नवीन लेखन...

प्रशांत भूषण यांची काश्मीरातील लष्कर हटविण्याची देशद्रोही मागणी

आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी पक्षासमोर नवे संकट उभे केले आहे. प्रशांत भूषण हे काही काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक नाहीत .ते आम आदमी पक्षाच्या काश्मीरविषयक समितीचे सदस्य आहेत. जम्मू-काश्मीरमधील लष्कर हटवावे, अशी मागणी त्यांनी केली. काश्मीरातील लष्कर हटविण्याची मागणी करण्यामागे अल्पसंख्यकांची गठ्ठा मते गोळा करण्याचा या पक्षाचा विचार असेल तर तो त्या पक्षालाच महागात पडणार आहे. अशा देशघातकी मागण्यांचे कोणताही देशप्रेमी समाज कदापि समर्थन करू शकणार नाही.
जम्मू-काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पाकिस्तानने वारंवार केलेली आहे. पाकिस्तानला काश्मीरमध्ये धुडगूस घालायचा आहे, परंतु जोपर्यंत तिथे लष्कर आहे तोपर्यंत त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे ज्या-ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली त्या प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या नेत्यांनी काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पुढे केली. भूषण यांना ही गोष्ट समजत नाही की, पाकिस्तान सरकार जी मागणी करते तीच आपण करता कामा नये. परंतु भारतामध्ये काही स्वयंघोषित मानवाधिकारवादी नेते आहेत. भारतीय लष्कराकडून काश्मिरी लोकांचा छळ होतो, अशी अधूनमधून आवई ते उठवत असतात. नेमका भूषण यांनी असे वक्तव्य करून तोच राग आळवला. काश्मीरातील फुटीर गट आणि त्यांच्या जीवावर राजकारण करणारे काही स्थानिक मतलबी राजकीय नेते त्यांच्या देशघातकी, समाजघातकी डावपेचासाठी जी मागणी सातत्याने करीत आहेत. तीच मागणी आम आदमी पार्टीच्या प्रशांत भूषण यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषित आणि ज्येष्ठ नेत्याने उचलून धरावी, ही त्या पक्षाच्या भावी राजकारणाबद्दल संभ्रम निर्माण करणारी बाब आहे.
पक्षाच्या भावी वाटचालीचे दर्शन?
काश्मीरमधील भारतीय लष्कर हटविण्याची `आम आदमी’ पार्टीचे नेते प्रशांत भूषण यांनी केलेली मागणी केवळ वादग्रस्तच असून त्या पक्षाच्या भावी वाटचालीचे दर्शन घडविणारी अशीच आहे. गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमधील पाकिस्तानधार्जिण्या फुटीर शक्तींनी आणि भारतविरोधी राजकारण करणार्‍या राजकीय धेंडांनी भारतीय लष्कराविरोधात विषारी प्रचाराची मोहीम चालविली असून तेथील भारतीय लष्कर हटविण्याची मागणी लावून धरली आहे. `एकदा तेथील लष्कर हटविण्यात आले की मग आपल्या दहशतवाद्यांना हैदोस घालण्यास मोकळे रान मिळेल’ असे त्या भारतविरोधी शक्तींना वाटत असेल तर त्यात नवल नाही. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या या प्रदेशावर शेजारील पाकिस्तानचा गेल्या ६५ वर्षांपासून असलेला डोळा, काश्मीरचा अर्धा भाग घशाखाली घालून राहिलेल्या पाकिस्तानने उर्वरित काश्मीर गिळंकृत करण्यासाठी वेळोवेळी केलेली आक्रमणे आणि घुसखोर दहशतवाद्यांमार्फत या रमणीय प्रदेशाला रक्तलांच्छित बनविण्याचे सातत्याने चाललेले प्रयत्न लक्षात घेता भारतीय लष्कराचे तेथील अस्तित्व अनिवार्य ठरले आहे. या वस्तुस्थितीची जाणीव असलेला आणि राष्ट्राच्या सुरक्षेचे महत्त्व ओळखणारा कोणीही देशप्रेमी नागरिक काश्मीरातील भारतीय लष्कराला हटविण्याची मागणी करणार नाही.
प्रशांत भूषण म्हणाले, ‘आप’ केंद्रात सत्तेत आल्यास काश्मीरातून सुरक्षा दले काढून घेणे व सशस्त्र दलाच्या विशेषाधिकारांबाबत सार्वमत आजमाजवले जाईल. भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, ‘दहशतवाद्यांचीच भाषा तुम्ही बोलत आहात. हे तर दहशतवाद्यांचे प्रतिष्ठित चेहरे आहेत.’केंद्रीय मंत्री मनीष तिवारी म्हणाले, ‘आपच्या नेत्यांना राष्ट्रीय स्तरावर सत्ता मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असली तरी काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्यावर बोलताना त्यांनी भान ठेवले पाहिजे.’ डाव्या पक्षांनीही प्रशांत भूषण यांच्यावर परखड टीका केली.
ज्या आम आदमी पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाचे हे धोरण आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आप’ने आतापर्यंत कधीच आपले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा काश्मीरविषयीचे धोरण जाहीर केलेले नाही. भूषण यांनी दहशतवाद्यांना अनुकूल अशी भूमिका घेणे, हे कुणालाच आवडलेले नाही. शेवटी केजरीवाल यांनी खुलासा केला, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीर भारतात राहण्यासाठी वाट्टेल ती किंमत देण्यास आपण तयार राहिले पाहिजे, असा आमचाही विचार आहे, असे केजरीवाल आणि प्रशांत भूषण या दोघांनी जाहीर केले. मात्र जनभावना देखील जाणून घेतल्या पाहिजेत.’ असेही केजरीवाल यांनी सुनावले.ओपिनीयन पोल घेऊन तुम्ही राज्य कारभार करणार असाल तर सरकारची गरजच काय?
देशद्रोही भूमिका प्रशांत भूषण यांनी यापूर्वीही मांडली होती
काश्मीरला स्वातंत्र्य देण्यात यावे किंवा तेथील जनतेची इच्छा असल्यास त्यांना पाकिस्तानमध्ये समाविष्ट होऊ द्यावे, अशी अत्यंत देशद्रोही भूमिका याच प्रशांत भूषण यांनी यापूर्वी मांडली होती. त्यावेळी ते अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी होते. मात्र, अण्णा हजारे यांनी त्यांच्या त्या वक्तव्याची तडकाफडकी गंभीर दखल घेऊन त्यांना खडसावले होते. प्रशांत भूषण यांची ती मागणी कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नसल्याचे सांगून अण्णांनी प्रशांत भूषण यांना जोरदार चपराकच हाणली होती. आता पुन्हा एकदा या प्रश्नात तोंड घालताना प्रशांत भूषण यांनी भूमिका थोडी सौम्य केली असली तरी मागणीचा गाभा तोच राहिला आहे.
काश्मीरमधील लष्कराच्या उपस्थितीबद्दल सार्वमत घेण्यात यावे, असे सुचवून एकप्रकारे त्यांनी भारतीय लष्कराच्या तेथील अस्तित्वालाच आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न आत्मघातकी स्वरुपाचाच ठरू शकतो. पाकिस्तानने १९४८ साली अचानकपणे घुसखोरी करून अर्धा काश्मीर घशाखाली घातला. १९६५ मध्ये आणि १९७१ मध्ये काश्मीरचे लचके तोडण्याचे प्रयत्न केले. पंधरा वर्षांपूर्वी कारगिलमध्ये घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावण्याचा खटाटोप केला. गेल्या तब्बल पंचवीस वर्षांपासून पाकिस्तानी हद्दीतून घुसखोरी सुरू आहे. पाकिस्तानी हद्दीतून पुरविलेली शस्त्रे, प्रशिक्षण, पैसा आणि मनुष्यबळ यांच्या जोरावर दहशतवाद्यांचा हैदोस सातत्याने सुरू आहे. या हैदोसात हजारो निरपराधांचे बळी गेले आहेत, अनेकांना घरे-दारे सोडून परागंदा व्हावे लागले आहे, अनेकांचे भरले संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. दहशतवाद्यांनी तेथील पर्यटनाचा व्यवसाय पूर्णपणे मोडीत काढल्याने स्थानिकांवर बेरोजगारी ओढवली आहे. राज्यात अराजक माजावे आणि भारताविरुद्ध असंतोषाचा वणवा पेटावा असा त्यामागे भारतविरोधी शक्तींचा डाव आहे.
