पोटाच्या एक्स-रेमध्ये त्यातील इंद्रियांची माहिती फारशी कळत नाही हे आपण मागील सदरामध्ये पाहिले. त्यातल्या त्यात स्वस्त दरात पोटाची सखोल माहिती माहिती मिळवण्यासाठी सोनोग्राफी खूप मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते. यामध्ये मुख्यत्वे यकृत, प्लीहा, स्वादुग्रंथी, पित्ताशय, मुत्रपिंडे, मुत्राशय, मोठ्या धमन्या व नीला स्पष्ट दिसतात. आतडी, पोट हे सोनोग्राफीवर स्पष्ट दिसत नाहीत. फुफ्फुसे देखील सोनोग्राफीवर स्पष्ट दिसत नाहीत. फुफ्फुसाखाली साचलेले पाणी (फ्लुरसी) आणि पोटात साचलेले थोडेसे पाणी (असायटिस) हे सोनोग्राफीवर ताबडतोब दिसून येते.
याची मुख्यत्वे दोन कारणे असू शकतात, टिबी आणि कॅन्सर, सोनोग्राफीच्या मदतीनेच हे पाणी काढून त्याची परीक्षा घेऊन रुग्णाला नक्की काय रोग आहे ते ठरवता येते. सोनोग्राफीच्या सर्व प्रतिमा मुख्यत्वे कृष्णधवल (ग्रेस्केल) रंगामध्येच येतात. परंतु क्वचित धमन्या व नीला यांचा अभ्यास करण्यास कलर डॉपलर व कलर फोटो काढले जातात. सोनोग्राफीच्या परीक्षणाला रियलटाइमस्टडी असे म्हणतात. कारण यात आत होणार्या हालचालींची प्रत्यक्ष माहिती होते. पेशंटला उलटे-सुलटे झोपवून आतील साचलेल्या पाण्याची हालचाल, पित्ताशयातील खड्यांची हालचाल स्क्रिनवर दिसून येते. बाळंतिणीच्या गर्भाची हालचालही दिसते.
सोनोग्राफी अॅबडॉमेन (पोट) विशेष करुन लिव्हर (यकृत) मधील अॅबसेस, वाढलेले लिव्हर, दारु पिऊन खराब झालेले लिव्हर, लिव्हरचे कॅन्सर, पित्ताशयाचे रोग, गॉल स्टोन्स, अपघाताने फुटलेली प्लीहा (स्प्लिन), मलेरियामध्ये मोठे झालेले स्प्लिन, स्वादुग्रंथीचे आजार, किडनी स्टोन, व फुगलेली किडनी, दोन सें.मी. पेक्षा मोठी लिंफनोड तसेच मुत्राशय व मुत्राशयाखाली असलेली ग्रंथी (प्रॉस्टेट) या सर्वाचा अभ्यास करता येतो.
पुरुषांमध्ये असलेली प्रॉस्टेट या ग्रंथीचा अभ्यास एका स्पेशल प्रोबने करता येतो. त्याला टि.आर. (टान्स रेक्टल) म्हणतात. तो गुद्दद्वारामार्फत आत घालून प्रॉस्टेट या छोट्या ग्रंथीचा अभ्यास जास्त स्पष्टपणे करता येतो.
डाव्या बाजूला फासळ्यांना मार लागला असेल व डावा खांदा दुखू लागला तर त्वरित सोनोग्राफी केलीच पाहिजे कारण प्लिहा फुटलेली असते व रुग्ण दगावण्याची शक्यता असते. याचे निदान सोनोग्राफी त्वरित करते.
या तपासात फोटो काढून ६०० – ७०० रुपयांत तपास होऊ शकतो व गरिब पेशंटमध्ये फोटो न काढता २०० -३०० रुपयांत तपास होत असल्याने पोटाच्या तक्रारीमध्ये हा तपास सर्व रुग्णांनी करणे अवघड नाही.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply