नवीन लेखन...

पिंटु द लिटील चॅम्प

“वहिनी चहा टाका दोन कप ” अशी हाक मारणारा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन माझा बालमित्र गजा. आम्ही दोघेही बालपणापासुन एकत्रच वाढलो. शिक्षण , लग्न आणि नंतर मुलेही साधारणतः एकाच वेळी. तो एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणुन नोकरीला लागला , आणि मी बैंकेत. प्रोफेसर असल्यामुळे बराचसा वेळ तो रिकामाच असतो.

आणि या रिकाम्या वेळात काहीतरी खुळ डोक्यात घेउन बसतो. बर, स्वतःपुरते ठिक आहे , पण इतरांच्या डोक्यातही हे खुळ भरणे ही त्याची आवडती गोष्ट आहे ,आणि आमचे घर हे त्याच्यासाठी ” सॉफ्ट टारगेट ” आहे. आता हा नुसता चहा पिउन जाणार की काहीतरी नवीन खुळ काढणार या विचारात असतानाच गजा म्हणाला ” वहिनी , लिटिल चैम्प्स या वेळेला चार वर्षांखालील मुलांसाठी आहे . पिंटु आणि सोनुला ( सोनु म्हणजे गजाचे अपत्य . वय वर्षे तीन ) आपण पाठवु या का ? “ही मात्र याची नेहेमीची सवय आहे. मी याचे नवनवीन प्रस्ताव नेहेमीच धुडकावुन लावतो , हे याला पक्के ठावुक आहे. त्यामुळे कुठल्याही नवीन प्रस्तावाविषयी हा मला डावलुन थेट हायकमांडकडे परमिशन मागतो. आणि एकदा हायकमांडच्या मनात आल्यावर बाकी कुणाच्या म्हणण्याला तितकासा अर्थ नसतो, हेही त्याला पक्के ठावुक आहे. ”अरे पण हे काय वय आहे डान्स करायचे ? इनमिन अडिचतीन वर्षांची पोर आपली .” माझा विरोधाचा थोडाफार प्रयत्न .”अरे कुठल्या जगात वावरतोस तु आजकाल ? आजच्या जगात मुले चालायला लागली की डान्समधील लिटिल चॅम्प्स बनतात , आणि बोलायला लागली की गाण्यामधील लिटिल चॅम्प्स , विनोद कळायचे वय व्हायच्या आत लिटिल विनोदवीर बनतात . आपला काळ गेला आता. आपली मुले या स्पर्धेत राहिली नाहीत तर कधी या रेसमधुन बाहेर फेकली जातील कळणारपण नाही

“गजा मार्केटिंगच्या क्षेत्रात असता तर खुप पुढे गेला असता . कुठलीही गोष्ट समोरच्याला पटेल अशी सांगण्यात त्याचा हातखंडा आहे. “
आणि तुपण लहानपणी स्टेजवर डान्स नाही का करायचास ? तुझे गुण पिंटुत उतरणारच की ! “ इति गजा .आता ही गोष्ट थोडीफार खरी आहे. लहानपणी मी शाळेत दोनवेळेस गॅदरिंगमधे डान्स केलेला आहे. इयत्ता दुसरीत असताना ‘ नाच रे मोरा आंब्याच्या वनात ‘ वर आमच्या मॅडमनी डान्स बसवला होता . माझ्या डान्सची त्यावेळेला सर्वांनी खुप तारीफ केली होती . त्याचे फोटोही अजुन माझ्याकडे आहेत. ( समोरुन चौथ्या ओळीतील डावीकडुन तिसरा मुलगा म्हणजे मीच ) . त्यानंतर सातवीत असताना ‘ जिसकी बीबी काली उसका भी बडा नाम है ‘ मधे मी ‘ काली बीबी ‘ बनलो होतो . ( माझे काही दुष्ट मित्र माझ्या रंगामुळे मला हा चान्स मिळाला असे चिडवायचे . पण आमच्या मॅडमनी संपुर्ण वर्गासमोर माझ्या नृत्यकौशल्याची तारीफ करुन सर्वांची तोंडे बंद केली होती .) दुर्देवाने त्याचे फोटो मात्र माझ्याकडे नाहीत . पण या एवढ्याशा भांडवलावर पिंटुने डायरेक्ट लिटिल चॅम्प्स मधे जावे याच्याशी मी काही सहमत नव्हतो . पण आजकाल संपुर्ण देशावरच ‘ आले हायकमांडच्या मना तेथे कोणाचे चालेना ‘ अशी परिस्थिती असताना आमचे घर तरी त्याला अपवाद कसे असणार ? मी मुकाट्याने परिस्थितीला शरण जाण्याचे ठरवले .एकदा स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवल्यानंतर आम्ही पुढील तयारीला लागलो. चौकशीअंती असे समजले की , ऑडीशन एक महिन्यानी आहे. त्यासाठी एका गाण्यावर डान्स बसवावा लागणार आहे , आणि तो करुन दाखवावा लागणार आहे. त्यात निवड झाली तर पुढील फेरीसाठी मुंबईला जावे लागेल .आता हा डान्स बसवण्यासाठी एका ट्रेनरला गाठावे लागणार आहे. आम्ही ही चौकशी करीत असताना पिंटु आणि सोनुला याचे काहीच सोयरसुतक नव्हते . फक्त शेजारी पाजारी मंडळी “आता पिंटु कुठे जाणार ? “ असे विचारायची आणि पिंटु बोबड्या स्वरात त्याला ” लिटिल चॅम मधे ” असे ऊत्तर द्यायचा .डान्स बसवण्यासाठी सुजी डान्स ऍकेडमी ही अत्यं
चांगली आहे असे समजले. या सुजीचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत उत्तम असुन गेल्या लिटील चॅम्पमधे दहा मुले इथुनच सिलेक्ट झाली होती. ही सुजी बर्‍याच हिरोहिरोइनना पण प्रशिक्षण द्यायची . मोठमोठ्या लोकांच्या लग्नात मेंदीच्या वेळी डान्स बसवायला ती लाखो रुपये घ्यायची , पण लिटिल चॅम्प्स साठी तिने स्पेशल डिस्काउंट रेट म्हणजे फक्त दहा हजार रुपये पर सॉंग लावला होता . ही समाजसेवा ती फक्त लहान मुलांना स्टेज मिळवुन देण्यासाठी करीत होती. मात्र एकंदर ही लिटिल चॅम्पची वारी माझ्या खिशाला भलतीच भारी पडणार होती.दुसर्‍या दिवशी सकाळी मी , माझी पत्नी , गजा , गजाची पत्नी , चि. पिंटु आणि चिं. सोनु ही वरात सुजी डान्स एकेडमीला पोहोचली. एक भला मोठा वेटींग हॉल , खाली गुबगुबीत गालिचा , बसायला उंची फर्निचर , संपुर्णपणे एसी हॉल , पलिकडे काचेच्या रुममधे बरीचशी मंडळी डान्स शिकत असलेली . स्टेजवर जिन्सपॅंट आणि टी शर्टमधे डान्स करणारा पंचविशीचा तरुण आणि दोन तरुणी . एकंदर वातावरण बरेच प्रसन्न वाटले . ” या दोन मुलींपैकी ओरिजिनल सुजी कोणती ? ” असे विचारताच “ सुजी हा मुलगा आहे “ असे ऊत्तर मिळाले . हे लोक मुलींसारखी नावे ठेवुन लोकांना कन्फ्युज का करतात हेच कळत नाही. ते जाउ द्या , अर्ध्या तासानंतर सुजीची अपॉइंटमेंट मिळाली . “ सो यु वॉना सेंड युअर चाइल्ड टु चॅम्पस? ” सुजी ”

हो , म्हणजे त्याला डान्सची खुप आवड आहे . टिव्हीवर गाणे चालु झाले की तो नाचायला लागतो. ” मी ” बट ओन्ली लायकींग डझन्ट मेक सेन्स . इट रिक्वायर्स पॅशन , एटिट्युड , स्ट्रेंग्थ , एफर्टस ” यातल्या एकेका शब्दावर डान्स करताना पाय आपटतात त्याप्रमाणे जोर देत सुजी म्हणाला .” हो , पिंटुकडे यातील सर्व काही आहे . ” इति सौ. ” आणि माझ्याकडे दहा हजार रुपये सुध्दा “. इति मी ” ओके . डिपॉजिट मनी इन कॅश . पण मी एकाच गाण्यावर डान्स बसवणार . शिवाय एकच अंतरा.
नेक्स्ट राउंडमधे गेला तर फिफ्टीन थाउजंड लागतील . वुइ विल सी दॅट लेटर .” “ओके “. माझे ऊत्तर .पुढचा एक महिना आमच्या घरात जे काय घडले त्याला माझ्यासाठी ‘ नरकवास ‘ असे नाव देता येइल. दररोज सकाळ संध्याकाळ पिंटुला क्लासला घेउन जाणे , सुजीकडुन एकेका ओळीवर स्टेप्स समजावुन घेणे , घरी आल्यावर सतत ‘ आजा पिया तोहे प्यार दुं ‘ हे गाणे पिंटुला लावुन देणे , हे चालु झाले . पुर्वी टिव्हीवर गाणे चालु झाले की हातपाय हलवणारा पिंटु नेमके हे गाणे चालु झाले की ढप्प बसायचा . जबरदस्तीने त्याचे हातपाय सुजीने सांगितल्याप्रमाणे हलवले तर रडायचा. एक स्टेप सांगितली तर नेमकी दुसरी करायचा . या सर्व प्रकाराला कंटाळुन मी कधीमधे पेपर वाचायला बसलो की सौं चे ” सर्व गोष्टीची गरज फक्त मला आहे , तुम्ही पसरा. ” नामक दुसरे गाणे चालु व्हायचे. त्यापेक्षा ‘ आजा पिया ‘ बरे म्हणत मी पिंटुचे हातपाय हलवुन घ्यायचो. तोपण कधी बरोबर हलवायचा कधी चुकीचे. तो चुकला की पुन्हा सौचे ” सर्व गोष्टीची गरज फक्त मला आहे ” चालु. घरातला टिव्ही बंद झाला , बाहेर फिरायला जाणे बंद झाले , पिक्चर बंद झाला , एवढेच नाही तर जेवण्याखाण्याचेपण हाल चालु झाले . सकाळचा चहा दोनदाचा एकदावर आला. जेवणाच्या ताटातले पदार्थ अचानक कमी झाले . कधीकधी नुसत्या भातावर तर कधी कधी परदेशातल्यासारखे नुसत्या ब्रेडवर भागवण्याची वेळ येउन ठेपली . दुपारच्या नाष्टयातील इडली , दोसा , समोसा या सर्व पदार्थांची गच्छंती झाली. त्यात रविवारचा नॉनवेजचा बेत पण बंद पडला. दिवसभर सकाळपासुन संध्याकाळपर्यंत नुसते आजापिया ऐकुन कान किट्ट होउन गेले. थोडक्यात माझे सुखी जीवन अचानक दुःखी होउन गेले. या सर्व प्रकारात गजा अत्यंत हुशार निघाला. सुजीचे दहा हजार रुपये ऐकताक्षणीच त्याने तेथुन काढता पाय घेतला. लिटील चॅम्प्स हे मॅच फिक्सींग सारखे फिक्स असते, असे त्याने आपल्या

बायकोच्या डोक्यात भरवले आणि सोनुचे नाव मागे घेतले. नवर्‍याचे ऐकणार्‍या बायकासुध्दा नेमक्या दुसर्‍्यांच्याच कशा ? हीपण एक अनसॉल्व्ड मिस्ट्री आहे.औडीशनच्या दिवशी सकाळी सात वाजताच एकनाथ रंगमंदिरात पोहोचलो. आमच्याआधी शेकडो मंडळी रांगा लावुन उभी होती. एकंदरीत आजकाल कलेला शिक्षणापेक्षा चांगले दिवस आलेले आहेत हे पटले. सर्व आईवडीलांना मुलांपेक्षा जास्त टेन्शन आलेले दिसले. मुले आपली छान खेळत होती. आतमधे एक डान्समास्टर मुलांची औडीशन घेत होते. पालकांना मात्र मधे प्रवेश नव्हता ही चांगली गोष्ट होती अन्यथा काही उत्साही पालकांनी पाल्याऐवजी स्वतःच डान्स करुन दाखवला असता. दुपारी साधारणतः एक वाजता पिंटुचा नंबर आला .मास्टर्सपुढे डान्स करुन पाच मिनीटातच तो बाहेर आला , आणि आम्हाला हायसे वाटले. मात्र त्याने डान्स कसा केला हे कळायला मार्ग नव्हता, संध्याकाळी फक्त निवडलेल्या मुलांची यादी लागणार होती. संध्याकाळी यादीत पिंटुचे नाव नसलेले बघुन आमच्या प्रतिक्रिया अशा होत्या ,सौ – ( रडत ) सर्व मेहनत पाण्यात गेली.मी – ( चेहेरा दुःखी ठेवुन ) वर दहा हजार रुपयेपण . ( मनात – सुटलो. पुढच्या राउंडमधे गेला असता तर आणखी तुरुंगवास भोगावा लागला असता. )

— निखिल नारायण मुदगलकर
 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..