आपला नेहमीचा ओळखीचा म्हणजे ज्यात पाहून आपण भांग पाडतो किंवा वेणी घालतो तो आरसा म्हणजे साधा सपाट आरसा. त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि सपाट असतो. त्याच्यावर कोणताही खडबडीतपणा म्हणजेच उंचसखल भाग नसतात. असलेच तरी ते इतक्या छोट्या आकारमानाचे असतात की त्यांची लांबी ही प्रकाशकिरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्ती नसते. तशी ती असली तर मग त्या आरशातल्या उंचसखल भागामुळं त्याच्यात उमटणारी प्रतिमाही विकृत होते. नेहमीसारखी वस्तूएवढ्याच आकाराची, त्याचे घाट व्यवस्थित दाखवणारी नसते. तिला वेडेवाकडे कंगोरे फुटतात. याचं कारण म्हणजे त्यातला प्रत्येक उंचसखल भाग वेगवेगळी प्रतिमा तयार करतो. मग ती प्रतिमा एकसंध तर राहत नाहीच. शिवाय त्यातल्या प्रत्येक प्रतिमेची प्रतिमा इतर भागामध्ये उभी राहते.
या सार्याची सरमिसळ होऊन जी प्रतिमा उभी राहते ती विकृत असते. जत्रेमध्ये अशाच प्रकारचे आरसे ठेवलेले असतात. म्हणून तर त्यांच्यात अशा चित्रविचित्र प्रतिमा उमटतात आणि त्या प्रतिमांची ती विकृत रुपं हसवून सोडतात. पण गुळगुळीत असलेला प्रत्येक आरसा सपाट असेलच असं नाही. आरशांचा पृष्ठभाग वक्राकार असू शकतो. तो आतल्या बाजूला वाकलेला म्हणजेच अंतर्वक्र असू शकतो किंवा बाहेरच्या बाजूला वाकलेला म्हणजेच बहिर्वक्र असू शकतो. अशा आरशांमध्ये उमटलेल्या प्रतिमा आकारानं कधी मोठ्या तर कधी छोट्या झालेल्या असतात. या शिवाय काही लंबगोलाकार असतात तर काही पॅरॅबोलाचा आकार धारण करणारे असतात.
लंबगोलाकार आरशांवर पडलेल्या समांतर किरणांची प्रतिमा एका रेषेवर उमटते. पॅरॅबोलाच्या आकाराच्या आरशांच्या केंद्रबिंदूवर प्रतिमा उमटते. त्यामुळे तिची झळाळी वाढते. फ्लडलाईटमध्ये किंवा मोटारींच्या समोरच्या दिव्यांमध्ये अशा प्रकारच्या आरशांचा वापर करून त्यातल्या प्रकाशाची प्रखरता वाढवली जाते. दुर्बिणींमध्येही आरशांचा वापर मुख्यत्वे दूरदूरच्या तार्यांवरून येणारा अंधुक प्रकाश व्यवस्थित गोळा करून तो एका जागी केंद्रित करण्यासाठी होतो. तसं केल्यानं त्या तार्यांचीही स्पष्ट प्रतिमा मिळवता येते.
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply