नवीन लेखन...

फुगा फुटायची वेळ

अरविंद केजरीवाल यांची स्थिती बैलाएवढा होण्यासाठी फुगणार्‍या बेडकाप्रमाणे झाली आहे. भ्रमाचा हा फुगा फुटण्याची वेळ आता आलेली आहे. भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनातून अण्णा हजारे बाजूला झाले, तशी त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न केजरीवाल यांनी चालवला असला तरी त्यांचे ते आंदोलन दिशाहीन भरकटताना दिसू लागले आहे. पंतप्रधान आणि इतर राजकीय नेत्यांच्या घरांना घेराव घालण्याची त्यांची राणा भीमदेवी घोषणा ही त्यांचे आंदोलन भरकटू लागल्याची स्पष्ट निशाणी आहे. देशातील राजकीय व्यवस्थेलाच आपल्या आंदोलनाचे लक्ष्य करून केजरीवाल आणि त्यांचे साथी काय साधू पाहात आहेत? राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा टीम अण्णाने केली तेव्हाच या आंदोलनाचा फुगा आता फुटायची वेळ आली आहे हे देशाच्या तमाम जनतेला कळून चुकले. स्वतः अण्णांनाही ते सत्य उमगले आणि कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याचे आपण अद्याप ठरवलेले नाही असे सांगून ते मोकळे झाले. आता केजरीवाल, किरण बेदी वगैरे मंडळी अण्णांची पोकळी भरून काढण्यासाठी धडपडत असली तरी एक गोष्ट ही मंडळी साफ विसरली आहेत ती म्हणजे अण्णांमागे देश उभा ठाकला कारण त्यामागे स्वच्छ चारित्र्य, त्याग आणि नैतिक पाठबळ होते, जे ‘टीम अण्णा’ पाशी दिसत नाही.

उसळलेल्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत आहेत खरी, परंतु ही लाट धाड्‌दिशी किनार्‍यावर आदळवणार आहे याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी. नेत्यांच्या घरांना घेराव घालून प्रसिद्धी भरपूर मिळेल, परंतु त्यातून या मंडळींना काय सुचवायचे आहे? देशाची लोकशाही व्यवस्थाच आपल्याला अमान्य आहे असे तर सुचवायचे नाही? अण्णांच्या हाकेला ओ देत पाठीशी उभ्या ठाकलेल्या जनसामान्यांना सपशेल तोंडघशी पाडण्याचे कार्य मात्र सध्याच्या भरकटलेल्या आंदोलनाने केले आहे. वास्तविक देशामध्ये अण्णांच्या आंदोलनाने भ्रष्टाचाराविरुद्धची एक लहर उसळलेली होती. प्रत्येक सरकारी कार्यालयातील बाबूंना अण्णांच्या टोपीचा धाक बसला होता. जनताही स्वयंस्फूर्तीने अण्णांचे नाव घेत भ्रष्टाचाराविरुद्ध झुंजायला उभी ठाकल्याचे चित्र देशभरात सर्वत्र दिसत होते. पण जाग्या झालेल्या या राष्ट्रचेतनेचा वन्ही जागवत ठेवणे मात्र अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांना जमले नाही. ‘लोकपाल, लोकपाल’ चा धोशा सरतेशेवटी हास्यास्पद पातळीवर येऊन ठोकला. त्यापुढे जनतेला आगामी आंदोलनाची योग्य दिशाच या मंडळींना देता आली नाही. उपोषणाचे हत्यार वाट्टेल वारंवार उपसल्याने बोथट झाले. त्यात बाबा रामदेव स्वतःचा कृति कार्यक्रम घेऊन आले आणि अण्णांच्या आंदोलनाच्या अतिरेकी स्वराला उबगलेले लोक बाजूला हटले. आज देशभरातील अण्णा समर्थक गोंधळलेल्या स्थितीत आहेत. केजरीवाल यांच्यामागे फरफटत जायचे की नाही असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. एखाद्याकडे फार मोठ्या अपेक्षेने पाहायचे आणि भरवशाच्या म्हशीला टोणगा व्हायचा असा प्रकार अण्णांच्या आंदोलनाच्या बाबतीत घडला आहे. विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा प्रश्न त्यामुळे जनतेला पडला तर नवल नाही. अण्णा आणि टीमने आपल्या आजवरच्या आंदोलनाचे तटस्थपणे आत्मचिंतन केले पाहिजे. स्वतःविषयीचे सगळे भ्रम बाजूला ठेवून या आंदोलनाची भावी दिशा ठरवायला हवी. राजकीय आसने भूषविण्याची काहींची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा या चळवळीच्या मुळावर तर येणार नाही ना याचा विचार करायला हवा. राजकीय मैदानावर इतरांशी झुंजणे यांना वाटते तेवढे सोपे नाही. तेथील कायदेकानून वेगळे असतात. केवळ स्वच्छ प्रतिमा पुरेशी ठरत नाही. या सगळ्या वास्तवाचा विचार करून आपल्या डगमगत्या आंदोलनाला सावरण्याची वेळ आलेली आहे. लोकांचा आपल्यावरचा वर्षभरापूर्वीचा विश्वास आजही कायम आहे का, याचा विचार व्हायला नको? केवळ सत्तेत असलेल्यांना लक्ष्य करायचे की समस्त राजकीय नेत्यांविरुद्ध आघाडी उघडायची याबाबत खुद्द इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्येच मतभेद आहेत आणि ते चव्हाट्यावर आले आहेत. खुद्द टीममध्येच जर असे मतभेद असतील, तर जनतेने या आंदोलनाच्या उद्दिष्टांवर विश्वास कसा ठेवायचा? एका भरकटलेल्या आंदोलनाची वाताहत जनतेला आज उघड्या डोळ्यांनी आणि व्यथित होऊन पाहावी लागते आहे एवढे खरे!

परेश प्रभू
संपादक, नवप्रभा

(गोव्याहून प्रकाशित होणार्‍या `दैनिक नवप्रभा’ मधील दि. २७ ऑगस्ट २०१२ चा अग्रलेख)

— परेश प्रभू – संपादक, नवप्रभा, गोवा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..