शेवग्याच्या पाल्याची एक मजेशीर दंत कथा मला माझ्या सासुबाईंनी सांगितली आहे ती तुम्हाला आधी सांगते.एकदा शेवग्याची भाजी लग्न होऊन काही दिवस झाल्यावर माहेरी जायला निघाली,तिला तिच्या नव-साने त्याचदिवशी घरी परतयायला सांगितले होतेनाहीतर माहेरी येऊन तुझी हाडे मोडीन असे तो म्हणाला पण हि बिच्चारी त्या दिवशी माहेरी राहिली, रागाने तिचे यजमान तिच्या माहेरी गेले आणि बदडून बदडून तिची हाडे खिळखिळी केली.म्हणूनच शेवग्याच्या पाल्याची भाजी ज्या दिवशी काढतो त्याच दिवशी चिरून ठेवावी लागते जर तुम्ही दुस-या दिवशी चिरायला गेलात तर तिचे पान अन् पान मोकळे झालेले असते(फ्रिज देखील कामी येत नाही बरं का)
तर अशी हि शेवग्याची भाजी पुष्कळ जणांची आवडीची पण हि चांगली भाजी आषाढ व श्रावंण महिन्यात चांगली मिळते.हिचे मोठे २०-२५ फूट उंच झाड असते.व हिची पाने बारीक असतात.
हि चवीला तिखट,कडू असते व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ दोष कमी करते.
हि भाजी चांगली पथ्यकर व औषधी गुण युक्त आहे बरं का! त्यामुळे घरगुती उपचारात वापरतात.
चला मग हिचे औषधी उपयोग पहायचे ना आपण:
१)सुजेवर शेवग्याच्या पानांचा लेप लावावा.
२)डोके दुखीमध्ये शेवग्याच्या पाल्याचा रस त्यात मिरे खलून डोक्यावर लेप करावा.
३)जखम होऊन चिघळली असेल व त्यात पू झाला असेल तर शेवग्याच्या पाल्याची चटणी त्या जखमेवर लावावी(क्रुपया हा उपाय मधुमेहामुळे चिघळलेल्या जखमेवर वैद्यांच्या सल्ल्याशिवाय करू नये हि विनंती).
४)गळवांवर शेवग्याच्या पाल्याच्या रसात शेवग्याचे बी उगाळून लावावे.
५)काही व्यक्तींना ऋतू बदलला कि सर्दी,खोकला,होतो त्यांनी सकाळी उपाशी पोटी शेवग्याचा रस ४ चमचे +मध १ चमचा+१ काळी मिरी हे मिश्रण ४२ दिवस द्यावे.
अतिप्रमाणात शेवग्याची भाजी खाल्ल्यास घाम येतो,पोटात आग होते,चक्कर येते व घशाला कोरड पडते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply