जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी करायचं राहून गेल्याची खंत ही असतेच. माझ्या आयुष्यात जेंव्हा मी मागे वळून पाहतो तेंव्हा मी जिच्यावर मनापासून प्रेम केल तिच्याकडे माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त न केल्याबद्दलची खंत मला आजही अस्वस्थ करते. कदाचित त्यावेळी मी जो विचार केला तो बरोबर नव्हता हे मला आज वाटते आहे कारण आज मी विचारवंत झाल्याचा मला साक्षात्कार झालेला आहे पण त्या वेळची माझी जगाकडे पाहणारी दृष्टी आणि माझी आजची जगाकडे पाहण्याची दृष्टी यांच्यात बरेच अंतर निर्माण झालेले आहे. हे खरं होत की माझे तिच्यावर जिवापाड प्रेम होते तिचे चालणे, बोलणे, हसणे, नावणे, गाणे, रूसणे आणि रडणे ही मला आवडत होते. पण सर्वात महत्वाचे म्ह्णजे तिच्या अचाट बुध्दीमत्तेवर माझे खरे प्रेम होते. तिला ही माझ्यातील कला गुणांबद्दल आदर होता. त्यावेळच्या माझ्या कुटूंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि माझ्या खाद्यावर मी स्वतःहून घेतलेल्या माझ्या कौटूंबिक जबादार्यांमुळे मी माझं तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही. मला ती नाही म्ह्णण्याची भिती वाटत नव्ह्ती पण जर ती हो म्ह्णाली तर तिला माझ्यासाठी थांबायला मी कोणत्या तोंडाने सांगणार होतो ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्ह्ते कारण काही तरी जगावेगळे मिळविण्याच्या दिशेने केव्हांच माझा प्रवास सुरू झाला होता.
या प्रवासात मला अनेक जणी भेटल्या पण त्यापैकी एकही तिची बरोबरी करू शकत नव्हती. अजून काही वर्षे ती थांबली असती तर कदाचित मी माझं प्रेम तिच्यासमोर व्यक्त केलच असत. पण कदाचित ते नियतीलाच मान्य नसावे बहूदा. तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला मी तिच्या या निर्णयाच समर्थनच केल कारण तेंव्हा मला माझं ध्येय खुणावत होत. पण तिला गमावल्यावर थोड्याच वर्षात मी काय चूक केली हे माझ्या लक्षात येऊ लागले. आज मी मिळविलेल्या यशावर फक्त तिचा आणि तिचाच अधिकार आहे. माझे यश हे मला फक्त तिच्यासोबत साजरं करायला आवडलं असतं म्ह्णूनच मी माझ्या यशाचा आनंद आजही कोणासोबत कधीच साजरा करीत नाही. मी माझे तिच्यावरील प्रेम व्यक्त केल नाही याची मला सर्वात जास्त खंत जाणवते कारण मी जर तस केल असत तर कदाचित माझ्या जीवनाला एक वेगळच वळ्ण मिळाल असत आणि मी तिच्या ही जगण्यालाही एक अर्थ प्राप्त करून देऊ शकलो असतो. आज तिच्या वाट्याला आलेले एका सर्वसामान्य गृहीणीचे जीवन माझ्या मनात खर्या अर्थाने खंत निर्माण करून जाते. माझं प्रेम अबोल न ठेवता बोलून व्यक्त केल असत तर कदाचित माझ्या आयुष्यातील ही एकमेव खंत ही दूर झाली असती.
— निलेश बामणे
Leave a Reply