संध्याकाळी कुठेतरी बातम्यांत ऐकलं की दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पार धुव्वा उडालाय. सहज म्हणून टिव्ही लावला. टेन स्पोर्टस चॅनेलवर सामना सुरु होता. २९ धावात ९ गडी बाद अशी ऑस्ट्रेलियाची पुरती वाट लागलेली दिसली आणि शेवटची जोडी खेळत होती.
चालू असलेली ओव्हर संपली पण जाहिराती काही सुरु झाल्या नाहीत. नविन ओव्हर सुरु झाली पण स्क्रिनच्या खालच्या भागात नेहमीच्या परिचयाच्या जाहिराती काही दिसल्या नाहीत.
खरंतर आपल्याला क्रिकेटच्या खेळापेक्षा या जाहिरातीच जास्त बघायला लागतात. अर्धा स्क्रिन त्यांनीच व्यापलेला असतो. पण इकडे आणखी एक ओव्हर संपली पण एकही जाहिरात नाही. खरंच नवल वाटलं. ४-५ ओव्हर्स होऊनही एकही जाहिरात नाही. मध्ये एकदा जोरदार अपील झालं….पॅवेलियनमधल्या पंचाकडे अपील गेलं. मैदानावरच्या घडामोडी पूर्णपणे दिसत होत्या पण एकही जाहिरात नाही! अरे काय चाललंय काय? यांना एकपण जाहिरात मिळाली नाही की काय? दोन तुल्यबळ संघ. पण त्यांच्या सामन्याला कोणीच प्रायोजक नाही? जाहिरातदार नाही? काय दिवस आलेत?
आमच्याकडे अगदी कॅनडा किंवा बांगलादेश सारखा फडतुस संघ जरी खेळत असला तरी ओव्हरचा शेवटचा बॉल कधी एकदा पडतोय आणि जाहिरात सुरु होतेय असं चित्र असतं. बॉलर धावत जातानासुद्धा अर्धा स्क्रीन जाहिरातीनेच व्यापलेला असतो. एखादा खेळाडू आउट झाला की लागलीच जाहिरात.
परदेशातल्या सामन्यात जाहिरात नसण्याची काही कारणे शोधली तर बरीच मिळतात. खाली त्यातली काही दिली आहेत.
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते कळवा आणि आणि खास बक्षीस जिंका…
१. जाहिरातदारांच्या दृष्टीने बहुतेक दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अगदीच फालतू असावेत.२. या दोन देशांमध्ये कोणी क्रिकेट सामना टीव्हीवर पहातच नसावे….मग टीआरपी नाही म्हणून जाहिरातीही नाहीत…..३. जाहिरातदारांवर फार मोठ्ठा टॅक्स असावा ज्यामुळे ते जाहिरातच करत नसावेत४. क्रिकेटवर वेळ आणि पैसा खर्च करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा हे त्या देशांच्या जाहिरातदारांना पटले असावे५. कदाचित अती जाहिरात करणार्या कंपन्यांचा माल त्या देशातली जनता खरेदी करत नसावी६. कदाचित जाहिरातीमुळे रसभंग करणार्या कंपन्यांवर त्या देशातल्या जनतेने बहिष्कार टाकला असावा ७. जाहिराती फक्त भारत खेळत असलेल्या सामन्यातच लावायच्या असा जाहिरातदारांचा ठराव असावा
काय वाटतं तुम्हाला? उत्तर पाठवताय ना? स्पर्धेत भाग घेण्यासाठी एसएमएस करा ४२० या नंबरवर… आणि लिहा ऑप्शन क्रमांक १,२,३,४,५,६ किंवा ७
पैसे तुमचे….फायदा आमचा! कारण तुमच्या एसएमएसचे ५ रुपये जाणार आहेत आणि त्यातले ३ रुपये आमच्या खिशात येणार आहेत हे तुम्हाला माहित आहे कुठे?
बक्षिस काय ते माहित आहे का? भारताच्या “ड” संघाच्या बाराव्या खेळाडूबरोबर बारामतीच्या “गोड”बोल्यांच्या टपरीवरचा खास अमृततुल्य चहा पिण्याची संधी!!!!!!
तुमच्यासारख्यांच्या एसएमएसमधून जमलेल्या पैशातूनच बरं का?
क्रिकेटचे फायदे तर बघा…….आहे का तुमच्या देशातल्या कबड्डी, खोखो, कुस्ती वगैरेमध्ये एवढा दम?
खेळाडूंना खेळायची हमी रक्कम मिळणार……क्रिकेट बोर्डाला मॅच फी मधून भरघोस उत्पन्न मिळणार….ज्या संघटनेचं मैदान त्यांनाही भरघोस उत्पन्न मिळणार…..क्रिकेट बोर्डाला लाईव्ह प्रसारणाची रॉयल्टी मिळणार….मॅक-डोनाल्ड आणि कोकचा धंदा जोरदार होणार….पाणी विकणार्यांची तर चांदीच होणार….बियर आणि दारु बनवणार्यांची जाहिरात पाण्याच्या किंवा सोडावॉटरच्या नावाने होणार….जाहिरातदारांचा माल जास्त खपणार….टिव्ही चॅनेल्स मालामाल होणार….
तुम्हाला काय मिळणार? म्हणूनच म्हटलं…. भारतीय मूर्ख आहेत का?
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply