लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. हे पेशाने वास्तुविशारद होते. त्यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला.
कथा,ललित लिखाण, नाटक अशा सर्व लेखनप्रकारात उत्तम लिखाण करणारा हा लेखक व पुं चे विशेष म्हणजे कथेला एकदम शेवटी कलाटणी देण्याची ताकद …
आणि जाता जाता जीवन विषयक तत्वज्ञान थोडक्यात सांगुन जायची त्यांची हातोटी .पण सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी मिळवणार्याज काही मोजक्या लेखकांमध्ये वपुंचा समावेश होतो हे नक्की “वपुर्झा” हे असाच उदात्त पुस्तक.. कधीही, कुठलाही पण काढून वाचा.. काही घरात अत्तराच्या बाटल्या टेबलावर मांडून ठेवलेल्या असतात.. ज्याच्या त्याच्या मूड प्रमाणे जो तो अत्तर काढून लावत असतो. तसंच काहीस या पुस्तकाचं आहे.. आणि म्हणूनच त्याला अनुक्रमणिका, संदर्भ, क्रमांक अस काहीही नाही!
वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही व भावनाप्रधान आहेत पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आद्रतेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातली माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्याद लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौदर्य आहे, तोरा आहे.. म्हणूनच हे लेखन कागदांपेक्षा मनात जास्त वेळ जतन करून ठेवलं जात आहे. “आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत. तसंच “तप्तपदी”, “ठिकरी”, “पार्टनर”, “ही वाट एकटीची” यासारख्या कादंबरी खुपच गाजल्या; व.पु काळेंना “महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान”, “पु.भा.भावे पुरस्कार”, “फाय फाउंडेशनाचा पुरस्कार” आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले. व.पु काळे यांचे २१ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वपु काळे यांच्या पुस्तकांसाठी खालील लिंक.
http://www.mehtapublishinghouse.com/book-details/Va-Pu-Kale-Combo-47-Books/1682.aspx
http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a77962&lang=marathi
व. पुं च्या “नवरा म्हणावा आपला” पुस्तकातला हा किस्सा….
(वसंत आणि त्याची पत्नी अरुणा यांच्या मधला…वसंताच्या मनातले)
पुष्कळदा अस्वस्थ वाटत असलं म्हणजे कुणी तरी अगदी जवळ नुसतं बसावं ,
किंवा कुणाच्या तरी कुशीत शिरावं हीच माणसाला ओढ असते,हि …इच्छा पुरी होत नाही .
तिथंही मन मारावं लागतं.अधूनमधून मला हा आधार लागतो.
ह्याची अरुणाला जाणीव आहे. पण आठच दिवसांपूर्वी सहज बोलता बोलता ती शेजारच्या बाईंना म्हणाली,
“कुठं निवांतपणी जावं , राहावं असं एकही घर नाही .”
— माझ्या कानावर हे वाक्य पडलं आणि वाटून गेलं, आपण सगळी सुबत्ता असूनही ‘पोरके’ आहोत.
आणि ह्याच वेळेला दुसरी जाणीव झाली कि, आपल्या एवढीच अरुणा पोरकी आहे . माझ्या व्यथेमध्ये
सहभागी होणारा कुणी नाही, म्हणून मी जेवढा कष्टी आहे तेवढीच अरुनाही कष्टी आहे,
आणि पोरकेपणा म्हणजे तरी नक्की काय हो ?
आपली व्यथा इतरांना न समजने हाच पोरकेपणा.
आपल्या व्यथा स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात तेवढ्याच त्या इतरांना मामुली वाटतात.
हेच एकटेपण, पोरकेपण, केव्हा केव्हा हे पोरकेपण आपण लावून घेत नाही. जीवनात असंच असतं, असं म्हणतो .
स्वतःची समजूत स्वत: घालतो , पण कुठेतरी ठिणगी पेटते आणि मग सगळं खाक होतं.
असा हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडतं. कारण ज्याला आच आहे, जळून जाण्याची ताकद आहे तोच माणूस आहे.
पण त्याच वेळेला मला हे असं कापराचं जळणं आवडत नाही, ह्याचं कारण मागं काही उरत नाही .
तसं जळणं नको. राखेच्या रुपात का होईना- मागं काही तरी राहायला हवं.
कारण राखेतून काही तरी निर्माण होण्याची आशा असते.
Leave a Reply