लेखक व जाती व्यवस्थापनाचे अभ्यासक डॉ. आशिष नंदी यांचे भ्रष्टाचाराबाबतचे वादग्रस्त विधान हे अतिशय क्लेशकारक व निंदनियच आहे. दहशतवादी, भ्रष्टाचारी किंवा कोणत्याही गुन्हेगारांचे वर्गीकरण विशिष्ट जाती अथवा धर्मामध्ये करणे किंवा त्यांचे कुळ सांगणे उचित नाही. कारण माणूस जन्माने भ्रष्टाचारी अथवा गुन्हेगार नसतो तर भौगोलिक परिस्थितीनुसार तो घडत असतो. त्याच्या गुन्हेगारीचे समर्थन कोणताही धर्म अथवा समाज करणार नाही. विद्वानांचे भ्रष्टाचार सफाईदार असल्याने ते शक्यतो उघडकीस येत नाहीत. वास्तविकता भ्रष्टाचाराचं मूळं, दिवसागणिक वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या गरिबीत, बेरोजगार तरुणाईत व महागाईत आहे. त्यातून कमावते कमी आणि मोठे कुटुंब, वाढत्या कुटुंबानुसार वाढत्या गरजा आणि गरजांवर मात करण्यासाठी कुवती पलीकडे अंगी बाळगलेल्या महत्वाकांक्षेत भ्रष्टाचाराचे मूळ आहे. तसेच समाजातील आर्थिक विषमता आणि झटपट श्रीमंतीची स्पर्धा, आरक्षणामुळे गुणवत्ता डावलली गेल्याने सक्षम प्रशासकांचा अभाव, निवडणुकांवर खर्च होणाऱ्या काळ्या पैशाचा प्रभाव, कमकुवत कायदा अन् त्यातील पळवाटा आणि त्या पळवाटा जाणणारी विद्वत्ता, ह्या गोष्टी सुद्धा भ्रष्टाचाराला पूरक असून त्या नियंत्रणात आणून त्यात सुधार व्हायला पाहिजे. कठोर कायदा करून भ्रष्टाचाऱ्यांची वाहने, जमीन-जायदाद, बँक बँलन्स, मालमत्ता जप्त करून ती सरकारी कोशात जमा करायला हवीत. यापुढे गुणवत्तेला प्राधान्य देवून आरक्षणाचा वापर जातीय उन्नतीसाठी नव्हे तर आर्थिक विषमता एका समान पातळीवर आणण्यासाठी झाला पाहिजे. जेव्हा लोकसंख्या समान नागरी कायद्यारूपी आटोक्यात येईल. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या व पिकांच्या उत्पादनात वाढ होईल. देशातील जीवनावश्यक उत्पादनांची आयातीपेक्षा निर्यात अधिक वाढेल तेव्हाच महागाई आटोक्यात येईल. बेकारी व बेरोजगारीचा नायनाट होऊन प्रत्येकाला कुवती प्रमाणे रोजगार उपलब्ध होईल. प्रत्येक कामगाराला मिळणाऱ्या मेहनतीच्या उत्पन्नातून त्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांसहित आरोग्य, शिक्षण, सिंचन, विद्युत अशा जीवनावश्यक गरजा मिटतील तेव्हा लाच मागण्याचा किंवा भ्रष्टाचाराने हात काळे करण्याचा मोह त्याला होणार नाही. माझं काम न्यायिक मार्गानेच व्हावं किवा करेन. माझ्या चुकीची सजा मला व्हावी. त्यासाठीचा दंड मी प्रामाणिकपणे भरेन. सजा व दंड टाळण्यासाठी मी लाच देणार नाही. काम झालं नाही तरी चालेल परंतू त्यासाठी मी लांच देणार नाही. मी कुणाचेही काम वेळेत किंवा वेळे अगोदर करण्यासाठी लांच मागणार नाही. मी न्यायिक मार्गाने फक्त श्रमाचाच पैसा कमवेन त्यासाठी भ्रष्टाचारासारख्या गैर मार्गाचा वापर करणार नाही. अशा प्रकारची लाचविरहीत स्वावलंबन वृत्ती व स्वाभिमानाच्या भावना प्रत्येक मना-मनात जेव्हा रुजू लागतील तेव्हापासून भ्रष्टाचार निर्मुलनास खऱ्या अर्थाने सुरवात होईल.
सुभाष रा. आचरेकर, वांद्रे(पूर्व).
— सुभाष रा. आचरेकर
Leave a Reply