गरमागरम चहाचा आस्वाद घेत असताना पेपरवाल्याने कधी नव्हे तो आज वेळेवर पेपर टाकला. पेपरच्या मुखपृष्ठावर एक मोठ्ठे छायाचित्र छापले होते. त्यात रस्त्याच्या कडेला खडी फोडत बसलेली मजूर स्त्री आणि तिच्या शेजारी नखशिखांत धुळीने माखलेला व रणरणत्या उन्हात मनसोक्त खेळत असलेला तिचा मुलगा दाखवला होता व त्या छायाचित्राखाली लिहिले होते- आज जागतिक महिला दिन ! अशा दिवसाची सर्वांना आठवण करून देण्यासाठी हताश, उदास, गरीब, अत्यंत कष्टप्रद काम करणा-या व नेसत्या वस्त्रांच्या चिंध्या झालेल्या महिलांचे भलेमोठे फोटो प्रसिद्ध करून या वर्तमानपत्रवाल्यांना त्यांच्या वाचकांपर्यंत नक्की कोणता संदेश पोहोचवायचा असतो, हे आजपर्यंत मला कळलेले नाही. आज जर ‘जागतिक महिला दिन’ आहे तर ‘जागतिक पुरुष दिन’ केव्हा साजरा करत असतील?, असा एक विचार विनाकारण मनाला चाळवून गेला. महिलांचे फोटो, त्यांच्या यशोगाथा व मुलाखतींने पेपरची सर्व पाने ओसंडून वाहत होती. टीव्हीवर काही वेगळे बघता येईल म्हणून प्रयत्न केला, तर ए नावाच्या चॅनेलपासून तर झेड नावाच्या चॅनेलपर्यंत एकूण एक वाहिन्या महिलांनी व्यापून टाकल्या होत्या. ‘कसा तुमच्या लक्षात राहत नाही आजचा दिवस तेच बघतो’, असा आज सर्वांनी चंगच बांधला असावा ! या सर्वांपासून दूर जाऊन एखादे आवडीचे पुस्तक वाचावे म्हणून उठणार, एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मी प्रचंड वैतागलो. आजची सुंदर सकाळ आपल्या मनाप्रमाणे घालवता येणार नाही याची खात्री पटल्यामुळे कपाळावर आठ्यांचे जाळे विणत अत्यंत अनिच्छेने दरवाजा उघडला, तर समोर आनंदाने निथळत असलेल्या चेह-याने हातात कसलातरी बॉक्स घेऊन तो उभा होता. दोन वर्षांपूर्वी इमारतीत वास्तव्यासाठी आलेल्या या व्यक्तीने कोणाशीही संबंध न ठेवल्यामुळे आज प्रथमच व अचानक तो स्वत: भेटायला आल्यानंतर माझा चेहरा प्रश्नचिन्हांनी भरून गेला. त्याने एकही क्षण वाया न घालवता तो बॉक्स माझ्या हातात ठेवला व त्याच्या तोंडातून दोन शब्द बाहेर पडले, ‘सर, पेढे !’ ‘अहो, पण कशाबद्दल?’ मीही वेळ वाया न घालवता प्रश्न विचारला. ‘मुलगा !’ त्याचे टेलिग्राफिक उत्तर ऐकून मी जवळपास ओरडलोच- ‘अहो, केव्हा झाला आणि इथे कोणालाच कसे माहीत नाही?’ गेली दोन वर्षे आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून त्याची बायको आम्हाला सतत दिसायची व त्या काळात ती गर्भवती असल्याचे एकदाही लक्षण दिसले नव्हते. त्यामुळे त्याच्या तोंडून ‘मुलगा’ हा शब्द ऐकल्याबरोबर मी उडालोच. माझी अवस्था त्याच्या लक्षात आल्यामुळे तो म्हणाला, ‘सर, मुलगा अजून झाला नाही, होणार आहे. डिलिव्हरीला अजून काही महिने वेळ आहे.’ त्याच्या या वक्तव्यावर मी अवाक् होऊन आळीपाळीने एकदा त्याच्याकडे व एकदा त्या पेढ्यांच्या बॉक्सकडे बघू लागलो आणि त्यानंतर हळूहळू माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला. माझ्या कोणत्याही प्रश्नाची वाट न बघता त्याने बोलायला सुरवात केली.
