भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. जिल्ह्यातून वाहणा-या वैनगंगा नदीमुळे शेतीला सिंचनासाठी पाणी मिळते. तसेच मासे व झिंग्याच्या व्यवसायातून मासेमारी कुटुंबांचा चरितार्थ चालतो. उच्च प्रतीचे मंगनीजचे साठे याच जिल्ह्यात आहेत. तलावांचा व भात उत्पादक जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. टसर रेशमापासून साडय़ा व अन्य वस्त्रांचे पारंपरिक पध्दतीने विणकाम करण्यात येथील विणकरांचा हातखंडा आहे. जंगलातील वन व रेशिम विभागाच्या जमिनीवर असलेल्या ऐन व अर्जुन वृक्षावर टसर अळ्यांचे संगोपन करुन त्यापासून कोसा तयार करण्यात येतो.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात निष्टी हे गाव आहे. या गावातील मासेमारी करणा-या ११५ कुटुंबांनी रेशिम विभागाच्या ६०० हेक्टर जमिनीवर रेशिम व्यवसाय सुरु केला आहे. तेथील ऐन व अर्जुन झाडावर कोष तयार करणार्या अळीचे पालन करुन रेशिम शेती व्यवसायात त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.
मागील १५० वर्षांपासून ही कुटुंबे पिढीजात कोषाचे उत्पादन करीत आहेत. मासेमारी सोबतच रेशिम शेतीने त्यांना पुरक व्यवसाय उपलब्ध झाला आहे. कोष निर्माण करण्याची प्रक्रिया अवघड असली तरी चिकाटीने परिश्रम करुन मोठय़ा प्रमाणात रेशिम कोष उत्पादन घेतले जात आहे. एक कोष उत्पादक हा ५०० ते ६०० अंडय़ातून २० ते ३० हजार कोषाचे उत्पादन करुन सात हजार रुपये नफा कमावतो. या रेशिम शेतीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. तसेच त्यांचा दर्जाही वाढला आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील एकमेव टसर बीज उत्पादन केंद्र भंडार्यापासून १४ कि.मी. अंतरावर पवनी मार्गावर दवडीपार येथे आहे. २१६ हेक्टर क्षेत्रामध्ये असलेल्या या प्रकल्पात टसर अळीची अंडी उबवणे, अंडय़ातून जन्माला येणा-या अळ्यांची अर्जुन व ऐन वृक्षावर जोपासना करुन कोसा तयार करण्यात येतो. कोसातून जिवंत निघणा-या प्युपा ते फुलपाखरु यातील नर-मादीचे ६ ते ८ तास
मिलन होते. त्यानंतर मादीचे दोन्ही बाजुचे पंख अर्धवट कापल्यानंतर मादीला मातीच्या वाटीत झाकूण ठेवतात. तीन दिवसांत एक मादी २०० ते २५० अंडी देते.
सुक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने मादी किटकाची तपासणी केली जाते. मादीचे रोगग्रस्त अंडे बाजुला फेकण्यात येते. रोगमुक्त अंडय़ांना एकत्र करुन पाणी व हायड्रोक्लोरिक असिडच्या द्रावणाने धुवून ही अंडी जाळीच्या स्ट्रेमध्ये सुकविण्यात येतात. सुकलेल्या अंडय़ातून नवव्या दिवशी प्रथम अवस्थेतील अळी बाहेर पडते. या अळ्यांना ऐन-अर्जुनाच्या झाडावर सोडले जाते. पाने खाणा-या अळ्यांमध्ये चार अवस्थेपर्यंत बदल होतो. पाचव्या अवस्थेमध्ये अळी कोष गुंडाळणे सुरु करते व त्यानंतर पूर्ण कोष तयार होतो. तोंडातील लाळेव्दारे आतील तंतू सैल करुन २१ ते २५ दिवसानंतर फुलपाखरु कोषातून बाहेर पडतात. कोष गुंडाळणीच्या अवस्थेत अळीचे वजन सुमारे ५० ग्रॅम व लांबी ५ ते ६ इंच इतकी असते.
शंभर माद्यांच्या अंडीतून जवळपास ४ ते ५ हजार कोष तयार होतात. वर्षातून तीनदा म्हणजे जुलै ते ऑगस्ट या कालावधीत ४० दिवसांचे, सप्टेंबर ते ऑक्टोंबर दरम्यान ५० दिवसाचे व नोव्हेंबर ते जानेवारी या ६० दिवस कालावधीचे कोषाचे पीक घेतले जाते.
दवडीपार येथील केंद्रीय रेशिम बोर्डाच्या ‘बुनियादी बीज प्रगुणन एवं प्रशिक्षण केंद्र’ येथे उत्पादित होणार्या अंडय़ांचा पुरवठा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड व रत्नागिरी येथे टसर रेशिमांची शेती करणा-या शेतक-यांना रेशिम संचालनालयामार्फत अनुदानावर केला जातो. दीड लाख रोगमुक्त अंडी या केंद्रातून उत्पादित होतात. शेतक-यासाठी रेशिम संचालनालय २०० ग्रॅम अंडी असलेल्या पिशवीला ८०० रुपये याप्रमाणे खरेदी करते. या केंद्राला दरवर्षी दीड लाख टसर रेशिमाच्या अंडी विक्रीतून सहा लाख रुपयांची मिळकत होते. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील शेतकरी टसर रेशिम शेतीकडे आकृष्ट झाला पाहिजे यासाठी केंद्रीय रेशिम बोर्डाच्या सहकार्याने आणि पुण्याच्या बायफ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे.
—
Leave a Reply