नवीन लेखन...

मतदानाची किंमत

ती दूरचित्रवाणीवर एक जाहिरात आजकाल दाखविली जाते. एरवी या जाहिराती फारशा कल्पक असतात असं नाही. काही तर हास्यास्पदच असतात. पण ही मात्र विचार करायला लावणारी आहे. कोणाच्या तरी नावाचा जयघोष करत लोकांचा एक समूह एका तरुणाकडे येतो. त्यातलाच काळा चष्मा घातलेला एक मध्यमवयीन माणूस पुढं होतो. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा मग्रूर आत्मविश्वास आहे. ’ मी तुमचं मत मागायला आलो आहे.’ असं तो सांगतो. पण त्याच्या हावभावांवरून तो ते मत मागायला नाही तर त्याचा हक्क बजाववयाला आला आहे आणि त्या तरुणाला त्याच्या उत्तरदायित्वाची जाणीव करून द्यायला आला आहे असंच वाटतं. तो तरुण त्याला बसायला सांगतो. आत कोणाला तरी त्या ’साहेबां’साठीही चहा बनवायला सांगतो. खुषीत तो माणूस बसतो आणि तरुण आपला पहिला प्रश्न विचारतो. ’ तुमचं क्वालिफिकेशन काय?’ तो माणूस गुगली चेंडूनं विकेट घेतल्यासारखा गोंधळतो. तो तरुण परत म्हणतो, ’ क्वालिफिकेशन राहू दे बाजूला. तुमचा वर्क एक्स्पिरियन्स सांगा.’ तो माणूस त्याचं उत्तर देणार तोच त्याचा एक चमचाच पुढं होत सांगतो. ’गेल्या पंचवीस वर्षांपासून साहेब या लायनीत आहेत.’ तो तरुण परत म्हणतो, ’ तसं नाही. वर्क एक्स्पिरियन्स म्हणजे कन्स्ट्रक्शन, एंजिनियरिंग, वगैरे वगैरे.’ त्या मत मागणार्‍या इसमाला हे सारं अनपेक्षित आहे. आतापर्यंत तो हरवल्यासारखा बसलेला असतो. पण त्या तरुणाच्या या प्रश्नांचा रोख कळल्यासारखा तो मोठमोठ्यानं हसत विचारतो, ’ माझा इंटरव्यू घेतोयस की काय पोरा?’ . तो पोर न डगमगता म्हणतो, ’ मग एवढ्या मोठ्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय केल्यावर…’ त्याला मध्येच तोडत तो इसम परत हास्याचा गडगडाट करत कुत्सितपणे विचारतो, ’ कसला जॉब?कोणता जॉब?’ यावर आपला चेहरा गंभीर करत आणि स्वरातही थोडी ताठरता आणत तो तरुण म्हणतो, ’ देश चालवायचा जॉब.’ यावर त्या इसमाचा चेहरा पडतो आणि चिंतेच्या आठ्या त्याच्या कपाळावर रांगोळी काढू लागतात. त्या तरुणानं ’ घ्या, चहा घ्या.’ म्हणत हातात दिलेला कप काडे चिराईताच्या काढ्याचा असल्यासारखा चेहरा करत तो गप्पच राहतो.

त्या तरुणाचं मला कौतुक वाटतं. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब रोजच्या घडामोडींमध्ये कसा करावा याचा वस्तुपाठच तो देत असतो. तो विचारते तसे प्रश्न आपल्याला कधी पडतात का? मतदार हा राजा आहे असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. मग त्याचं मत मागायला आलेल्या मंडळींनी त्या मताला आपण लायक कसे आहोत हे सिद्ध करून दाखवायला नको? साधी पाच रुपयांची भाजी घ्यायची तरी आपण तिची नीट पारख करून घेतो. मग त्या भाजीपेक्षा किती तरी पटीनं किंमती असणारं आपलं मत देताना ते कोणाला देत आहोत त्याची व्यवस्थित चौकशी नको करायला?

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..