जेव्हा एखादी वस्तू आरशासमोर उभी केली जाते तेव्हा त्या वस्तूपासून निघणारे असंख्य किरण त्या आरशाच्या पृष्ठभागावर जाऊन पडतात. प्रत्येक किरण त्या पृष्ठभागाशी वेगवेगळा कोन करत असतो. त्यामुळं अर्थातच तिथून परावर्तित होणारे किरणही वेगवेगळ्या कोनातून परत फिरतात. अर्थात ते सर्वच किरण एका विशिष्ट नियमाच्या चौकटीतच आपली दिशा ठरवतात. येणारा किरण आरशाच्या पृष्ठभागाशी जो कोन करतो त्याच कोनातून पण पलिकडच्या बाजूला तो परत फिरतो.
कॅरम खेळताना जेव्हा एखादी सोंगटी स्ट्रायकरच्या मारापायी पलीकडच्या कडेवर आपटते तेव्हा ती कशी पलीकडच्या बाजूला परत फिरते, तसेच हे किरणही वागत असतात. त्यामुळे जसे वस्तूपासून निघणारे असंख्य किरण आरशाशी वेगवेगळ्या कोनातून भिडतात तसेच हे परत फिरणारे किरणही वेगवेगळे कोन करतात. पण या सर्व परावर्तित किरणांचा उगम कुठं आहे याचा वेध घेतला तर ते आरशाच्या पाठीमागे असलेल्या एका बिंदूपासून येत आहेत असं वाटतं. त्या वस्तूची प्रतिमाच त्या बिंदूच्या ठिकाणी असते. म्हणूनच त्या आरशाकडे वेगवेगळ्या जागेवरून पाहणार्या प्रत्येकाला ती प्रतिमा एकाच जागी असल्याचं दिसतं. आरशापासून जेवढ्या अंतरावर ती वस्तू असेल तेवढ्याच अंतरावर पण आरशाच्या पाठीमागे ती प्रतिमा उभी असते. आरशाच्या पाठीमागे डोकावून पाहिल्यास तिथं काहीच दिसणार नाही. फक्त आरशाच्या पुढं उभं राहून पाहिलं तरच ती प्रतिमा दिसते.
याचा अर्थ ती प्रतिमा आभासी असते असाच करायला हवा. म्हणून तर अल्लाऊद्दीन खिलजीला पद्मिनीची अशी प्रतिमाच दाखवली गेली. ती जिथं दिसली तिथं काही पद्मिनी खरोखरीच उभी नव्हती. अल्लाउद्दीनला मात्र ती तिथं असल्याचंच वाटलं आणि तिला पकडायला तो तिथं गेला आणि मयसभेतल्या कौरवांसारखी त्याचीही फसगतच झाली. खरी वस्तू आणि तिची प्रतिमा यांच्यातला हाच तर फरक आहे.
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply