अंगावर गांधी (दादड) उठून, अत्यंत त्रास देणाऱ्या अश्या “पिताम” बद्दल आज पाहुया. ह्या पिताम/दादड सोबत खाज येत असेल तर त्याला उदर्द, कोठ असे म्हणतात तर वेदना जास्त असल्यास आयुर्वेदात शीतपित्त असे नाव आहे. आधुनिक शास्त्रानुसार त्यास Urticaria म्हणतात.
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वास हा रोग जडू शकतो, ह्या रोगात अंगावर अचानक गांधी (दादड) उठतात व अंगास खाज सुटते. खाजवून रुग्ण अगदी हैराण होऊन जातो. दादड आलेल्या ठिकाणची त्वचा लालसर होते व स्पर्शास उष्ण भासते. काही वेळानंतर आपोआप लक्षणे कमी होतात.
कारणे
अति आंबट, तिखट पदार्थ, तळलेले पदार्थांनी शीतपित्त होऊ शकते. दर रविवारी मजा म्हणून १-२ प्लेट पाणीपुरी, व दररोज नाश्त्याला मिरची-वडे खाणार्यांनी हे लक्षात ठेवावे. शेगदाणे, मश्रूम खाल्ल्यानेसुद्धा काही व्यक्तींना वरील लक्षणे दिसतात. ऋतुमानाप्रमाणे विचार करता हा त्रास पावसाळ्यात व पावसाळ्याअंती जास्त उद्भवतो.
दुचाकीने जास्त प्रवास करणारे, सतत थंड हवेशी संपर्क येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हा त्रास होऊ शकतो. लहान मुलांमध्ये कृमी झाल्यास पिताम येऊ शकते.
आपले शरीर हे एवढे हुशार असते कि कोणताही अनावश्यक / विषारी घटक पोटात गेला असता किंवा तयार झाला असता तो उल्टीमार्गे बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते. आपण मात्र उल्टी आल्यास लगेच घाबरून उल्टी थांबविणारी औषधे घेतो. पण असे केल्याने विषारी घटक शरीरातच राहून पिताम उत्पन्न करू शकतात.
उपद्रव
पिताम व ताप येणे असे काही रुग्णामध्ये दिसते. आधी ताप यावा व ताप जाताच पर्ण अंगावर पिताम यावी, असे आलटून पालटून होत राहते.
उपचार
शीतपित्त होताच त्यावर थंड पाणी लावणे, बर्फ लावणे असे उपचार केले जातात. याने तात्पुरते बरे वाटले तरी अश्या शीत उपचारांनी त्रास वाढतो.. पिताम आलेल्या जागी मोहरीचे तेल लावून त्यावर गरम पाणी ओतल्यास लगेच आराम मिळतो. (भर दुपारी, उन्हाळ्यात, मासिक पाळी चालू असताना वलहानमुलांवर हा प्रयोग करू नये ). खाण्याचा सोडा व पाणी मिसळून त्याचे द्रावण तयार करून ते लावल्यास दादड बसून लगेच खाज कमी होते. झेंडूच्या पानाचा रस, आमसुलाचे पाणी अंगास चोळल्याने त्रास कमी होतो. पिताम येण्याची सवय असलेल्यांनी अडूळश्याची पाने टाकून पाणी उकळावे व त्याने आंघोळ करावी.
आहारात एखादा कडू पदार्थ.असावा . जेवणानंतर सोलकढी प्यावी किंवा आमसूल चघळून खावे. दही, चिंच, टोमेटो, उडीदाचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, ब्रेड टाळावे. दुधासोबत खरी बिस्कीट, चपाती, फळे अजिबात घेऊ नयेत. मिल्क शेक/ फ्रुट सलाड ह्यांपासून लांबच राहावे. हा रोग साधा दिसत असला तरी अत्यंत चिवट असतो. आहारातील किंवा हवामानातील पोषक कारण मिळाल्यास लगेच डोके वर काढतो. आयुर्वेदातील औषधी व योग्य आहार ह्या चिवट रोगावर उत्तम प्रभाव दाखवितात, यासोबतच रुग्णाची प्रकृती,वय पाहून पंचकर्मातील वमन, विरेचन, रक्तमोक्षण करून घेतल्यास हा रोग पुन्हा पुन्हा होत नाही.
#रहस्यस्वास्थ्याचे
— वैद्य आदित्य मो. बर्वे
BAMS, DpK , PGDHHM, B.A(संस्कृत)
8888597293
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
Leave a Reply