बर्याच वर्षांपूर्वी इटलीतील एका शहरातील एका शाळेत घडलेली ही एक घटना. वर्गात एक शिक्षक अतिशय तन्मयतेने शिकवित होते. त्याचवेळी वर्गाच्या खिडकीच्या बाहेर एक मुलगा उभा राहून ते काय शिकवितात हे लक्ष देऊन ऐकत होता. त्या मुलाचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले होते, पायात चप्पलही नव्हती. हा मुलगा खिडकीपाशी उभा राहिल्याने वर्गातील मुलांचे लक्ष सारखे त्याच्याकडे जात होते. त्या शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली.
आपण इतके तन्मयतेने शिकवित आहोत व एकाही मुलाचे लक्ष नाही, व त्याला कारणीभूत तो मुलगा आहे हे पाहून ते अतिशय संतप्त झाले व त्याच अवस्थेत ते वर्गाबाहेर आले व त्यांनी त्या मुलाला खडसावून विचारले, ” इथे उभा राहून काय करतोस?”
त्यावर तो गरीब मुलगा घाबरत म्हणाला, ” सर, मी तुम्ही काय शिकवता ते ऐकत होतो. परंतु माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर उद्यापासून मी येथे उभा राहणार नाही. ”
त्या गरीब मुलाच्या तशा अवतारातही त्या शिक्षकाला त्याच्या डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक दिसली. ते त्याला म्हणाले,” तुला शिक्षणाची आवड आहे तर मग शाळेत का येत नाहीस?”
त्यावर तो मुलगा खाली मान घालून म्हणाला, ” सर, माझे वडील साधे मजूर आहेत. त्यांना माझ्या शाळेची फी परवडत नाही म्हणून मला शाळा अर्धवट सोडावी लागली. ”
हे सांगताना त्या मुलाला गहिवरून आले. तरीही त्या शिक्षकाचा प्रथमदर्शनी त्या मुलावर विश्वास बसला नाही. ते त्याला म्हणाले, ‘ ‘मी काल वर्गात काय शिकविले हे तू सांगू शकशील काय?” त्यावर त्या मुलाने लगेच आदल्यादिवशी त्यांनी काय शिकविले ते सांगितले.
त्याची स्मरणशक्ती पाहून शिक्षक दंगच झाले. त्यानंतर ते त्याला म्हणाले, ” शाळेच्या फीची मुळीच काळजी करू नकोस. उद्यापासून सरळ वर्गात येऊन बसत जा. ”
त्याप्रमाणे तो विद्यार्थी शाळेत शिकू लागला व प्रत्येक वर्षी तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेला. मोठेपणी हाच मुलगा प्राध्यापक होऊन प्रसिद्ध लेखकही झाला. त्याचे नाव होते लुडव्हिक अँटोनिओ म्युरोहोरी..
(थोरांच्या गोष्टी या संग्रहातून)
मला ही कथा एकूण गहिवरून आले.