काही व्यक्तींना नाविन्यपूर्ण, जगावेगळे काहीतरी करण्याचा छंद असतो. त्याच ध्यासातून ती व्यक्ती कामास लागली तर एखादी अद्भूत कलाकृती निर्माण होऊ शकते. अशाच छंदातून नाशिक येथील दिनेश वैद्य यांनी पौराणिक हस्तलिखितांचे संगणकावर डिजिटलायझेशन करुन पौराणिक ऐतिहासिक वारसा जपण्याचा उपक्रम सुरु केला आहे.जुन्या काळातील गणिताचे सिद्धांत असलेला लिलावती टाका हा ग्रंथ नाशिकमध्ये शोधावयाचा झाला तर काळाराम मंदिराच्या बाजूला राहणाऱ्या दिनेश वैद्य या तरुणाकडे जावे लागेल. केवळा गणितच नव्हे तर भूमिती, जैवभौतिकी अशा पुरातन शास्त्रांची माहिती असलेल्या जुन्या हस्तलिखित पोथ्यांची लाखो पाने त्यांनी डिजिटल स्वरुपात जतन करुन ठेवली आहेत. गेल्या साडेतीन वर्षापासून त्यांचा हा अनोखा उपक्रम सुरु असून भविष्यात आणखीही दुर्मिळ पोथ्या आणि ग्रंथांचा डिजिटल संग्रह करण्याचा त्यांचा मानस आहे.सतराव्या शतकातील अपा मार्जन स्तोत्र, सोळाव्या शतकातील जैवभौतिकीचे स्वरुप स्पष्ट करणारे स्त्रोत अशा वैज्ञानिक ग्रंथापासून पौराणिक, वैदिक अशा सर्व जुन्या ग्रंथाचा आणि पोथ्यांचा संग्रह त्यांच्याकडे सापडतो. या सर्व ग्रंथाचे अवलोकन केले तर भूमिती, गणित आणि विज्ञानात भारतीय संस्कृती किती पुढारलेली होती त्याचा प्रत्यय येतो. धातूशास्त्रातील ग्रंथामुळे पूर्वी भारतातील धातूशास्त्र तुलनेने किती प्रगत होते, हे लक्षात येते. यातील काही ग्रंथ प्राकृत, पाली आणि संस्कृत भाषेतील आहेत. वैद्य यांनी नगर, नाशिक व जळगांवपासून ते थेट इंदरूला जाऊन हे ग्रंथ मिळविले आहे. तर काही पोथ्या नाशिकमधील गर्गे, महाशब्दे, भानोसे यांच्या संग्रहातील आहेत. काही पोथ्या मिळविण्यासाठी वैद्य यांना अनेकदा आर्थिक झळी सोसावी लागली आहे. मा त्र आवडीचे काम म्हणून त्यांनी हा छंद सुरु ठेवला आहे. आलेल्या पोथ्या अनेकदा खराब अवस्थेत असतात त्या जुळवून त्यांचे स्कॅनिग करावे लागते. याकामी अनिता जोशी नावाच्या सहकारी यांना मदत करतात. संगणक, लॅपटॉप, डिजीटल कॅमेरा आणि स्कॅनर या आधुनिक साधनांच्या सहाय्याने ते पोथ्यांचे डिजिटलायझेशन करतात. वैद्य आपल्या छंद जोपासण्याबद्दल बोलताना म्हणतात, पोथ्यांच्या डिजिटलायझेशनमधून आपल्या साहित्य आणि संस्कृतीचा जुना ठेवा जतन करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. केवळ जुन्याच नव्हे, तर आधुनिक पुस्तकांचेही संगणकीकरण करण्यात आले आहे. जुन्या पोथ्या आणि ग्रंथ अनेकांकडे असतात त्यांनी ते संगत विसर्जित न करता माझ्याकडे दिल्या तर त्या डिजिटल स्वरुपात जतन करता येतील.दिनेश वैद्य हे पौरोहित्याचे काम करतात. ते उच्च शिक्षित आहेत. पौरोहित्याचे काम करीत असताना त्यांना काही जुन्या पोथ्यांची गरज भासली, त्या शोधण्यासाठी त्यांना फारच त्रास झाला. शेवटी एका ठिकाणी त्यांना पोथ्या मिळाल्या. सदर व्यक्तीने सदर पोथ्या त्याच दिवशी परत मागितल्या. तेव्हा वैद्य यांनी सदर पोथ्या स्कॅन करुन संगणकात डिजिटल स्वरुपात जतन केल्या. यातून त्यांना जुन्या आणि दुर्मिळ पोथ्या डिजिटल स्वरुपात संगणकावर जतन करण्याचा छंद लागला.वैद्य यांच्याकडे साडे तीन लाख चार हजार पाने डिजिटल स्वरुपात जतन करण्यात आली आहेत. त्यांच्या या उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेऊन राष्ट्रीय पातळीवरचा विक्रम असा उल्लेख प्रमाणपत्रात केला आहे.हा छंद खरोखरच स्तुत्य असून प्रत्येकाने एक वेळ अवश्य भेट द्यावी अशा या ऐतिहासिक वारसा जतन करण्याऱ्या उपक्रमाबद्दल वैद्य यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.अशोक साळी यांचा लेख – “महान्यूज” या शासकीय वेबसाईटवरुन साभार…..
— मराठीसृष्टी
Leave a Reply