पुण्यात घडविण्यात आलेल्या स्फोट मालिकांनी, आम्हाला नव्याने नव्या संदर्भासह विचार करण्यास भाग पाडले आहे. स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी मात्र त्या स्फोटांची परिणामकारकता निश्चितच मोठी आहे. कमी तीव्रतेचे म्हणून त्याकडे दुर्लक्ष वा कमी लक्ष देणे आमच्यासाठी आत्मघात ठरेल हे निश्चित ! भारतातील विविध राज्यांमध्ये तसेच शहरांमध्ये घडविण्यात येणारे स्फोट आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा एक भाग आहे, हे कोण्या भविष्यवेत्त्याने सांगावयाची गरज नाही. आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये वारंवार पाकिस्तानच्या सहभागासह त्याचा दहशतवादी चेहरा उघडही झाला आहे. अमेरिका आणि चीन यांची महत्वाकांक्षा भारतीय उपखंडात अशांततेला कारणीभूत ठरत आहे. आंतरराष्ट्रीय वर्चस्व निर्माण करण्याच्या नादात अमेरिका आणि चीन या दोन बड्या राष्ट्रांनी दहशतवादाला खतपाणी घालण्यास सुरुवात केली आहे, पाकच्या कारवायांवर अंकुश घालण्यासाठी भारताचे समर्थन करण्यास कोणीही तयार नाही. <>
पुणे स्फोटमालिका, तपास यंत्रणांच्या कामातील गतीला खीळ घालण्यासाठी केलेली खेळी आहे. मनुष्यबळ मर्यादित, कामे अनेक त्यातही हे नवे प्रकरण, त्यामुळे जुन्या प्रकरणांच्या तपासाला अर्थातच खीळ बसेल. हे हेरून समाजविघातक तत्वांनी नव-नवे प्रकार सुरु केलेत. याला कारणीभूत आम्हा भारतीयांची “मला काय त्याचे” ही प्रवृत्ती होय. <>
हशीम रजा या सिमी च्या आतंकवाद्याला कलकत्ता येथे जेरबंद केल्यामुळे, मोठ्या प्रमाणात आतंकवाद्यांच्या योजनांची माहिती तपास यंत्रणांना मिळू लागली. कसाबला जिवंत पकडले गेल्यामुळे भारतातील तपासाची सूत्रे जोरात फिरू लागली. अबु जिंदाल या बीड जिल्ह्यातील गेवराई येथील आतंकवाद्याने तर कहरच केला. त्याने अबु जिंदाल, अबु हमजा, सय्यद जबीउद्दिन, रियासत अली ही विविध नावे धारण करून तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करीत अनेक दहशतवादी कारवाया केल्यात. या सर्वांचे तार एकत्र जुळण्याची चिन्हे दिसू लागताच आमच्या तपास यंत्रणांना नव्या प्रकरणात लक्ष देण्याची वेळ आली. <>
लैला खान खून प्रकरण दिसते तितके साधे कदापीही नाही, भारतीय तपास यंत्रणांना फिराविण्याचाच हा एक भाग आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचे संबंध नाकारता येत नाही. सीमेवरील सांबा सेक्टर मध्ये सापडलेल्या भुयाराचा संबंध, सरळ पाकसमर्थित दहशतवादाशी आहे. सीमापार बसलेल्या देशशत्रुंच्या मानसशास्त्राचा अभ्यासही आम्हाला करावा लागेल, त्यांच्या राक्षसी डोक्यात कोणतीही योजना शिजण्या अगोदर आम्हाला त्यांचा निःपात करावा लागेल. अमेरिकेच्या वर्ल्डट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा त्या देशात दहशतवाद्यांना कोणतीही कृती करता आली नाही. या गोष्टीचा आम्ही विचार कधी करणार ? आमच्या प्रत्येक नागरिकाने लक्ष घातल्यास कोणतीही अनुचित घटना घडणे शक्यच नाही. <>
भारतात घडविण्यात आलेल्या दहशतवादी कारवायांची यादी फार मोठी आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला, संसदेवरील हल्ला २००१, अक्षरधाम मंदिरावरील हल्ला, मुंबई शेअर बाजार स्फोट, काश्मीर विधान भवनावरील हमला २००१, काठमांडू विमान अपहरण, हैद्राबाद स्फोट २००७, दिल्ली स्फोट २००८, मुंबई हमला २००८, अहमदाबाद स्फोट २००८, मालेगाव स्फोट २००८, जर्मन बेकारी स्फोट २०१०, दिल्ली स्फोट २०१०, दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर स्फोट २०११, पुणे स्फोटमालिका २०१२ ह्या आणि अन्य सर्व कारवाया भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहेत. <>
अल उम्मा, हम्मास, जमाते इस्लामी, एल्गार उल मुस्लीम, इस्लामी जंग यासाख्या कट्टरवादी आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत, सिमी (स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट आफ इंडिया) व इंडिअन मुजाहिदीन या भारतातील बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचे संबंध असल्याचे, गुजरातच्या कारागृहात बंद असलेल्या हशीम रजा याने कबूलही केले आहे. तसेच जबेरूल हसन, अबु आजमी, हिमालयन ड्रग्स, सय्यद अली शाह गिलानी यांनी सिमी ला मदत केल्याचे हशीम रजा यानेच कबुल केले. <>
दहशतवाद्यांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या देशशत्रूंचे पाळेमुळे नीखंदुन काढण्यासाठी कठोर आणि परिणामकारक प्रयत्नांची गरज आहे. आमच्या संसदेवर हल्ला करणाऱ्याला शिक्षा देण्यासंदर्भात कित्येक वर्षे निर्णयच होत नाही, तिथे अन्य गुन्हेगारांचे नेहमीच फावणार. पुणे स्फोट मालिकेचे भारतात अन्य ठिकाणी घडविण्यात आलेल्या स्फोटांशी साम्य आहे, त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचाच भाग आहे. त्यामुळे यानंतर नजरेस पडणारी प्रत्येक संशयास्पद घटना तपासून पाहणे आवश्यक झाली आहे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply