फुलांची रास, चंदनाचा सुवास, दिव्यांच्या रांगा, रांगोळीचे सडे |
सुग्रास फराळ, निसर्गाचा साज, आली दिवाळी, घेऊन आनंदाचे घडे ||
दिवाळी हा आपल्या देशातला सगळ्यात मोठा सण. राज्यपरत्वे काही सण बदलतात, पण दिवाळी मात्र सर्वत्र साजरी होते. ती देखील सारख्याच उत्साहानं आणि आवडीनं.
हिंदू परंपरेत, केवळ गंमत किंवा मजा (एन्जॉयमेंट) म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्यापाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो. मी याची विभागणी पाच प्रकारे करू शकते.
धार्मिक- सणांच्या व्यवस्थापनात, सतत परमेश्वराचं स्मरण/ कीर्तन/ जप/ पूजा/ आराधना/ सेवा या योगे मनात सात्विक भाव जागृत ठेवावा यावर भर दिला आहे. कारण ‘धर्मो रक्षति रक्षित:’; म्हणजे जो धर्माचं रक्षण (पालन) करतो, त्याचं रक्षण धर्म करतो- ही आपली प्राचीन धारणा आहे. (इथे रिलीजन या अर्थी धर्म अपेक्षित नाही; तर वेदोक्त सनातन हिंदू धर्म अपेक्षित आहे. ज्यात ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे, मी बह्म आहे, तू ही ब्रह्म च आहेस- हा समानतेचा श्रेष्ठ संदेश दिला आहे.)सामाजिक- या निमितानं सगळ्यांनी एकमेकांशी स्नेहपूर्ण वागून सामाजिक सौहार्द्र राखण्याचा प्रयत्न केला जातो. याची जबाबदारी कुठल्याही एका व्यक्तीवर किंवा व्यक्ती समुहावर न टाकता ती सगळ्यांवर सारखीच विभागून टाकली जाते हे या व्यवस्थापनातलं वैशिष्ट्य आहे.आर्थिक- उत्सवाच्या निमित्तानं फुलं, रांगोळ्या, धूप, दीप, गंध, सजावट साहित्य, देवांची वस्त्रं आणि दागिने, फळं, समया इ. भांडी- यांना मागणी येते. देवासमोर जागर, गोंधळ, नृत्य, संगीत रांगोळ्या, सजावट, झाडलोट करणाऱ्या कलाकारांना काम मिळतं. एकूणच आर्थिक उलाढाल होऊन, समाजातील सर्व घटकांना आर्थिक प्राप्ती होऊन त्यांच्या उदरभरणाची व्यवस्था लावली जाते.कला- सणांच्या निमित्तानं, मानवी जीवन संपन्न करणाऱ्या विविध कला- कौशल्यांची परंपरा टिकवून ठेवली जाते.आरोग्य- करियर, धर्म, मनोरंजन, सामाजिक आयुष्य (social life- ज्यासाठी रात्रीच्या पार्ट्यांमध्ये आरोग्याची नासाडी करण्याची नवी परंपरा आपण स्वीकारली आहे.) या सगळ्यांचा आस्वाद घेत असताना देखील आरोग्याला कुठेही तडा जाणार नाही, किंबहुना काहीतरी फायदाच होईल हा विचार करून सणांचं व्यवस्थापन केलं जायचं ही आपल्या ऋषींची श्रेष्ठता आहे. कारण बाकी सगळ्या गोष्टी परत मिळवता येतात, आरोग्य नाही….. याची जाणीव आपल्या पुर्वाश्रमींना होती. म्हणून प्रत्येक सणाचं ‘डिझाईन’ करताना त्यात आरोग्याचा विचार (मी जरी पाचवा सांगितला असला तरी) प्राधान्यानं केलेला दिसतो.
आता दिवाळीचंच बघा ना..
पहिला दिवस वासुबारसेचा. या दिवशी आपण ‘सवत्स गोमातेचं’ पूजन करतो. कृषी, आरोग्य, अर्थ, पर्यावरण या सर्व क्षेत्रात मानवाला एक हाती संपन्नता देऊ शकणाऱ्या गोमातेच्या संबधी कृतज्ञता जपण्याचा हा दिवस आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आहारी जाऊन आपण या गोमातेला विसरलो खरे. पण आज पृथ्वी आणि त्यावरील मानवाचं आयुष्य, धोक्याच्या कडेलोटावर आलेलं असताना दिसणारा आशेचा एकमेव किरण म्हणजे गोमाता आहे असं स्पष्ट दिसतंय. तेव्हा आपली ही परंपरा पुन्हा तेजाळून निघावी आणि पूर्वीप्रमाणेच, जवळ असलेल्या ‘गोधनावरून’ आपली श्रीमंती मोजली जाण्याचे दिवस यावेत- यासाठी आपल्यालाच झटावं लागणार आहे. त्यासाठी गोमातेप्रति कृतज्ञता जपणं ही काळाची गरज आहे.
दुसरा दिवस धनत्रयोदशीचा- अर्थात आरोग्याच्या देवतेचा. निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना करूनच सणाचे पुढील दिवस सुरु होतात. ‘निरोगी दीर्घायुष्य’ ही केवळ प्रार्थना करून प्राप्त होणारी गोष्ट नव्हे. भगवान धन्वन्तरींच्या आशीर्वादासोबत, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून आपले सातत्यानं होणारे योग्य प्रयत्न देखील आवश्यक आहेत. त्या मार्गावर चालायचा संकल्प करायचा हाच तो दिवस.
तिसरा दिवस नरकचतुर्दशीचा. व्यक्ती वा समष्टी जीवनाचा नरक बनवणाऱ्या सर्व अपप्रवृत्तींचा नाश करण्याचा हा दिवस. या दिवशी पहाटे लवकर उठण्याची परंपरा आहे. पहाटे उठण्याचे फायदे खरं तर आपल्याला सगळ्यांना चांगले माहीत आहेत. ब्राह्म मुहूर्तावर (म्हणजे पहाटे साडेचार ते पाच च्या सुमारास) उठल्यानं
मलप्रवृत्ती सुकर होते. त्यामुळं शरीर शुद्ध आणि हलकं होतं. शरीर क्रिया सुधारतात. भूक चांगली लागते.कफाची वाढ होत नाही. त्यामुळं शरीर स्थूल होत नाही, कफाचे आजार होत नाहीत, आळस जाऊन उत्साह येतो.व्यायाम, गंडूष, अभ्यंग, उद्वर्तन, स्नान, पूजा- या शारीरिक आणि मानसिक आरोग्य बळकट करणाऱ्या गोष्टीं करण्यासाठी वेळ मिळतो.
नरकचतुर्दशी हा दिवस अभ्यंगस्नान करण्याचा. पहाटेच्या गार हवेत, अंगाला कोमट तेल लावून मालिश करायचं आणि सुगंधी उटणं लावून गरम पाण्यानं आंघोळ करायची. आहाहाहा… ‘राजयोग’ म्हणतात तो याहून वेगळा काय असतो? अभ्यंग हे म्हातारपण, श्रम आणि वात यांना दूर ठेवणारं आहे. त्यानं दृष्टी दीर्घकाळ उत्तम राहते, शरीर पुष्ट आणि बलवान होतं, आयुष्य वाढतं, झोप चांगली लागते आणि त्वचा सुंदर होते. उटण्यानं शरीर सुगंधी, सडपातळ आणि स्थिर (कंप विरहीत) होतं. तसंच त्वचा देखील देखणी होते. यावर केलेलं गरम पाण्याचं स्नान- पचनशक्ती आणि भूक वाढवतं, आयुष्य वाढवतं, उर्जा आणि बल देतं, शरीराची खाज- मल- घाम- श्रम- आळस- तहान- दाह आणि पाप (स्नानानं तनामनाला येणारी प्रसन्नता ही मनात वाईट विचारांना/ पापांना थाराच देत नाही.) यांचा नाश करतं. म्हणजे अभ्यंग स्नान या एकाच उपक्रमाचे आपल्याला कितीतरी लाभ होतात! अभ्यंग स्नानानंतर नवीन सुंदर वस्त्रं आणि अलंकार घालून, देवळात जाऊन देवदर्शन घेणं, शेजारीपाजारी फराळ वाटप करणं या सगळ्यात उत्साह, समूह सहवास आणि आनंद यांची नुसती उधळण असते.
चौथा दिवस लक्ष्मी पूजनाचा. कलियुगातल्या मनुष्याला लक्ष्मीपूजनाचं माहात्म्य सांगायची खरं तर गरजच नाही. ती सदा सर्वदा आपल्याच घरी असावी अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. पण या लक्ष्मी इतकं लहरी जगात कोणी नाही. तिला फिरायची आवड म्हणून ती कोणाहीकडे जाते खरी, पण मर्जी फिरली की लगेच तिथून बाहेर देखील पडते. हे जाणून तिला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी या दिवशी दिव्यांची सजावट केली जाते. सोबत संतांनी सांगितलेले लक्ष्मी मातेची मर्जी संपादन करण्याचे उपाय देखील हवेतच…..
तुकोबा म्हणतात तसं ‘जोडूनिया धन उत्तम वेव्हारे| उदास विचारे वेच करी|’ लक्ष्मी जोडतानाचां व्यवहार/ मार्ग उत्तम असायला हवा. तिथे लोभ, हाव, भ्रष्टाचार कामाचा नाही. शिवाय तिचा विनियोग योग्य मार्गानं (दान, गरिबांसाठी अन्नछत्र- पाणपोया- विहिरी- जलाशय- शिक्षणशाळा- आरोग्याशाळा बांधणं यासाठी) व्हायला हवा. केवळ स्वतःच्या भौतिक उपभोगांचा हव्यास घातकच ठरतो.समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ‘अंतरी असता नारायणे | लक्ष्मीस काय उणे || ज्याची लक्ष्मी तोचि आपणे | बळकट धरावा ||’ व्यक्ती आणि समष्टी मध्ये व्यक्त झालेला हा नारायण समजून घेतला आणि आपल्या हृदयात त्याला घट्ट धरून ठेवला, की लक्ष्मी आपोआप येतेच.ज्ञानदेव म्हणतात, ‘मी अविवेकाची काजळी | फेडूनि विवेकदीप उजळी || ते योगिया पाहे | दिपावळी ||” जीवनाला लागलेली अविवेकाची काजळी पुसून, विवेकाचे दीप लावणं हीच योगियांची दीपावली. या ज्ञानरूप उजेडाला भुलून लक्ष्मी येणार हे निश्चित आहे.
पाचवा दिवस बलिप्रतिप्रदेचा. बळी राजा हा असुर वंशात जन्माला आला होता. पण त्याने उत्तम शासन केले आणि धर्माची वर्तणूक केली. म्हणून प्रसन्न होऊन ईश्वरानं त्याला स्वर्गापेक्षाही सुखकर अश्या पाताळाचा राजा आणि चिरंजीवत्व अश्या दोन गोष्टी प्रदान केल्या. जन्मतः आपण सगळेच क्षुद्र असतो. पण ज्ञान, धार्मिक वागणूक आणि ईश्वरकृपा यांच्या योगे आपलं कल्याण होतं हा या कथेतला भावार्थ आहे. तो जाणून जीवन जगण्याची कला शिकायची आहे. त्यासाठी बलिप्रतिप्रदे इतका उत्तम मुहूर्त अन्य कुठला असू शकतो?
सहावा दिवस भाऊबीज किंवा यमद्वितीयेचा. दीर्घायुष्यासाठी यमाला जिंकायला तर हवंच. पण मनुष्य हा काही अमर प्राणी नव्हे. एरवी ‘काळ’ वाटणारा हा यम- शरीर जर्जरीभूत झाल्यावर यावासा वाटू लागतो. मृत्यू हे प्राप्त मानव शरीराचं अंतिम सत्य आहे आणि त्याचं भान राखलं तरच, अंतरी नारायण धरता येतो. यासाठी यमाशी मैत्र साधण्याचा हा दिवस आहे.
पाडव्याच्या निमित्तानं स्त्रिया विविध नात्यातल्या सर्व पुरुषांना, तर भाऊबीजेला भावाला औक्षण करतात. या सोहळ्यात एकमेकांना निरोगी दीर्घायुष्य चिंतलं जातं, हे ही तितकंच महत्वाचं.
दिवाळीचं वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीचा फराळ. चिवडा, चकल्या, करंज्या, अनारसे, शेव, विविध लाडू, कडबोळी, शंकरपाळे अश्या बहुविध चविष्ट पदार्थांनी संपन्न असा हा फराळ म्हणजे ‘खानसेनांची’ दिवाळीच. निसर्गात सुरु झालेल्या थंडीला आणि त्यामुळं शरीरात प्रज्वलित होऊ लागलेल्या अग्नीला साजेसा हा गोड, तिखट फराळ; पचायला जड तरी शरीराला पोषक असतो. पावसाळ्यात भूक कमी म्हणून केलेल्या उपासांनी, थोड्या कृश झालेल्या शरीराचं बल वाढवायला हे पदार्थ खूप उपयोगी पडतात.
एकूणच दिवाळीत ही ज्ञान, धन आणि शक्ती/ बल प्राप्त करण्याची मुहूर्तमेढ रचायची असते. या गोष्टी प्राप्त झाल्यावर त्यांचा विनियोग कसा करायचा याचंही भान हवं. सुभाषितकार म्हणतात,
विद्या विवादाय, धनं मदाय, शक्तिः परेषां परीपीडनाय |
खलस्य साधोः विपरीतमेतद् ज्ञानाय, दानाय च रक्षणाय ||
दुष्ट लोक त्यांनी प्राप्त केलेली विद्या वाद घालण्यासाठी, धन माज करण्यासाठी तर शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी वापरतात. याउलट सज्जन माणसं त्यांनी प्राप्त केलेली विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी तर शक्ती इतरांच्या रक्षणासाठी वापरतात.
समस्त प्राणीमात्रांचा विचार करून डिझाईन केलेल्या या सणात, प्रदूषण करणाऱ्या आणि प्रसंगी छोट्या जीवांना मार्क ठरणाऱ्या फटाक्यांना कुठेतरी स्थान आहे का? कुठेच नाही. कारण फटाके ही दिवाळी साजरी करायची एकमेव/ अनिवार्य/ लक्षणात्मक/ पारंपारिक पद्धत नाही. त्यांना वगळून दिवाळी साजरी करण्याचे अनेक प्रशस्त मार्ग आपल्याच परंपरेत आहेत.
दिवाळीचं हे उत्साही आणि आनंदी स्वरूप फारच मोहक आहे. रोजच्या आयुष्यात हा आनंद, ही प्रसन्नता टिकावी असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. ते अजिबात अशक्य नाही. दिवाळीतला शाही फराळ आणि वस्त्रालंकार सोडले; तरी पहाटे उठणं, अभ्यंग, उटणं, देवपूजा, जप आणि सर्व जीवांविषयी स्नेह हे उपचार केवळ दिवाळीसाठी नाहीतच मुळी. ते रोज आचरणात आणून राजासारखं आयुष्य जगता येतं. मग म्हटलंच आहे, ‘राजाला दिवाळी काय माहीत?’ म्हणजे राजासाठी रोजचा दिवस दिवाळी सारखाच असतो.
जयपूरचे डॉ. पवनकुमार गोडतवार यांची दिवाळी विषयी एक खूप छान कविता आहे. दिवाळीच्या सणाचं खरं स्वरूप त्यात अचूक शब्दात सांगितलं आहे.
प्रीत इतनी हो प्राणों में
हर सांस बने बासुरीया |
शीतल चंदन सारे रिश्ते
जग सारा महके बन बगिया ||
इतना स्नेह भरा हो मन अब
जीवन दमके बनके दिया ||
© वैद्य सुचित्रा कुलकर्णी
— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन
Leave a Reply