15 ऑगस्ट 1936
भारत ब्रिटिशअंमलमुक्त होण्याच्या नियोजित विधिनाट्याच्या बरोबर 11 वर्षे आधी वॉली हॅमंड या शैलीदार ब्रिटिश फलंदाजाने भारतीय कसोटी संघाविरुद्ध पहिले दुहेरी शतक झळकावण्याचे स्वातंत्र्य ब्रिटिश संसदेच्या संमतीशिवाय घेतले होते. केनिंग्टन ओवलवर झालेल्या या सामन्यात त्याने 217 धावा काढल्या पहिल्या डावात. अखेर मोहम्मद निसार यांनी त्याचा त्रिफळा उडवला. डॉन ब्रॅडमन यांनी निवडलेल्या सार्वकालिक सर्वोत्तम कसोटी संघात हॅमंडचा बारावा खेळाडू म्हणून समावेश झालेला होता.
फ्लॅशबॅकवर एक फ्लॅश
क्रिकेटचा सामाजिक इतिहास मांडूनही गेल्या 14 दिवसांमध्ये मांडलेल्या घटनांमध्ये गोलंदाजांना प्राधान्य काय, कुणाचा समावेशच नाही असे झालेले आहे. तेव्हा आजपासून कंदुकफेक्यांनाही बरोबरीचा वाटा देण्याचा प्रयत्न मी करीन. प्रतिसादांबद्दल (प्रतिक्रिया नव्हे, न्यूटनचा मान राखूनही तो म्हणतो क्रिया = प्रतिक्रिया पण विरुद्ध दिशेने) आभार. व्यक्तिस्वातंत्र्याचा मान राखून केलेल्या सूचना जरूर स्वीकारल्या जातील.
गोलंदाज ट्रूमनचे त्रिशतक
भारत ब्रिटिशअंमलमुक्त झाल्यानंतरच्या कालचक्रातील 16 वार्षिक आवर्तने पूर्ण झाल्याच्या दिवशी कसोटी सामन्यांमधील गोलंदाजाचे पहिले त्रिशतक पूर्ण झाले. (सतरावा किंवा आजचा तथाकथित ’त्रेपन्नावा स्वातंत्र्यदिन’ असे म्हणणे ही शब्दांची क्रूर थट्टा तर आहेच पण म्हणणारांनी बुद्धी गहाण टाकल्याचा आणि अजूनही स्वातंत्र्य लाभलेले नसल्याचा ढळढळीत पुरावा आहे. दुसरा तथाकथित स्वातंत्र्यदिन म्हणायला तुम्ही पुन्हा पारतंत्र्यात गेला होतात? ‘नियतीचा न्याय’ हाच असावा.) कांगारूंसोबत ओवलवर खेळल्या जात असलेल्या कसोटीत फ्रेड्रिक सिवर्ड्स ट्रूमनने नील हॉकला बाद करून कसोटी कारकिर्दीतील आपले 300 बळी पूर्ण केले. झेल्या (कॅचर) होता स्लीपमधला कोलिन कौड्री. फ्रेडचे बळी क्र. 298 आणि 299 याच दिवशी उपाहारापूर्वीच्या सलग दोन चेंडूंवर आलेले होते. हॉकने ट्रूमनचा त्रिक्रम हुकवला पण तो जास्त काळ टिकू शकला नाही.
सामना अनिर्णित राहिला. “हा विक्रम मोडणारा माणूस खूप दमलेला असेल” अशी ‘प्रतिक्रिया’ फ्रेडने दिली होती. हा ‘दमलेला माणूस’ ‘फायरी फ्रेडी’चा संघभाऊच होता (बीफी हे त्याचं लाडाचं नाव). 1975-76च्या हंगामात तो ट्रूमनच्या 307 बळींना मागे टाकता झाला आणि त्याने ट्रूमनच्या प्रतिक्रियेला ‘प्रतिसाद’ दिला – “त्याला वाटत असेल तेवढा मी दमलेलो नाही.” त्याचं नाव आत्ता न सांगण्याचं स्वातंत्र्य मी राखून ठेवतो!
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply