नवीन लेखन...

बळीराजाचे वैकुंठधाम

नमस्कार मंडळी. जगातील सर्वात मोठ्या बळीराजाच्या वैकुंठधामात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या देशाच्या महाराष्ट्र नावाच्या राज्यातील हा भाग एकेकाळी विदर्भ व मराठवाडा या नावांनी ओळखला जात असे. पण आता शेतकऱ्यांच्या या स्मशानभूमीला जगभरात प्रसिध्दी मिळाल्यामुळे विदर्भ व मराठवाडा ही नावं इतिहासजमा झाली आहेत आणि हे जगाच्या नकाशावरील एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ झालं आहे. पाचशे एकरात पसरलेल्या या अवाढव्य स्मशानभूमीचं आमच्या देशातील लोकांना काहीही कौतुक वाटत नाही कारण बहुसंख्य राज्यांमध्ये शेतकऱ्यांची अशी लहान-मोठी स्मशानं उभी राहात आहेत !

बळीराजाच्या या वैकुंठधामाला आवर्जून भेट देण्यासाठी अनेक देशांमधून आलेल्या आपल्यासारख्या पर्यटकांना सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव राम. मी या स्मशानातच राहतो. माझ्या घरासमोर ज्या दोन कबरी आपण बघत आहात त्या आहेत माझ्या आई-वडिलांच्या. दोघेही शेतकरी होते. वडिलांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आईला तो धक्का सहन न झाल्यामुळे तिनेही लवकरच या जगाचा निरोप घेतला आणि शिक्षण नाही, खिशात फुटकी कवडी नाही अशा अवस्थेत वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मी पोरका झालो. आईला मूठमाती देण्यासाठी या स्मशानात आल्यानंतर घरी परत न जाता अंत्यसंस्कारासाठी लाकडं पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडे पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट उपसू लागलो. या दोन कबरी बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आत्महत्या करण्याआधी बाबांनी माझ्या आईसाठी एक पत्र लिहून शेवटची इच्छा व्यक्त केली होती की पूर्ण आयुष्य ज्या मातीने मला साथ दिली त्याच मातीला माझा मृतदेह अर्पण करा. या जगाचा निरोप घेतल्यानंतरही माझ्या आईला बाबांची साथ सोडायची नसल्यामुळे तिलाही बाबांच्या शेजारीच माती देण्यात आली. लाकडं विकणाऱ्या ज्या कंत्राटदाराकडे मी अनेक वर्षे काम केलं त्याचं वार्धक्याने निधन झाल्यानंतर मी कंत्राटदार झालो आणि विदर्भातल्या एका शेतकऱ्याचा हा मुलगा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या चिता रचण्यासाठी लाकडं विकून भरपूर पैसे कमवू लागला !

देशोदेशीच्या पर्यटकांनो, माझी थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर आता आपण या जगप्रसिध्द स्मशानभूमीची ओळख करून घेऊया. काल रात्री उशिरा ज्या शेतकऱ्याला अग्नी देण्यात आला त्याची ही चिता. अजूनही तिच्यातून धूर निघतो आहे. पंधरा दिवसांपासून रणरणत्या उन्हात तो तूर विकण्यासाठी बाजार समितीच्या आवारात ठाण मांडून बसला होता. पैशाअभावी त्याच्या तरुण मुलीचं लग्न खोळंबलं होतं. अखेर उन्हाच्या तडाख्याने व मानसिक तणावाने तो कोसळला आणि या वैकुंठधामाकडे त्याची वाटचाल सुरु झाली. या शेतकऱ्याने ज्याला मतदान केलं होतं तो नेता मंत्री झाला व ऐन तारुण्यात जग सोडून जाणाऱ्या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही न बघता अभ्यास दौऱ्याच्या बुरख्याआड ऐश करण्यासाठी परदेशवारीवर रवाना झाला. मृत्यूच्या खाईत ढकलल्या गेलेल्या निष्पाप शेतकऱ्यांच्या मुलांनी हातात शस्त्रे घेऊन पराकोटीच्या स्वार्थी, भ्रष्टाचारी, मग्रूर व बेमुर्वतखोर नेत्यांना एक दिवस याच स्मशानभूमीत रवाना केलं तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही !

या स्मशानभूमीत सर्वांचा धर्म व सर्वांची जात एकच असते जिचं नाव आहे ‘शेतकरी’. कोणाची चिता रचली जाते तर कोणाचा देह मातीच्या स्वाधीन केला जातो. पर्यटकांनो, ही कबर बघा. या मातीच्या ढिगाखाली एक तरुण शेतकरी चिरनिद्रा घेतो आहे. केवळ एक लाखाचं कर्ज फेडता न आल्यामुळे निष्ठूर सावकाराच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. त्याच्या धक्कादायक मृत्यूने सैरभैर झालेली त्याची तरुण बायको कडेवर कोवळं मूल घेऊन वेळीअवेळी इथे येते व कबरीवर डोकं टेकवून धाय मोकलून रडते. काळीज चिरून टाकणारं ते दृश्य मला माझ्या घरातून दिसतं, तिचा टाहो कानावर पडतो आणि मला माझ्या आई-बाबांची तीव्रतेने आठवण येते. त्या दोघांचा जीव वाचविण्यासाठी मी काहीही करू शकलो नाही.

केवळ दोनच शेतकऱ्यांची ओळख करून दिल्यानंतर तुम्ही सुन्न झालात आणि तुमच्या डोळ्यात अश्रू आलेत? या विस्तीर्ण स्मशानभूमीत आज हजारो व निकट भविष्यात लाखो शेतकऱ्यांची ओळख तुम्हाला करून घ्यायची आहे. आमच्या देशात सरकारजवळ मेट्रो, बुलेट ट्रेन, अवाढव्य स्मारकं, वेतन आयोग, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचं अत्यंत आलिशान आयुष्य, त्यांच्या परदेशवाऱ्या आणि अशा अनेक गोष्टींसाठी अब्जावधी रुपये आहेत, पण त्यांना जेवू घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र आरक्षित आहे हे बळीराजाचं वैकुंठधाम ! डोळ्यात मगरीचे अश्रू आणून, शेतकऱ्यांची खिल्ली उडवून, खोटी आणि फसवी आश्वासने देऊन व भाकड यात्रा काढून देशोधडीला लावलेल्या दरिद्री शेतकऱ्यांची अनेक मुले आज नक्षलवादी बनण्यासाठी एका पायावर तयार आहेत आणि हे वैकुंठधाम शेतकऱ्यांऐवजी नेत्यांसाठी आरक्षित करणे हे त्यांचे एकमेव लक्ष आहे.

पर्यटकांनो, यानंतर पुन्हा तुम्ही जगातील या सर्वात मोठ्या स्मशानभूमीला भेट देण्यासाठी इथे याल तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांच्या कबरी व चिता दिसणार नाहीत. या देशातील शेतकरी मजेत असतील आणि सोन्याने मढविलेल्या कबरींनी सजलेल्या या स्मशानाच्या प्रवेशद्वारावर लिहिलं असेल ‘नेत्यांचे वैकुंठधाम’!

श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..