नवीन लेखन...

मत, विश्वास आणि वास्तव

युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते.

‘त्या दोन जिल्ह्यात’ मी जाण्याआधी युनिसेफने कोट्यवधी रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खर्च केले होते. शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या पंधरा-पंधरा दिवसांच्या शिक्षकांच्या निवासी कार्यशाळा प्रत्येक तालुक्यात झाल्या होत्या. त्यानंतर गावात झाल्या. एकदम होलसेलमधे शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य निर्माण केले होते. जिथे या कार्यशाळा सुरू असत तिथे रंगीबेरंगी कागद, वेगवेगळ्या आकाराचे व रंगांचे मणी, फेविकॉल, तारा, कात्र्या, सुऱ्या, हातोड्या, वेगवेगळ्या जाडीचे पुठ्ठे, कार्डबोर्डस्, सोनेरी चंदेरी कागद, टिकल्या, स्केच पेन्स, मार्करर्स, ब्रश, पोस्टर कलरर्स, अंक पत्ते, चित्रांचे कॅटलॉग अशा अनेक गोष्टींचा अक्षरश: खच पडलेला असे. ज्या शाळेत प्रशिक्षण असे त्या शाळेतील वर्गात शैक्षणिक साहित्याचा कच्चा माल साठवून ठेवल्याने वर्गातील मुलांना दुसऱ्या वर्गात किंवा व्हरांड्यात महिनाभर तरी बसावं लागे. आणि प्रशिक्षण कालावधीत शाळेला जत्रेचे रुप प्राप्त होई. शाळेच्या आवारातच शिक्षकांचे जेवण, नाश्ता, चहा आणि गुटखा-गप्पा यांचा फड जमलेला असे. काही राजकीय वजनदार शिक्षकांचा तर ‘उशीरा येणे व लवकर निघणे’ असा एक कलमी कार्यक्रम असे. शाळेतील 150 मुलांपेक्षा प्रशिक्षणाला आलेल्या 150 शिक्षकांचाच कलकलाट अधिक असे.

‘अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी, संबोधासाठी एक शैक्षणिक साहित्य हवेच’ असे काहीसे त्या शिक्षकांना प्रशिक्षणात शिकविलेले होते. उदा. इयत्ता पहिलीच्या गणित अभ्यासक्रमाच्या त्यांनी ३२ पायऱ्या केल्या होत्या. या प्रत्येक पायरीसाठी एक साधन. पाच शिक्षकांचा एक गट ही 32 साधने तयार करत असे. प्रशिक्षणानंतर ही साधने शिक्षक आपापसात वाटून घेत. पण हे पाच शिक्षक वेगवेगळ्या तीन शाळातले असत. त्यामुळे आणखीनच गोंधळ होई. हे झाले फक्त गणिताचे. त्यानंतर भाषा व विज्ञान. प्रशिक्षणाच्या ठिकाणी गणिताची साधने, भाषेची साधने व विज्ञानाची साधने असे तीन ढीग केलेले असत. संसाधन व्यक्ती शिक्षकांकडून विषय निहाय साधने मोजून घेत. त्यामुळे तिथे साधनांच्या उपयुक्ततेवर चर्चा होत नसे तर साधनांचा कोटा पूर्ण केला का? यावर चर्चा होत असे.

खरं म्हणजे कुठलेच शैक्षणिक साधन हे एखाद्या विशिष्ट विषयाचे किंवा संबोधाचे नसते. तर शिक्षक किती कल्पक आहे यावरच सारे अवलंबून असते. कुठलेही शैक्षणिक साधन हे अनेक विषयांसाठी वेगवेगळ्याप्रकारे तर वापरता येतेच पण परिसरातील कुठलीही गोष्ट हे शैक्षणिक साधनच आहे, हे शिक्षकाला माहित असावे लागते. त्यामुळे कुठल्यातरी ठराविक साहित्यावर अवलंबून राहाणे हा शिक्षकाचा परावलंबीपणा आहे याचा आमच्या शिक्षकांना थांगपत्ताच नव्हता. कारण ज्या मान्यवर संस्थेने आमच्या शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं होतं त्यांचच शैक्षणिक साहित्याचं दुकान आहे आणि ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षण’ हा त्यांचा धंदा! असो.

या ‘शैक्षणिक साहित्य क्रांती’ नंतर जेव्हा आम्ही शाळा भेटींना सुरुवात केली तेव्हा, प्लॅस्टीकच्या पिशवित ठेवलेली शैक्षणिक साधने प्रत्येक वर्गात तारेवर लोंबकळताना दिसत. वर्गात मुले 40 ते 45 आणि वेगवेगळी 20 किंवा 25 साधने! ‘प्रत्येक गोष्ट जपून ठेवायची सवय असल्याने’ सर्व साधने ही पंचमहाभूते व मुले यांच्यापासून लांब ठेवलेली! अनेक शाळांतून, ‘कुठले साधन कुठल्या विषयाला वापरायचे? एका विषयाचे साधन दुसऱ्या विषयाला वापरुन चालेल का? ही साधने मोडली तर आमच्यावर कारवाई तर होणार नाही ना? या साधनानी कधी शिकवायचे… म्हणजे यासाठी काही वेगळी तासिका असणार आहे का? आम्ही तयार केलेली सगळी साधने आमच्याकडे आता नाहीत तर मग जुन्याच पध्दतीने शिकवून चालेल का?’ अशा अनेक प्रश्नांबाबत शिक्षकांच्याच मनात संभ्रम होता. एकंदर काय तर ‘अमाप पैसा खर्च करुन ही शून्य फायदा झाल्याचे लक्षात आले.’ पण प्रोजेक्ट चालवायचा असल्याने काही शाळांतून ही साधने वापरणे सुरू आहे असे दाखविणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट पाहण्यासाठी भारतीय किंवा परदेशी पाहुणे येत. त्यांचा ही विचार करणं आवश्यक होतं. मग अशावेळी काही शाळांतून फक्त ‘त्यावेळी’ शैक्षणिक साहित्याचा वापर प्रभावीपणे केला जाई.

या अशा कॅनव्हासवर त्या जिल्ह्यात मी शिक्षण सल्लागार म्हणून रुजू झालो. माझा दुसराच दिवस होता. श्री. नंदकुमार (आय.ए.एस.) हे युनिसेफ तर्फे  तिथे होते. शाळांची, शिक्षकांची व एकूणच शिक्षणाची अवस्था पाहून मी खचूनच गेलो होतो. नंदकुमार भेटल्यानंतर मी तेथील अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचू लागलो तेव्हा मला थांबवत ते म्हणाले,’हे मला सारं ठाउक आहे. म्हणून तर तुझी नेमणूक केली आहे. पुढच्यावेळ पासून माझ्याकडे प्रश्न घेऊन नव्हे तर उत्तरं घेऊन यायचं! या प्रश्नांसाठी तू काय केलंस आणि आणखी काय करायला हवं? हे मला सांगायचं!ठ त्या दिवसापासून मी पूर्णत: बदललो! हे काम आपल्याला केलंच पाहिजे याची आग मनात उसळली. कुठलंही काम सकारात्मक वृत्तीने करण्याची सवयच झाली. मी बएड किंवा डीएड नसल्याचा मला मोठा फायदा झाला. मी वेगळ्या प्रकारे विचार करू शकलो, प्रश्नांना थेट भिडू शकलो! शिक्षकाची अध्यापनातील अडचण सुटलीच पाहिजे हा ध्यास घेऊन, उत्तर मिळेपर्यंत प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करू शकलो. याचे सारे श्रेय मी नंदकुमारांनाच देईन.

आधी सुरू असणाऱ्या प्रशिक्षणाबाबत चौकशी केली तेव्हा कळलं की ‘शिक्षकांच्या अध्ययन आणि अध्यापनातील अडचणींचा त्यात समावेशच नाही.’ त्यामुळे प्रशिक्षणानंतर ही शिक्षकांच्या अडचणी कायमच राहात. आणि विशेष म्हणजे फारच कमी शिक्षकांना याबाबत खंत वाटत होती. असले प्रशिक्षण काय कामाचे? दोन्ही जिल्ह्यातील विशेष गती असणाऱ्या 100 शिक्षकांची दोन दिवसांची कार्यशाळा घेतली. यावेळी त्यांना अध्ययनात व अध्यापनात येणाऱ्या विषय निहाय व इयत्ता निहाय अडचणींची यादी तयार केली. अशी यादी तयार करताना शिक्षकांनी यादीवर त्यांचे नाव लिहिणे अपेक्षित नसल्याने शिक्षकांनी आपले काम निर्भयपणे केले. गणित, भाषा, विज्ञान, परिसर अभ्यास, इतिहास व भूगोल अशा सर्व विषयांच्या इयत्तानिहाय अडचणींच्या याद्या तयार झाल्या. या 100 याद्यांपैकी अडचणींची वारंवारिता आणि प्राथमिकता ठरवून प्रत्येक विषयाच्या 20 अडचणींची अंतीम यादी तयार केली. उदा.गणितातल्या अडचणी होत्या : मुलांना ‘3003’ लिहायला सांगितल्यास काही मुले ‘30003 किंवा 300003’ असेही लिहितात. (कारण आपण लिहितो डावीकडून उजवीकडे व मोजतो मात्र उजवीकडून डावीकडे! त्यामुळे मुलांचा गोंधळ होतो.) तसेच, 36 आणि 63 किंवा 49 व 59 हे अंक लिहिताना मुलांचा गोंधळ होतो. अर्धा,पाव,पाऊण या संकल्पना समजणे, त्याचा व्यवहारात उपयोग करणे या बाबत मुलांचा गोंधळ होतो. पाढे पाठ कसे करावेत. वगैरे.

भाषेतल्या अडचणी : जोडाक्षरं आणि रफार शिकविताना गोंधळ. ‘बैल’ असे न लिहिता काही मुले ‘बइल’ असे लिहितात. मुलांचे अक्षर वळणदार होण्यासाठी व लेखनाची आवड निर्माण होण्यासाठी काय करावे? मुलांना बोली भाषेकडून प्रमाणित भाषेकडे कसे आणावे? इत्यादी. यानुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा आराखडा तयार केला.

शिक्षकांना सक्षम करण्याअगोदर शिक्षकाचे मूल्यमापन होणे ही गरजेचे होते. कारण शिक्षकाला जर अध्ययन व अध्यापनातील स्वत:ची अडचण ओळखता आली व ती निर्भयपणे मांडता आली तरच त्याला त्याचे उपयोजन करणे सोपे होईल. पर्यायाने मुलांसोबत शिकण्याची गती ही वाढेल. त्यासाठी तीन पायऱ्या तयार केल्या.

एक, शिक्षकाला मुलाची अडचण ओळखता येते का?

दोन, मुलाची अडचण ओळखता आल्यानंतर, ती सोडविण्यात शिक्षकाला काय अडचण आहे, हे त्याला समजतंय का?

तीन, मुलाचा प्रश्न सोडविण्यात शिक्षकाला काय अडचण आहे, हे त्याला समजले आहे.पण आता, ही अडचण सोडविण्यासाठी त्या शिक्षकाने कोणत्या संसाधन व्यक्तीची, अधिकाऱ्याची, संस्थेची मदत घ्यायची हे त्याला माहित आहे का? आणि माहित असल्यास तो त्यासाठी उपयोजन करतो आहे का?

या साखळीतील कुठलाही एक दुवा जरी निखळला तरी त्या मुलाच्या शिक्षणातला व्यत्यय कायमच राहतो. हा झाला एक घटक. त्याचप्रमाणे मुलांना,’आनंदाने शाळेत जावे असे अजिबात वाटत नाही!’ यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत :

— रटाळ पाठ्यपुस्तकं व आपली ‘घोका आणि ओका’ शिक्षणपध्दती.
— मूल शिकत असताना जर त्याला कुठली शंका आली तर तो ती बिनधास्त विचारू शकतो, असं निर्भय वातावरणच वर्गात नाही.
— चुका करत शिकण्याची व स्वत: शोधून शिकण्याची संधी मुलांना नाही.
— वर्गातील नीरस अध्यापन व शिस्त म्हणजे शिक्षा! याचा मुलांनी घेतलेला (रास्त) धसका.
— प्रचंड गृहपाठचा बोजा घेऊनच मुलांनी घरी जाणं.
— मुलांनी समोर पाठ्यपुस्तकं किंवा वर्कशीटस् घेऊन सतत काहीतरी लिहित राहणं म्हणजेच अभ्यास करणं यावर पालक आणि शिक्षकांचं एकमत. किंवा ‘एका जागी गप्पं बसून काहीतरी कर’ म्हणजे अभ्यास कर.
— अवांतर वाचन करणं, खेळायला जाणं म्हणजे टाइमपास करणं, याबाबत अनेक शिक्षक व पालक याचं एकमत आहे.
— मुलांना मारुन नव्हे तर प्रेमाने जिंकता येतं. त्यांनी चुका केल्या तर त्याला सुधारण्याची संधी देता येते याची सुतराम कल्पना नसल्याने ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ या ओळी जणू काही राष्ट्रगीतातल्याच आहेत असा अनेक शिक्षकांचा व पालकांचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे अतीव निष्ठेने त्याचंच उपयोजन करण्यावर त्यांचा भर असतो.
— पोर्शन पुरा करणे, हेच काही शिक्षकांचे अंतीम ध्येय असते.
— नवनवीन शिक्षण प्रयोग जाणून घेणे किंवा त्यांचे उपयोजन करणे याबाबात शाळा व शिक्षकांची अनास्था.