त्यांचा हा डाव मोडून काढण्यासाठी आणि राज्यातील जनतेला सुरक्षिततेची हमी देण्यासाठी भारतीय लष्कराला तेथे रात्रंदिवस जागरुक रहावे लागते. उर्वरित काश्मीरच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी आणि पर्यायाने भारताच्या अस्मितेचे, सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आजवर भारतीय लष्कराच्या अक्षरशः हजारो जवानांना तेथे स्वतःचे रक्त सांडावे लागले आहे. आपल्या जीवावर उदार होऊन देशाच्या, जनतेच्या रक्षणासाठी झटणारे भारतीय लष्कराचे जवान काश्मीरात तैनात आहेत म्हणूनच आजवर काश्मीरच्या सीमा पाकिस्तानी हल्ल्यांपासून सुरक्षित राहिल्या आहेत. काश्मीरातील जनता आपले दैनंदिन व्यवहार पार पाडू शकते. भारताचे लष्कर काश्मीरात नसते तर आज काश्मीर हा भारताचा अविभाज्य भूभाग म्हणून केवळ सांगण्यापुरताच कागदावर राहण्याची भीती होती. भारताचे लष्कर सध्याच्या परिस्थितीत तिथून हटविणे म्हणजे भारताने स्वतःहून काश्मीरचा उर्वरित भूभाग पाकिस्तानच्या घशात घालण्यासारखे होणार आहे.
काश्मीरातील भारतीय जनतेला शत्रूच्या तोंडी देण्यासारखाच तो प्रकार ठरतो. ही वस्तुस्थिती नजरेआड करून जेव्हा `प्रशांत भूषण’ काश्मीरातील लष्कर हटविण्याची मागणी करतात तेव्हा त्यामागे त्यांच्या असलेल्या हेतूबद्दल संशय निर्माण होतो. प्रशांत भूषण यांची मागणी कोणत्याही राष्ट्रप्रेमी भारतीयाला सहन होणारी नाही. आम आदमी पार्टीने ही मागणी धुडकावायला हवी होती. मात्र केजरीवाल यांनी प्रशांत भूषण यांची ती मागणी वैयक्तिक आहे, पक्षाची नव्हे एवढे मोघम सांगून एवढय़ा गंभीर विषयाला फाटा देण्याचा प्रयत्न म्हणजे एकप्रकारे भूषण यांच्या मागणीचे समर्थनच ठरते. दिल्लीतील निवडणुकीपूर्वी एका कट्टर धार्मिक नेत्याचे समर्थन घेण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी केला होता.
काश्मीर,दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संबंध बाबींवर ठोस भूमिका जरुरी
दिल्लीतील सत्ताग्रहणानंतर केजरीवाल यांना थेट पंतप्रधानपदी बसविण्याची स्वप्ने रंगविणार्‍या आणि त्यासाठी देशभर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार्‍या या पक्षाने आपले पंख विस्तारले असल्याने, पक्षाच्या भूमिकांच्या मर्यादादेखील विस्तारल्या आहेत. संवेदनशील प्रश्नावर आपल्या पक्षाचे मत काय आहे, हे मात्र केजरीवाल यांना ठरवावेच लागणार आहे. त्याकरता कार्यकर्त्यां’च्या भूमिकेतून बाहेर पडून ‘राज्यकर्त्यां’च्या भूमिकेत शिरण्याची गरज असते. आम आदमी पक्ष अजूनही ‘कार्यकर्ता की राज्यकर्ता’ या संभ्रमातच आहे. देशापुढेही असंख्य समस्या असतात आणि त्यावर थेट भूमिका घेऊन ठामपणे उभे राहावे लागते, ही राजकीय पक्षाची गरज या पक्षाला बहुधा जाणवलीच नसावी. म्हणूनच, भारताच्या अस्मितेचा मुद्दा ठरलेल्या काश्मीर-प्रश्नावर या पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी केलेल्या कथित बेजबाबदार विधानानंतर हा पक्ष अडचणीत सापडला. केवळ काश्मीरच नव्हे, तर दहशतवाद, आंतरराष्ट्रीय संबंध, आदी अनेक बाबींवर ठोस भूमिका ही राजकीय पक्षांची ओळख असते.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..