‘सर, तुम्हाला तर माहीतच आहे की मला शाळेत जाणारी एक मुलगी आहे. आम्हाला मुलगा नाही म्हणून काही वर्षांपासून आम्ही दोघेही खूप दु:खी होतो. शेवटी मी निर्णय घेतला की, आता आपल्याला मुलगा झालाच पाहिजे. माझी बायको गर्भवती आहे असे कळले, की मी डॉक्टरांकडे जाऊन तिची टेस्ट करून घ्यायचो. मुलगी असल्याचे कळले की लगेच गर्भपात. गेल्या तीन वर्षांत तिचा चारदा गर्भपात केला. पाचव्या खेपेला मुलगा असल्याचे कळले आणि वेळ वाया न घालवता सर्वांना पेढे वाटण्यास सुरुवात केली !’
त्याच्या बोलण्यातली सहजता व न लपवता येणा-या आनंदामुळे मला एका प्रचंड अस्वस्थतेने घेरून टाकले. माझ्याशी बोलत असलेला व स्वत:ला सुशिक्षित समजणारा एक माणूस पराकोटीच्या अशिक्षित व असंस्कृतपणाचे अत्यंत निर्विकारपणे प्रदर्शन करत माझ्यासमोर उभा होता. गप्प बसून ते सर्व सहन करणे अशक्य झाल्यामुळे माझ्या तोंडून नकळत प्रश्न निघून गेला, ‘साहेब, गर्भाचं लिंग ओळखण्याच्या चाचण्यांवर कायद्याने बंदी आहे, हे तुम्हाला माहीत आहे नं?’ तो मोठ्याने हसला व हसताहसता म्हणाला, ‘सर, अहो कुठल्या काळात जगताय तुम्ही? अशी बंदी आणल्याने का कधी काही गोष्टी थांबत असतात आपल्या देशात? तुमच्या दृष्टीने जी बंदी आहे ती अनेकांसाठी सुवर्णसंधी आहे. दारूबंदी असो की गर्भजल परीक्षेवर आणलेली बंदी, त्यात होत असते अनेकांची चांदी ! बंदी येण्याआधी ही चाचणी किती स्वस्त होती? पण बंदी आली आणि तिने अनेकांच्या बंगल्यांवर सोन्याची कौलं चढवली.’ माझ्या चेह-यावरील अविश्वास बघून त्याने नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबईतील चाचण्यांची ‘रेट लिस्ट’च मला ऐकवली. मी सुन्न होऊन त्याच्या चेह-याकडे बघत असताना त्याने माझा केव्हा निरोप घेतला हे माझ्या लक्षातही आले नाही. पुत्रप्राप्तीसाठी चार मुलींचा गर्भावस्थेतच खून पाडणारा एक सुशिक्षित बाप जागतिक महिला दिनाच्या दिवशी बिनदिक्कत सर्वत्र पेढे वाटत फिरत होता !
आपल्या महान देशाच्या उत्तरेकडील राज्यात मुलगी जन्माला येताच तिला दुधात बुडवून ठार मारण्यात येते, हे अनेक वर्षांपूर्वी ऐकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून सावरत नाही तोच राजस्थानात नवजात मुलींना मारण्यासाठी त्यांच्या तोंडात जळजळीत कॉस्टिक सोडा टाकण्यात येतो, तर काही स्त्रीलिंगी गर्भांना जन्म होताच यमसदनी पाठवण्यासाठी त्यांना गरम वाळूच्या पोत्यात भरून व त्या पोत्याचे तोंड करकच्च बांधून त्याला कडक उन्हात ठेवण्यात येते, हे वाचल्यानंतर माझा मनुष्यप्राण्यावरील विश्वास उडण्यास सुरुवात झाली. मला कळेना की या जगात सर्वात क्रूर नक्की कोण? या पृथ्वीवरील ज्यूंना नामशेष करण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ करणारा हिटलर, की मुलीला आईच्या पोटातच संपवणारे किंवा तिचा जन्म होताच अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करणारे तिचे सख्खे जन्मदाते, की त्या हत्या करण्यासाठी घसघशीत फी आकारून उत्साहाने मदत करणारे पांढ-या डगल्यातील सोफिस्टिकेटेड राक्षस?
पेढे वाटणा-या शेजा-याचा आनंदी चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. जागतिक महिला दिनानिमित्त सकाळपासून वर्तमानपत्रात व टीव्हीवर सावित्रीबाई फुले, मादाम क्यूरी, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, कल्पना चावला व अनेक जगप्रसिद्ध महिलांचे गायले जात असलेले गोडवे माझ्या कानांमधून मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. सतत गर्भपात करणे अत्यंत धोकादायक असते व त्यात स्त्रीला स्वत:चा जीवही गमवावा लागू शकतो, ही माहिती चार गर्भपातांनंतर मुलाला जन्म देण्याच्या तयारीत असलेल्या त्या गर्भवतीपर्यंत पोहोचवण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा तिचे उत्तर होते – ‘माझा जीव गेला असता तरी चाललं असतं, पण मलाही मुलगाच पाहिजे होता !’
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply