नवीन लेखन...

पेशींचे मर्म आणि ‘योशिनोरी अोशुमी’

शरीरातील पेशींच्या विघटनाचे मर्म कळले तर आज दुर्धर वाटणार्‍या अनेक विकारांवर विजय मिळवणे शक्य होईल.  ‘वैद्यकाचे’ नोबेल विजेते ‘योशिनोरी अोशुमी’ यांनी हेच अनमोल काम केले आहे.

२०१६ या वर्षीचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार योशिनोरी अोशुमी या ‘टोकियो इन्स्टिट्यूट अॉफ टेक्नॉलॉजी’ या प्रतिष्ठित संस्थेतील विख्यात जपानी संशोधकास त्यांच्या ‘पेशीविघटन व पुर्नवापर प्रक्रिये’वरील मूलभूत संशोधनासाठी बहाल करण्यात आला आहे. ‘स्टॉकहोम’ येथील नोबेल कमिटीद्वारे २०१६ सालचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करताना डॉ. योशिनोरी अोशुमी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

पेशी तसेच पेशीतील अनेक घटकांचा नाश का व कसा होतो हे शास्त्रज्ञांपुढचे एक मोठे कोडे होते. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ या विषयावर सतत संशोधन सुरु आहे. या प्रक्रियेविषयीच्या संशोधनास साठच्या दशकापासून जोमाने सुरुवात झाली व शास्त्रज्ञांनी या प्रक्रियेचा सखोल अभ्यास सुरु केला. पेशी स्वभक्षण प्रक्रियेत पेशीतील घटकांचा नाश पेशींद्वारे या घटकांना पेशीतील पातळ पापुद्रयात बंदिस्त करुन त्यांचा विनाश केला जातो. सन १९६३ साली क्रिश्चिएन डुवे या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाने पेशीतील घटकांचे विघटन व त्यांचा पुर्नवापर होण्याच्या या प्रक्रियेचे ‘पेशी स्वभक्षण प्रक्रिया’ असे नामकरण केले.

पेशीविघटनाची प्रक्रिया ही पेशीचक्रातील एक नैसर्गिक अभिक्रिया असून पेशीतील वितंचकांद्वारे पेशीतील अनेक घटकांचे विघटन केले जाते आणि त्यातील काही घटकांचा पुर्नवापरही केला जातो. या प्रक्रियेमुळे पेशी संतुलित राहण्यास मदत होते. डॉ. अोशुमींनी ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी सखोल संशोधन सुरु केले. किण्वन प्रक्रियेत वापरल्या जाणार्या यीस्ट पेशींवर प्रयोग करुन पेशी स्वभक्षणाची प्रक्रिया या पेशीत घडून येते, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले. यीस्ट पेशींची वाढ विशिष्ट परिस्थितीत केल्यास यीस्ट पेशीतील काही घटकांचा नाश होतो, हे डॉ. अोशुमींनी सप्रमाण सिद्ध केले. या संशोधनाच्या पुढच्या टप्प्यात पेशीतील स्वभक्षण प्रक्रिया नियंत्रित करणार्या जनुकांचा शोध लावण्यात अोशुमींना यश मिळाले आहे.

पेशीभक्षण प्रक्रियेचे अंतरंग स्पष्ट करत ही प्रक्रिया नियंत्रित करणारी एकूण १५ जनुके डॉ. अोशुमींनी शोधून काढली आणि यीस्ट पेशीतील पेशीभक्षण प्रक्रियेप्रमाणेच सर्व सजीवांतील पेशीतही ही पेशीविघटन आणि पुर्नवापर प्रक्रिया घडत असते, असे प्रतिपादन करत पेशीविघटनाच्या प्रक्रियेत पेशीतील अॉटोफॅगोझोम्सद्वारे पेशीघटकांचे विघटन केले जाते, असे सिद्ध करत डॉ. अोशुमींनी पेशीविघटन व पुर्नवापर प्रक्रिया उलगडून दाखविली.

पेशी विघटनाची प्रक्रिया ही पेशीसाठी एकीकडे अत्यंत आवश्यक असते तर दुसरीकडे याच प्रक्रियेमुळे अनेक समस्याही निर्माण होतात. पेशीतील काही घटकांचे विघटन करुन त्यांचा वापर पेशींना ऊर्जा देण्यासाठी करण्यात येतो. पेशीवर हल्ला करणार्या जीवाणू तसेच विषाणूंचा नाश करण्यासाठीही विघटनाची प्रक्रिया आवश्यक ठरते तसेच पेशीतील अनावश्यक घटकांचा नाश करण्यासाठीही पेशी स्वभक्षणाची प्रक्रिया आवश्यक ठरते. पण पेशीभक्षणाच्या या मूलभूत प्रक्रियेत जर बिघाड निर्माण झाला किंवा या प्रक्रियेसाठी आवश्यक असणार्या जनुकांत उत्परिवर्तनामुळे बदल घडून आला तर मात्र संपूर्ण पेशींचे विघटन होऊन अल्झायमर किंवा मधुमेहासारखे दुर्धर आजार निर्माण होऊ शकतात. पेशी विघटनाच्या प्रक्रियेत बिघाड निर्माण झाल्यास कॅन्सरसारख्या व्याधीही उद्भवू शकतात.

पेशीस्वभक्षण प्रक्रिया उलगडल्यामुळे अनेक दुर्धर आजारांवर मात करता येणं आज शक्य झालं आहे. पेशीभक्षणाची ही मूलभूत प्रक्रिया उलगडण्यात डॉ. अोशुमींचे संशोधन अत्यंत मोलाचे आहे. अल्झायमर, मधुमेह, कर्करोग तसेच व्रुद्धापकाळी निर्माण होणार्या स्म्रुतिभ्रंशावर मात करण्यासाठी पेशीभक्षण प्रक्रिया रोखून जनुकीच स्तरावर उपचार पद्धत विकसित करता येणे शक्य झाले आहे.

नोबेल पारितोषिकाची घोषणा झाल्यावर त्याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. अोशुमी यांनी पेशीस्वभक्षणाची प्रक्रिया शरीरात सतत चालणारी प्रक्रिया असून एकीकडे नवीन पेशींची निर्मिती होत असताना शरीरातील पेशींचा विनाशही होत असतो आणि हेच जीवनाचे सत्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

– डॉ. सिद्धीविनायक बर्वे

— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..