या साऱ्या गोष्टींचा विचार करुन, जे ‘मास्टर टिचर्स’ इतर शिक्षकांच्या कार्यशाळा घेणार त्यांच्यासाठी आधी ‘व्हिजनिंग कार्यशाळा’ आयोजित केल्या. आणि एकदा व्हिजनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यातूनच तयार झाली दोन दिवशीय ‘अध्यापन कौशल्य कार्यशाळा.’

शिक्षकांनीच मांडलेल्या अध्यापनातील अडचणी सुटू शकतील असे गरजाभिमूख ‘शून्य खर्चाचे खेळ’ तयार केले. असे हे सुमारे 89 खेळ. यातला प्रत्येक खेळ किमान दहा प्रकारे खेळता येतो. यातील काही खेळ भाषेचे आहेत पण विशिष्ट भाषेचे नाहीत. त्यामुळे ते खेळ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही भाषेसाठी खेळता येतात. त्याचप्रमाणे अनेक खेळ हे युनिव्हर्सल आहेत. ते कुठल्याही विषयासाठी खेळता येतात.

या खेळांचे तीन प्रकार आहेत. एक,संकल्पना स्पष्ट होण्यासाठी काही खेळ. दोन, उजळणी करण्यासाठी खेळ. तीन, मूल्यांकनासाठी खेळ.
याचप्रमाणे भाषिक कौशल्ये विकसित होण्यासाठी काही प्रयोग केले. निबंध लेखनाच्या किमान सहा पध्दती विकसित केल्या. उदा.पावसाळ्यात मुले त्यांच्या शालेय परंपरेनुसार ‘पावसाळ्यातील एक दिवस’हा निबंध लिहित असत. आम्ही मग पावसाळ्याचे तीन गट केले.गावातला पावसाळा, शहरातला पावसाळा आणि झोपडपट्टीतला पावसाळा. वर्तमान पत्रातील फोटो, बातम्या, शाळेजवळच्या झोपडपट्टीत जाऊन मुलाखती, शेजाऱ्यांची व पालकांची मदत आणि त्यांच्या गटांची निरीक्षणे ह्यांची मदत घेऊन मुलांनी धमाल निबंध लिहिले. एका मुलाने निबंधात लिहिले होते, ‘माझ्या घराच्या बाजूला गॅरेज आहे.पाऊस आला की रस्त्यावर विचित्र आकाराची इंद्रधनुष्ये वाहात असतात. हातात काठी घेऊन आम्ही वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ खेळतो!’ ‘वाहणारी इंद्रधनुष्ये जोडण्याचा खेळ!!’ही उत्तुंग कल्पना केवळ मुलेच करू शकतात. मुलांवर विश्वास ठेवला आणि त्यांना जर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले तरच हे शक्य होऊ शकते, असा एक नवीनच साक्षात्कार मला त्यावेळी झाला.

खेळता खेळता मुलांचे पाढे पाठ होऊ लागले. तोंडी गणितं, सम विषम संख्यांची उजळणी, शिटी वाजवा-झांजा वाजवा पण संख्या लिहा, शब्दांचा वाक्यात उपयोग करण्यासाठी खेळ, जोडाक्षरासाठी खेळ, शब्दांचे खेळ, वाक्यांचे खेळ, संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी खेळ, आलेखाचा खेळ, नकाशाचा खेळ, पूर्णांक अपूर्णांकाचा धमाल मस्ती खेळ असे अनेक खेळ रोज शाळेत खेळले जाऊ लागले.

