बोलले लोक हे भणंग मला
अन सुचू लागले अभंग मला
कल्पनेच्यासवे उडालो मी
थबकुनी पाहती विहंग मला
एक अट ही असे प्रवासाची
सोबतीला हवा अपंग मला
लाल लाजून जाहली संध्या
आठवे कोणता प्रसंग मला
पाहुनी या फकीर जगण्याला
बोलवू लागले मलंग मला
वाढली ही तहान कवितेची
नर्मदेने दिला तरंग मला
एकटे पाहुनी मला हसतो
(त्रास देतो किती पलंग मला)
वेगळा रंग हा भटांचा अन
लागला हाय तोच रंग मला
जाणशी तू मला पुरे आहे
ही प्रसिध्दी नको सवंग मला
थांबला हा विडा मुखापाशी
याद देते तुझी लवंग मला
जन्म पुढचा मिळेल कुठलाही
पण कलेचे असेल अंग मला
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply