आज घरातील वातावरण खूप तापलेले होते. नातवांनी खूप मस्ती केली होती. आरडा- ओरडी, झोंबा- झोंबी, मारा- माऱ्या सारे झाले. क्रिकेट चेंडू फेकणे घरातच झाले. फ्रेम पडली व फुटली. हे सारे बालवयातील त्यांना आनंद व मजा देणारे, परंतु इतरांना वैताग आणणारे होते. सुटीचा दिवस तेंव्हा घरी त्यांचे आई बाबा दोघेही होते. सहन शक्तीचा अंत बघणारे झाले, तेंव्हा बाबा उठले, रागावले, थोडीशी शिक्षा पण केली. त्यांचे सारे खेळ बंद केले.
” आज कोठेही बाहेर बागेत जायचे नाही.” हीच शिक्षा, बाबा ओरडले.
रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.
” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.” मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती. त्यांना आज बाहेर बागेत जाण्याची बंदी घालण्यात आलेली होती. आजोबा म्हणजे बाबांचे बाबा. सर्वात मोठे. हा विश्वास व अपेक्षा घेऊन नातू धावत बिलगला. मुलांना फक्त येथपर्यंतच थोडस गणित समजत होत. वय अधिकार आणि भूमिका हेच ते गणित. वयाबद्दल खूपस कळलेल होत. मोठे म्हणजे सर्व आधिकार असलेली व्यक्ती, ही त्यांची समाज. भूमिका ही संकल्पनाच त्यांना माहित नव्हती. जीवनाच्या त्रिकोण मधली महत्वाची बाजू. वय आणि आधिकार ह्या जर दोन बाजू असतील, तर त्या त्रिकोणाचा पाया ” भूमिका ” असते. व्यक्तीच्या संपूर्ण जीवनामध्ये ह्या तिन्हीही बाबी महत्वाच्या असतात. ह्या मानवी सामाजिक व कौटुंबिक संकल्पना होत. वयाप्रमाणे व्यक्तीवर बंधने, कर्तव्ये, आणि त्याप्रमाणे मिळणारे अधिकार आपोआपच मिळत राहतात. ह्यामधून निर्माण होती, ती भूमिकांची साखळी. ती त्याला तशीच वठवावी लागते. त्या भूमिका असतात- बाल वय, विद्यर्थी, तारुण्य, प्रौढत्व, आणि जीवनाच्या अनुभवाचे गाठोडे बांधीत, शेवटी येते ते जेष्टत्व. जसे वय निघून जाते, त्याच वेळी त्या त्या वयाची कर्तव्ये व अधिकार, ही देखील निघून जातात. भूमिका बदलत जातात. जेष्टाच्या भूमिकेत असते, ते फक्त बघणे, जे समोर घडत आहे ते. ऐकणे जे ऐकू येईल तेवढेच. मात्र न बोलणे. सर्वात महत्वाचे म्हणजे जे होत आहे, ते चांगल्याकरिता व चांगलेच होत आहे, ही मानसिकता बाळगणे. आणि हीच भूमिका वठवणे. त्यातच मनाची शांतता लाभेल.
प्रेमाचा आलेला कढ, आणि किंचित पाणावलेले डोळे, ह्यांना रोखीत,
मी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हटले
‘तुझ्या बाबाना विचारून, मज बरोबर बागेत चल.’
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply