नवीन लेखन...

फसवे रंग

आज वर्गातलं वातावरण एकदम रंगीबेरंगीच होतं. रंगीत कागद, रंगीत पेनं, पेन्सिली, खडू आणि चित्रविचित्र रंगांची स्केच पेन्स. आणि विशेष गंमंत म्हणजे मुलांनी पण आज रंगीत कपडेच घातले होते. मला काही समजेना? “आज काय सगळ्या मुलांचा वाढदिवस आहे की काय?” असं विचारताच मुलं म्हणाली,“आज कलर डे आहे! म्हणून आज सगळंच कलरफूल!” सिमरन म्हणाली,“आजचा खेळसुध्दा रंगीबेरंगी रंगांचा रंगीत खेळच हवा.” त्याबरोबर वर्गातली सगळी रंगीत मुले ओरडली, “होऽऽ होऽऽ रंगीबेरंगी रंगांचा, रंगीत खेळ खेळताना, रंगून जाऊया, हो रंगून जाऊया!”.

“काय तुम्हाला रंग ओळखता येतात? रंगांकडे एकटक पाहाता येतं? चित्रातले रंग लक्षात ठेवता येतात?…” मला पुढे बोलू न देताच मुले म्हणाली, “होऽऽ होऽऽ होऽऽ” चला तर मग, आज आपण रंगबदलू रंगांचा रंगीत खेळ खेळू. दोन स्वच्छं पांढरे कागद घ्या. त्यातला एक जरावेळ बाजूला ठेवा. फळ्यावरच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका पांढऱ्या कागदावर पट्टी पेन्सिल वापरुन, तीन बाय तीन इंचाचा चौरस काढा. आता या चौरसाला किमान अर्ध्या इंचाची बॉर्डर काढा. आता सगळी मुले कामाला लागली. मिहिरने विचारलं,“पण… त्या रंगांचं काय?..”

त्याला शांत करत म्हणालो,“आता त्या चौकोनात गडद हिरवा रंग भरा आणि त्याच्या मध्यभागी एक काळा ठिपका रंगवा. मुलांनी रंगविण्यासाठी रंगीत खडू,पेन्सिली, जलरंग व स्केच पेन्सचा वापर केला. मिहिर कुरकुरत म्हणाला,“आता ती बॉर्डर मात्र वेगळ्या रंगात रंगवूया. एकदम पिवळ्याधमक रंगातच रंगवूया.” होकारार्थी मान हलवताच सगळ्यांच्या बॉर्डर्स चकमकित पिवळ्या धमक रंगांत रंगू लागल्या. आता उजव्या हातात हे रंगवलेले चित्र व डाव्या हातात स्चच्छं पांढरा कागद धरा. मग उजव्या हातातल्या कागदाकडे एक मिनिट एकटक पाहा. तुमचे सगळे लक्ष चौकोनातल्या रंगांवर व त्या काळ्या ठिपक्यावर केंद्रित करा. मग प्रखर उजेडात पापणी न हलवता चटकन डाव्या हातातल्या कागदाकडे दृष्टी न्या….. आणि चमत्कार पाहा!! त्या पांढऱ्या कागदावर तुम्हाला वेगळेच रंग दिसतील.

मुले भलतीच उत्साहित झाली होती. जेमतेम एक मिनिट वर्गात शांतता पसरली. आणि एकदम मुलांनी जल्लोष केला,“होऽऽ…होऽ… भलतेच रंग, फसवे रंग, रंग बदलू रंग..” आणि मग मुलांची प्रश्न एक्सप्रेस सुरू झाली. “असं का झालं? वेगळे रंग घेतले तर काय होईल? पिवळा आणि निळा यांची जोडी आहे का? आपण चौकोनच काढला, त्याऐवजी जर गोल काढला असता तर काय झाले असते? चौकोनात एकच रंग न देता दोन वेगवेगळे रंग भरले असते तर?…”

“आधी या रंगीत खेळामागची जादू काय आहे ते तर समजून घेऊया. त्यातूनच तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे नक्की मिळतील. आणि तरीपण काही प्रश्नांची उत्तरे नाहीच मिळाली तर…” मला पुढे बोलू न देता मुलेच म्हणाली,“तर.. प्रयोग करुन शोधून काढा! आता सांगा ती जादू.”

आपले डोळे फक्त लाल, निळा आणि हिरवा हे तीनच रंग प्रत्यक्ष पाहातात. या रंगांच्या कमीअधिक संवेदनांचे एकत्रिकरण करुन मेंदू अनेक रंग पाहू शकतो. डोळ्याच्या मज्जापटलावर नळ्या आणि शंकूच्या आकाराच्या चेतापेशी असतात. या दोघांच्या कामात थोडासा फरक आहे. शंकूच्या आकाराच्या चेतापेशी वस्तूबद्दल बारीक तपशील टिपतात. तर नळीच्या आकाराच्या पेशी तपशील टिपण्यात कमी पडल्या तरी त्या रात्रीच्या वेळी शंकूपेशींपेक्षा अधिक चांगले काम करतात.

शंकूपेशी रंगांची संवेदना ग्रहण करतात. या शंकूपेशींना काही काळ सतत वापरले तर त्या दमतात आणि पुढे त्याच रंगाची संवेदना नीट ग्रहण करू शकत नाहीत. त्यामुळेच प्रतिमेच्या रंगात फरक पडतो. आपल्या या रंगीत खेळात टिंबाकडे एकटक पाहिले की हिरव्या आणि पिवळ्या रंगांची संवेदना ग्रहण करणाऱ्या चेतापेशी दमतात. त्याचवेळी झटकन पांढऱ्या रंगाच्या कागदाकडे पाहिले तर, पांढरा रंग सात रंगांनी बनलेला असल्याने, ते सप्तरंग डोळ्यात एकत्रित होतात. शंकूपेशी दमल्या असल्याने त्या या सप्तरंगातील हिरवा व पिवळा रंग ग्रहणच करत नाहीत. पांढऱ्या रंगातून हिरवा रंग वजा झाला तर उरलेला रंग लाल म्हणून नोंदला जातो. त्याचप्रमाणे पांढऱ्या रंगातून पिवळा रंग वजा झाल्याने त्याठिकाणी निळा रंग दिसतो. त्यामुळे आपल्याला डाव्या हातातल्या पांढऱ्या कागदावर निळी बॉर्डर व लाल चौरस असे भासमय रंग असणारी आकृती दिसते.

मिहिर, सिमरन, शिल्पा, प्रिया, रोहन, पालवी हात वर करत म्हणाले,“तरीपण आम्ही हा रंगीत प्रयोग वेगवेगळे रंग घेऊन करणारच. आमच्या शंकू पेशी दमल्या तरी आम्ही नाही दमणार!” न दमता प्रयोग करणाऱ्यांच्या “रंगीत पत्रांची” मी वाट पाहातो आहे.

— राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..