भारतात सहा ऋतू दिसून येतात. त्या प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्याला साधक व बाधक असे वातावरण असते. त्याचा परिणाम वा दुष्परिणाम एक, दोन किंवा अनेक अवयवांवर होत असतो; परंतु ऋतूप्रमाणे आहार-विहार केल्यास व त्या त्या ऋतूतील त्रासदायक गोष्टी टाळल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. काही ऋतूंच्या आगमनाचे बदल हे महिन्यांप्रमाणे राहिलेले नाहीत; पण ऋतूंची विशिष्ट अशी लक्षणे आहेत. ती लक्षणे समजावून घेता येऊ शकतात. त्याप्रमाणे आपल्या आहारात-विहारात बदल केल्यास, ते अधिक लाभदायक ठरेल
पुष्पमंडितवर्षा ऋतू
मराठी महिने श्रावण – भाद्रपद
जुलै – ऑगस्ट
आहार मधुर, आम्ल-लवण रसाचे स्निग्ध पदार्थ, पचायला हलके उष्ण पदार्थ घ्यावेत. भूक कमी असल्याने एक वेळा जेवावे. या ऋतूत अपचनामुळे विविध व्याधी संभवतात.
पालेभाज्या व फळभाज्या पडवळ, भेंडी वांगी, दुधी भोपळा, लाल भोपळा, गिलके, दोडके, कारले, सुरण यांचा उपयोग करावा.
धान्य, उसळी मूग, गहू, ज्वारी, कडवे वाल, जुने वाल, तांदूळ, राजगिरा वापरावे. लसूण, कांदा, आले, दूध, तूप, कोथिंबीर, पुदिना, हिंग यांचा वापर जास्त करावा. कैरी, लिंबू, चिंच, सुके खोबरे, बीट हे वापरावे.
बलवर्धक आहार या ऋतूत अग्नी वाढवून नंतरच दूध, तूप यांनी युक्त विविध प्रकारच्या खिरी खाव्यात. बेसनलाडू, टोमॅटोचे सूप, विविध भाज्यांचे सूप, उकडीचे मोदक, आवळ्याचा-कैरीचा मोरंबा यांचा उपयोग करावा.
वर्ज्य पालक, कोबी सर्व पालेभाज्या, चणे, मटार, बटाटे, काकडी, आंबा, खव्याचे पदार्थ, सरबते, मका अधिक तळलेले पदार्थ, सुके मासे, थंड पाणी टाळावे. उपवासासाठी शेंगदाणे, भगर अत्यंत कमी प्रमाणात वापरावे. अळूची भाजी व सातूचे पीठ खाऊ नये.
पाणी पाणी दूषित असल्याकारणाने उकळूनच प्यावे. 1 चमचा मध व त्यानंतर पाणी असे या ऋतूत सर्वांनी घ्यावे. शरीरातील पाणी आजारामुळे कमी झाल्यास लिंबू सरबत गरम पाण्यातून वारंवार घ्यावे.
पाचक पेय या ऋतूत शरीरातील शक्ती तरतरी व भूक उत्तम ठेवण्यासाठी पाचक पेयाचा प्रयोग करावा.
व्यायाम स्थूल व मेदरोग असलेल्यांनी घरी नियमित 20 / 30 मिनिटे बैठका इ. सारखा व्यायाम करावा, व्यायामानंतर मध व पावसाचे पाणी (साठविलेले असल्यास) घ्यावे.
रात्रीचर्या ऋतूमध्ये बल कमी असते व शुक्रक्षय झाल्यास अधिक अशक्तपणा येतो; परंतु ब्रह्मचर्य आजच्या युगात पाळणे कठीण असल्याने व समागमाने मन प्रसन्न होत असल्याने, या सुखोत्पादक प्रवृत्तीसाठी आपल्या शक्तीनुसार वाताचा प्रकोप होणार नाही, असे बघून समागम करावा.
स्वास्थ्यकारक औषधे ऋतूतील अपचनाचा त्रास टाळण्यासाठी वर्णन केलेले पाचक पेय घ्यावे. तापाच्या प्रतिबंधासाठी पारिजातकाची पाने काढ्यात टाकावीत. आमपाचकवटी भास्करलवण चूर्ण, लघुसूतशेखर यांचा प्रयोग पोटाच्या विकारांसाठी करावा. लघुमालिनी वसंत गर्भिणीने घ्यावी.
पंचकर्म ज्यांचे जीवन धकाधकीचे, सतत फिरतीचे, अवेळी खाण्याचे असे आहे, त्यांनी तूप, तेल, दूध यांपैकी कोणतीही बस्ती अवश्या घ्यावी. बस्तीपूर्वी सर्वांगाला औषधी तेलाचे स्नेहन व औषधीयुक्त काढ्याची वाफ घ्यावी. बस्ती घेतल्यास वर्षभर वातविकार टाळता येतात. तसेच वजन वाढविणे, वजन कमी करणे, मणक्यां ना व सांध्यांना निरोगी करणे, शरीरातील वातनाड्या उत्तम ठेवणे ही कार्ये होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- वैद्य विक्रांत जाधव /सा.सकाळ
Leave a Reply