नवीन लेखन...

बसू दे थोडा चटका !

ऊन किती तापलंय म्हणत तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर पडूच देत नसाल, तर मोठेपणी त्यांचे दात लवकर पडणार आणि जाता-येता हाडं मोडणार, हे नक्की. – हे असं का?

उन्हाळा पेटला की, भडकलेल्या सूर्यापासून बचाव कसा करावा? याचे किमान हजार उपाय आणि पर्याय सुचवले जाऊ लागतात.

उन्हाळा असो वा नसो, एकूणच तापत्या उन्हापासून दूर राहावं आणि लहान मुलांना तर उन्हात अजिबात फिरकूच देऊ नये, असं मानणारी एक भलती जीवनशैली रुजू लागली आहे.

सूर्याला आपल्या आयुष्यातून असं हद्दपार करणं आणि उन्हात जायची वेळ आलीच तर डोक्यावर टोपी, त्यावर स्कार्फ, डोळ्याला गॉगल असा जामानिमा करूनच बाहेर पडणं यातून आपण काय कमावतो?

तर ‘ड’ जीवनसत्त्वाची जीवघेणी कमतरता.

वनस्पती अन्नाच्या बाबतीत स्वावलंबी असतात. त्या त्यांचे अन्न तयार करू शकतात. त्यांच्या देहात हरितद्रव्य असते. या हरितद्रव्याच्या आधाराने, पाणी आणि कार्बन डायॉक्साईडवायू हे मूळ घटक वापरून सूर्याच्या उपस्थितीत वनस्पतींना कर्बोदके बनवता येतात. वनस्पतींनी बनवलेले हे अन्न खाऊन इतर प्राणी जगतात. आपण माणसेही तसेच करतो. अन्नाप्रमाणेच जीवनाला अतिशय अल्प प्रमाणात लागणारी जीवनसत्त्वेही आपण वनस्पतींकडूनच मिळवतो.

जीवनसत्त्वांचा शोध लावणार्‍यांनी त्यांना रासायनिक नावे दिली. मात्र ती लक्षात ठेवायला अवघड म्हणून त्यांना जीवनसत्त्व अ, ब, क, ड, ई, के इत्यादि नावे दिली. एवढंच नाही तर त्यांच्यापैकी कोणाच्या अभावामुळे शरीराला कोणत्या प्रकारचा त्रास होतो याचीही माहिती संशोधन करून मिळवली आणि आपल्याला सांगितली.

जीवनसत्त्वे शरीराला आवश्यक असतील तर ती शरीर स्वत:च का निर्माण करत नाही? ती इतरांच्या जीवावर का अवलंबून ठेवली आहेत? एका जीवाने दुसर्‍या जीवाला पुष्ट करावे असे निसर्गाला वाटते? अर्थात निसर्गाने सर्वच जीवांना परावलंबी केलेले नाही आणि सर्वच बाबतीत परावलंबी केलेले नाही.
आपण माणसे कोणत्या जीवनसत्त्वांत्या बाबतीत स्वावलंबी आहोत? केवळ दोन जीवनसत्त्वं अशी आहेत ज्यांच्याबाबतीत माणूस स्वावलंबी आहे. जीवनसत्त्व ‘ब’ मधील काही प्रकार आणि जीवनसत्त्व ‘ड’ आपल्या शरीरात तयार होतात. त्यापैकी जीवनसत्त्व ब मधील काही प्रकार आपल्या पचनसंस्थेत सुखानं राहणारे आपले मित्र जीवाणू तयार करतात. मात्र जीवनसत्त्व ‘ड’ आपलं आपणच तयार करतो.

जीवनसत्त्व ड तयार होण्यासाठी – कोलेस्टेरॉल – कच्चा माल म्हणून लागते.कोलेस्टेरॉलमुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक विकरे किंवा हार्मोन्स बनतात. त्या शिवाय सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पित्तरस. यकृतात कोलेस्टेरॉलचा वापर करून पित्तरस बनतो. हा पिवळसर हिरवा रंग असणारा पित्तरस लहान आतड्यात अन्न पचविण्याचं काम करतो. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल बनलेच नाही तर आपल्याला अनेक शारीरिक क्रिया करताच येणार नाहीत. कोलेस्टेरॉल आपला शत्रू नाही तर जन्माचा जोडीदार आहे.हे कोलेस्टेरॉल सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्वचेच्या वरच्या स्तरात ‘ड’ जीवनसत्त्व तयार करतं, उन्हात जायचं ते त्यासाठी ! सूर्यापासून प्रकाश मिळतो त्यात विविध प्रकारच्या प्रकाश लहरी असतात. त्यांपैकी अतिनील – ब किंवा अल्ट्राव्हायोलेट- बी (290 ते 320 नॅनोमीटर ) प्रकारच्या तरंगलहरी ड जीवनसत्त्व बनण्यासाठी उपयुक्त असतात. सूर्य उगवताना तांबूस दिसतो कारण सूर्य आणि आपल्यामध्ये हवेचा थर जाड असतो. त्यातून येताना बाकीचे तरंग इतस्तत: फेकले जातात आणि तांबड्या रंगाच्या लहरीच आपल्यापर्यंत पोचतात. सूर्य वर चढेल तसतसा सूर्य किरणांना पार करायला लागणारा हवेचा थर कमी कमी होत जातो. अधिक तरंगलांबीच्या लहरी आपल्यापर्यंत पोचतात. मग सूर्याचा प्रकाश पांढुरका आणि प्रखर दिसायला लागतो. अशा प्रकाशात अतिनील ‘ब’ किंवा अल्ट्रा व्हॉयोलेट बी प्रकारच्या तरंगलहरी असतात. त्या ‘ड’जीवनसत्त्व तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कोलेस्टेरॉलपासून ‘ड’ जीवनसत्त्व बनतं ते आपल्या त्वचेच्या वरच्या स्तरात. जितकी त्वचा सूर्यप्रकाशाला उघडी असेल तितक्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार होतात. हे काम अगदी कोवळ्या उन्हात होऊ शकत नाही. सूर्य साधारण क्षितिजापासून पंचेचाळीस अंश वर आला की, हे काम सुरू होतं. सकाळच्या म्हणजे कोवळ्या नव्हे; पण चटका बसणार्‍याही नव्हे अशा उन्हातच आपलं शरीर ‘ड’ जीवनसत्त्व बनवू शकतं. (25 ते 30 मिलीग्रॅम प्रती चौरस सेंटिमीटर). आधुनिक जीवनशैलीत उन्हा-तान्हातले कष्ट आणि सूर्य यांना हद्दपार करण्याला ‘विकसित’झाल्याचं मानलं जातं. ती कल्पना लवकरात लवकर दूर केली पाहिजे. कारण न वापरल्यानं माणसाची शेपूट गेली. तसेच न वापरल्यानं शरीराची ‘ड’ जीवनसत्त्व निर्माण करणारी यंत्रणा संपायला नको.

ऊन, घाम, अंघोळ आणि साबण !

उन्हात त्वचेवर बनलेले ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू शरीराच्या आत जायला साधारपणे दोन तास घेतात. यासाठी उन्हातून फिरून आल्यावर लगेचच अंघोळ करू नये. उन्हातून फिरून आल्यानंतर अंघोळ करताना उघड्या त्वचेवर साबण लावणं टाळावं. उघड्या त्वचेवरील ‘ड’जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू तयार झालेला भाग साबणात विरघळतो आणि अंग घासताना अंगावरून पडून गटारीत वाहून जातो. या अंघोळीच्या वेळेला झाकलेल्या जागी काखेत, जांघेत साबण लावायला हरकत नाही.

उन्हात फिरल्यानंतरचे अठ्ठेचाळीस तास !

सकाळच्या उन्हात फिरण्याला आपण सूर्यस्नान म्हणू. सूर्यस्नानात तयार झालेले ‘ड’ जीवनसत्त्वाचे कच्चे रेणू नंतर शरीरात यकृत या अवयवात जातात. तिथे त्यांचे रेणू थोडे पक्केहोतात. त्यानंतर ते मूत्रपिंडाकडे नेले जातात. तिथे त्यांचे पक्के ‘ड’जीवनसत्त्व होते. त्यालाच डॉक्टरी भाषेत ‘कोलेकॅल्सिफेरॉल’ म्हणतात. या प्रक्रियेला अठ्ठेचाळीस तास लागतात.

‘ड’ जीवनसत्त्व मूत्रपिंडात तयार झालं की, त्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य सुरू होतं… ते म्हणजे शरीरातून लघवीवाटे बाहेर पडणार्‍या कॅल्शिअमला पकडून परत शरीरात कार्यरत करणं. आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण झाली तर शरीर हाडातून-दातातून हाडं पोखरून कॅल्शिअम काढून घेतं. (आपल्याला घर बांधणीसाठी दगड लागतात ते आपण गावाच्या आसपासच्या टेकट्या, डोंगर पोखरून मिळवतो. पोखरलेले डोंगरही पावसापाण्यामुळे कोसळू शकतात.) पोखरलेली हाडं ठिसूळ बनतात. अशी हाडं मोडण्याची शक्यता वाढते.

स्कार्फ आणि सनस्क्रीन लावण्यापूर्वी..

उन्हामुळे त्वचा काळवंडते म्हणून घराबाहेर पडल्यावर अनेक मुली-स्त्रिया विशेषत: वाहन चालवताना चेहरा झाकून घेतात, हातपायही झाकून घेतात. त्यांच्यात ‘ड’जीवनसत्त्वाचा अभाव निर्माण होऊ शकतो. त्वचा उजळ करण्याचे दावे करणारी क्रीम्स शिवाय ‘सनस्क्रीन’ लावतात. त्यातील रसायनं त्वचेच्या आत ऊन जाऊ देत नाहीत. कितीही‘माइल्ड’ क्रीम असलं तरी ते अतिनील ‘ब’ किरणांना त्वचेच्या आतल्या भागापर्यंत पोचू देत नाही. त्यामुळेच ‘ड’जीवनसत्त्व तयार होण्यास मज्जाव होतो.

सतत ऊन टाळत राहिलात तर..

आपल्या शरीरात एक मिलिलिटर रक्तात ५0 ते ७0 नॅनोग्राम इतक्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व असावंच लागतं. इतकंसं ‘ड’ जीवनसत्त्व आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ३000 जनुकांना कार्यरत ठेवतं. ही जनुकं कार्यरत राहिली नाहीत तर शरीरात अनेक व्याधी आणि आजार निर्माण होऊ शकतात.
ड जीवनसत्त्वाचा अभाव ओळखण्याची सर्वात सोपी परिक्षा म्हणजे – छातीचे हाड अंगठ्याने दाबा.
दाबल्यावर कळ आली किंवा दुखले तर ड जीवनसत्त्वाचा अभाव असू शकतो.

ड जीवनसत्त्वाअभावी

ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडांमध्ये पोकळ्या वाढतात. पुढे मन दडपलेले असणे, मधूमेह, लठ्ठपणा, सोरायसीस, दुभंगलेली मनोवस्था, स्तनाचा, गर्भाशयाचा, प्रोस्टेटचा कर्करोग अशा अनेक विकारांची पायाभरणी होऊ शकते.

इतकी पाळी कशाला येऊ द्यायची ?
त्यापेक्षा उन्हात थोडे उघड्याने फिरून –बसू दे थोडा चटका!

लेखक – विनय र.र.
स्रोत :मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

संकलन – #ज्ञानभाषामराठी

(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..