‘पैज्या’ अॅंजेलो
4 ऑगस्ट 1975 : मायकेल अॅंजेलोचा इतिहास-प्रवेश. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या लॉर्ड्स कसोटीची अनिर्णित अवस्थेकडे वाटचाल सुरू होती. चौथा दिवस. दुपारी तीन वाजून वीस मिनिटे. भयंकर उकाड्याचे दिवस. उष्णतेने सर्वजण घामाघूम झालेले असताना एका इसमाने पैज म्हणून अंगावरील सर्व कपडे काढले आणि मैदानात धाव घेतली. हा एका जहाजावर खानसामा होता (स्वयंपाक्या) आणि त्या दिवशी पाच तास एका खानावळीच्या भट्टीसमोर तो वैतागला होता. कोलांट उड्या मारत मारत तो आला. एखाद्या अडथळ्यांच्या शर्यतीतील अडथळ्याप्रमाणे त्याने नर्सरी एन्डच्या यष्ट्यांवरून उड्या मारल्या आणि माऊन्ड स्टॅंडकडे पोचला. खेळाडू हास्यकल्लोळात बुडून गेले. पलीकडच्या बाजूला पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने पुढे त्याला पैजेच्या रकमेइतकाच 10 पौंडांचा (सुमारे 800 रू.) दंड ठोठावला. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (बीबीसी ही तटस्थतेसाठी प्रसिद्ध असलेली एक स्वायत्त वृत्तसंस्था आहे) टेस्ट मॅच स्पेशल कार्यक्रमाचा मुरलेला समालोचक जॉन अॅर्लॉटही भांबावला आणि ओरडला – ‘हा अद्भुत मनुष्य आहे.’
नरेंद्र ताम्हाणे
4 ऑगस्ट 1931 रोजी बॉम्बेत नरेंद्र शंकर ताम्हाणेंचा जन्म झाला. हे होते खरे तर गोलंदाज पण क्लबमध्ये एकदा नियमित रक्षक नसताना त्यांनी अंगठा आणि त्याच्याशेजारच्या बोटाला एकत्र बांधून ठेवणारे मोजे घातले आणि आपल्यातील एका उत्कृष्ट क्षमतेचा त्यांनाच परिचय झाला. १९५४-५५च्या हंगामातील भारताच्या पहिल्यावहिल्या पाकिस्तान दौर्यात रक्षक म्हणून त्यांचा संघात समावेश झाला. या दौर्यात त्यांनी विनू मंकडची डावखुरी मंदगती गोलंदाजी आणि सुभाष गुप्तेची लेगस्पिन गोलंदाजी [टप्पा पडल्यानंतर ज्या बाजूकडे चेंडू वळतो, त्याच्या विरुद्ध बाजूच्या नावाने ती फिरक ओळखली जाते, आहे की नाही फिरकी! – म्हणजे उजव्या हाताने खेळणार्या फलंदाजासाठी टप्पा खाऊन उजवीकडून डावीकडे येणारा चेंडू, म्हणजे तोंडाकडच्या बाजूला वळणारा चेंडू लेगस्पिन] अगदी सहजतेने ‘घेतली’. पदार्पणाच्या कसोटीतच त्यांनी पाच ‘पाक’रे टिपली. या मालिकेतील त्यांच्या १९ बळींमध्ये ७ यष्टीचितांचा समावेश होता. पाच सामन्यांच्या मालिकेतील त्यांचा हा विक्रम आजही कायम आहे. एकदाच – सहा सामन्यांच्या मालिकेत सय्यद किरमाणी – त्याची बरोबरी करू शकले आहेत. एकच विटी (बेल) उडविण्याची त्यांची खासीयत होती. एकूण २१ कसोट्यांत १६ यष्टीचितांसह त्यांनी ५१ गडी माघारी पाठविले. क्षमता असूनही त्यांना फलंदाजीत यश मिळाले नाही. नंतर नाना जोशी आणि बुधी कुंदरन यांना फलंदाजीमुळे प्राधान्य देण्याच्या निवडसमितीच्या धोरणामुळे त्यांना फारशी संधी मिळाली नाही. १९ मार्च २००२ रोजी मुम्बईत त्यांचे निधन झाले.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply