो-लाखोंनी आपले बलिदान दिल्यामुळे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर
इंग्लंड खिळखिळा झाला आणि त्याचवेळी महात्माजींच्या योजनेप्रमाणे लोकांनी विदेशी कापडांवर बहिष्कार टाकल्यामुळे इंठाजांचा
जो मूळ उद्देश, धंदा करण्याचा तोच संपला म्हणून हिंदुस्थानच्या पदरात स्वातंत्र्याचे दान पडले, अन्यथा इंठाजांनीच जन्माला
घातलेल्या काँठोसला पुढील दीडशे वर्षे हा देश स्वतंत्र करणे शक्य नव्हते. हिंदुस्थानला अपघाताने स्वातंत्र्य मिळाले. इंठाज हा
देश सोडून गेले,परंतु ते शरीराने! हिंदुस्थान या आपल्या पट्टराणीचा मोह इंठाज मनात कायमच राहिला. हा मोह आजही कायम
आहे. आजही हिंदुस्थानचे सौंदर्य कोणत्याही विदेशी आक्रमकाला भुरळ घालण्याइतके आकर्षक आहे. दिडशे वर्षाच्या लुटीनंतरही
इंठाजांचे मन भरले नाही. समृद्धीची ही खाण त्यांना कायमस्वरूपी आपल्या ताब्यात ठेवायची आहे. केवळ इंठाजच नाही तर
इतरही अनेक बुभुक्षितांच्या नजरा या देवभूमीकडे रोखून पाहत आहेत. हिंदुस्थानचे लचके तोडू पाहणाऱ्या या लांडग्यांनी आता
संघटितपणे आपले प्रयत्न चालविले आहेत.
शेकडो वर्षांची गुलामी भोगल्यानंतरसुद्धा हिंदुस्थान आज ताठ मानेने कसा उभा राहू शकला याचा अभ्यास केला गेला. या
अभ्यासाच्या आधारे एक ‘मास्टरप्लॅन’ तयार केल्या गेला. या ‘मास्टरप्लॅन’ च्या आधारे विविध योजना आखल्या गेल्या आणि
त्या योजना कार्यान्वितसुद्धा झाल्या आहेत.
एखाद्या राष्ट्राची शक्ती प्रामुख्याने तीन घटकांवर अवलंबून असते. पहिला घटक म्हणजे त्या राष्ट्रातील नागरिकांना एकमेकांशी
बांधून ठेवणारी संस्कृती आणि परंपरा, दुसरा घटक म्हणजे त्या राष्ट्राची व्यापार-उदिमात सामावलेली आर्थिक ताकद आणि
तिसरा व सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशाची तरूणाई! हिंदुस्थानला कायम अधिपत्याखाली ठेवू पाहणाऱ्या शक्तींनी
या तिन्ही घटकांवर आपले लक्ष केंद्रित केले. हिंदुस्थानरूपी कामधेनूचे कायमस्वरूपी दोहन करण्यासाठी ही कामधेनू कायम
लाचार करण्याचे षडयंत्र शिजवले गेले. पुन्हा एकदा हिंदुस्थानला हलाल करण्यासाठी कसायांनी आपल्या
सुऱ्या परजल्या आणि
यावेळी तर इंठाज कसायांचे
कौशल्य फिके पडावे, इतके बेमालूम तंत्र वापरले गेले. पहिला आघात या महाकाय राष्ट्राला एकत्र
बांधून ठेवणाऱ्या संस्कृतीरूपी धमणीवर केल्या गेला. हा घाव अगदी अचूक बसला. आपली संस्कृती आता केवळ देवापुढे
तेवणाऱ्या निरांजनातल्या ज्योतीपुरती मर्यादित झाली आहे. आचारविचार आणि राहणीने आपण केव्हाच आपल्या संस्कृतीच्या
सीमा उल्लंघल्या आहेत. केवळ पाश्चात्त्य विचारच नव्हे तर पाश्चात्त्यांच्या पोषाखासहित त्यांचा आहार आणि क्रिकेट, टेनिससारखे
खेळसुद्धा आपल्याकडे प्रतिष्ठित झाले आहेत. आपली पूर्वीची जीवनपद्धती निसर्गाच्या नियमांशी मेळ खाणारी, हवामान, ऋतू
आदींचा विचार करून तयार केलेली शास्त्रीय जीवनपद्धती होती. त्या पद्धतीला नैतिक अधिष्ठान होते. आपला आहारसुद्धा पर्यावरण
आणि शरीरशास्त्राची सांगड घालून निश्चित केलेला असे. चातुर्मासासारख्या विशिष्ट कालखंडात विशिष्ट पदार्थ वर्ज्य करण्यामागे
शास्त्रीय कारणेच होती. कुस्ती, मल्लखांबसारखे खेळ केवळ मनोरंजनासाठी नसत. शरीराला योग्य तो व्यायाम मिळून शरीर
सुदृढ बनण्यासाठी हे खेळ उपयुक्त होते. या आदर्श जीवनपद्धतीचा परिपाक म्हणून कोणे एकेकाळी आपल्या देशात अत्युच्च
कोटीची माणसे होऊन गेलीत. आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होताच, परंतु त्याच सोबत त्याकाळी आपला देश नररत्नाची
खाण होता हे निश्चित. त्यामुळे ‘मेरा भारत महान’ असे त्याकाळी ओरडून सांगावे लागत नसे. हिंदुस्थानच्या समृद्धतेचा दरवळ
आपोआप संपूर्ण जगात पसरत गेला. दुर्दैवाने हा इतिहास आम्ही विसरलो किंवा असेही म्हणता येईल की, आम्हाला या
इतिहासाचे विस्मरण व्हावे, यासाठी पद्धतशीर प्रयत्न केल्या गेले. हिंदुस्थानची धार्मिक आणि सामाजिक संस्कृतीच या देशाच्या
अस्तित्वाचा आत्मा आहे, हे जाणणाऱ्या पाश्चात्त्यांनी आपले प्राथमिक लक्ष्य निश्चित केले. अगदी पोशाखापासून सुरूवात केली.
आपल्याकडचे परंपरागत पोशाख बासनात गुंडाळून ठेवण्यास आपल्याला भाग पाडले. अतिउष्णतेत मेंदूला थंड ठेवणाऱ्या
डोक्यावरच्या पगडीला एकेकाळी असलेली प्रतिष्ठा आज कोट आणि टायला प्राप्त झाली आहे. राहण्यात साधेपणा जोपासणारी,
उच्च विचारसरणीची माणसं हळूहळू लुप्त होऊ लागली. ‘खा, प्या आणि चंगळ करा’, हा भोगवादी दृष्टिकोन सर्वत्र बोकाळला.
कुस्ती, मल्लखांबसारखे खेळ केवळ प्रदर्शनीय ठरले. क्रिकेटला राजमान्यता लाभली. अशाप्रकारे पोशाखापासून ते विचारापर्यंत
आम्ही गुलामी पत्करली. प्रसारमाध्यमांचा विशेषत: दूरचित्रवाणीचा यासाठी पाश्चात्त्यांनी बेमालूम वापर केला. पूर्वीच्या काळी
संपूर्ण घराला एकत्र बांधून ठेवणारी नातेसंबंधाची वीण अतिशय मजबूत असायची. आज विविध वाहिन्याद्वारे दाखविल्या
जाणाऱ्या मालिकांमधून ही वीण उकलण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न चालला आहे. किशोरवयीन प्रेम तसेच विवाहबाह्य संबंधाला
प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या जात आहे आणि खेदाची बाब ही आहे की, आमच्या नकळत हे सगळे
चालू आहे किंवा असेही म्हणता येईल की, आम्हाला कळत असूनही त्याला विरोध करण्याचे नैतिक धैर्य आमच्यात उरलेले
नाही.
एकंदरीत, ज्या तीन घटकांवर या देशाला कायमस्वरूपी पंगू बनवू पाहणाऱ्या शक्तींनी आपले लक्ष केंद्रित केले आहे त्यापैकी
संस्कृती आणि नीतिमत्ता या पहिल्या लक्ष्यावर तर अचूक संधान साधल्या गेले, असे म्हणता येईल. तरूणाई आणि आर्थिक
ताकदीचा आधार असलेला व्यापार- उदिम या उर्वरित दोन घटकांचा गळा दाबण्याचीदेखील पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे,
त्याबद्दल पुढील लेखात!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply