सम्राट अकबराच्या पदरी असलेला बिरबल फारच चतुर होता. त्यामुळे बिरबलाच्या भेटीशिवाय अकबरला एक दिवसही चैन पडत नसे. मात्र एकदा इराणच्या राजाच्या निमंत्रणावरुन बिरबल इराणला गेला. लवकर परत ये सांगूनही बिरबलाला भारतात परत येण्यास खूप उशीर झाला. त्यामुळे साहजिकच अकबर खूप बेचैन होता. मात्र आल्यानंतर तो तडक अकबराला भेटायला गेला. त्यामुळे त्याला पाहून अकबराला खूप आनंद झाला. इराणच्या भेटीविषयी त्याने बिरबलाला विचारले. तेव्हा तेथील राजा खूपच चांगला असून आपले त्याने फार मोठे जंगी स्वागत केल्याचे बिरबलाने सांगितले.
इराणच्या भेटीत तेथील राजाने बिरबलाला विचारले होते की, माझ्यात आणि सम्राट अकबरात कोणता फरक आहे? त्यावर बिरबलाने त्या राजाला उत्तर दिले होते की, आपण पौर्णिमेच्या चंद्रासारखे आहात, तर आमचे सम्राट अकबर द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे आहेत. ते ऐकून इराणचा राजा खूष झाला. बिरबलाने हा किस्सा अकबरालाही ऐकविला.
त्याबरोबर अकबर राजा खूपच संतापला तो म्हणाला, “मी म्हणजे कोर आणि तो म्हणजे पौर्णिमेचा चंद्र असे सांगून तू माझा अपमानच केला आहेस. दुसर्या राजासमोर माझा अपमान करुन तू फार मोठा गुन्हा केला आहेस असे तुला वाटत नाही काय?” त्यावर बिरबल अकबराला म्हणाला तुम्हाला चंद्राची कोर आणि पौर्णिमेचा चंद्र यातील फरक नीट कळला नाही म्हणून तुम्हाला माझा गुन्हा वाटतो. पौर्णिमेचा चंद्र दिवसेंदिवस कमी कमी होत जातो तर द्वितीयेची चंद्रकोर दिवसेंदिवस वाढत जाते तसेच प्रकाशमान होत जाते. आपले साम्राज्य व किर्ती ही चंद्रकोरीसारखी आहे असेच मी इराणच्या राजाला सांगितले. त्यावर अकबराने खूश होऊन बिरबलाला शाबासकी दिली व अर्थ न कळल्याबद्दल माफीही मागितली.
Leave a Reply