शाळेत खेळ खेळायला मिळतात यामुळे मुलांमधे उत्साह संचारला. आणि या खेळांमुळे मुलांच्या गणिताच्या, भाषेच्या अडचणी सुटतात म्हणून शिक्षकांचा हुरुप वाढला. बालभारतीवर फार अवलंबून राहायचं नाही अस ठरवलं होतं. कारण बालभारती मधील धड्यांचा मुलांच्या भावविश्चाशी काडिमात्र संबंध नाही. मुलांच्या बुध्दीला चालना व आव्हान मिळेल असे त्यात काही नाही. कल्पकता शून्य पुस्तकाचे नाव ‘बालभारती.’ यातील भाषा, आणि धड्याखालील स्वाध्याय हा तर इतका रटाळ प्रकार आहे की मुलांमधे मातृभाषेविषयी अरुची निर्माण करण्यात बालभारतीचाच सिंहाचा वाटा आहे! रवींद्रनाथांचे बालसाहित्य आणि आजचे आपले ‘बालभारतीय बालसाहित्य’ (काही सन्मानीय अपवाद वगळून) ह्याच्या मूळ संकल्पनेतच प्रचंड फरक आहे.

आपल्या बालसाहित्यात उपदेश,शिकवण,संस्कार,तात्पर्य हे सारं ठासून भरलेलं. इतकंच नव्हे तर, समोरचा मुलगा हा ‘अडाणी किंवा मातीचा गोळा’ आहे असं समजूनच जबरदस्तीने त्याच्यावर शिकण्याचा बोजा टाकलेला.

शरीर गोष्टीचं किंवा कवितेचं पण त्याचा आत्मा मात्र ‘मुलांना काहीतरी शिकवणं!’ बिचारी मुले ‘त्या शरीराला’ फसून गोष्ट किंवा कविता वाचायला जातात आणि मग त्यातील ‘आत्मा’ मुलांवर शिकवणीचा मारा करत!! त्यामुळे अवांतर वाचनाविषयी एक नफरत मुलांच्या मनात नकळत निर्माण होते.

रवींद्रनाथांचं सर्वात मोठं योगदान हे की,त्यांनी शिक्षणातच बालसाहित्याचा समावेश केला. बालसाहित्य आणि मुलांचं शिकणं ह्याचा अतिशय गंभीरपणे विचार करुन,त्याबाबत प्रयोग करुन त्याचा अनोखा समन्वय साधला! त्यामुळे शरीर शिक्षणाचे पण त्याचा आत्मा म्हणजे गोष्टी,गाणी,कविता,संगीत आणि गमती जमती!! ‘मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं,शरीराशी नाही’ ह्याची रवींद्रनाथांना जाणीव होती.

मुले गोष्टी वाचत, कविता-गाणी म्हणत,गमती जमती करत नकळत कधी शिकली हे त्या मुलांना कळतच नसे. (संदर्भ : सहज पाठ.)
रवींद्रनाथांनी वयाच्या एेंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या ‘सहज पाठ’ ह्या तीन पुस्तिका लिहिल्या, त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून!! ‘करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे’ असा रवींद्रनाथांचा दृष्टीकोन होता.

(आम्ही ह्या पासून काही धडा घेणार का?)

बालभारती मधले स्वाध्याय हा एक अजबच प्रकार आहे. मुख्य म्हणजे हे स्वाध्याय स्मरणशक्तीवर आधारित आहेत, आकलनशक्तीवर नाहीत! त्याचप्रमाणे हे स्वाध्याय हे निव्वळ पाठावर आधारित आहेत,पाठातील आाशयावर नाहीत! हे स्वाध्याय इतके पकाव असतात की मुले अक्षरश: पिसून निघतात. ‘सक्तमजूरी परवडली पण हे स्वाध्याय नको’ अशी त्यांची अवस्था होते.आणि त्यामुळेच पाठ्यपुस्तकातील धडे/कविता ह्याविषयी एक घृणा त्यांच्या मनात पैदा होते!

वानगी दाखल एक छोटेसे उदाहरण पाहू.

‘चामड्याची एक चौकोनी पिशवी घेऊन सुरेश ऑफिसला निघाला होता.’ ह्या वाक्यावरचा ‘बालभारतीय स्वाध्याय’ पुढीलप्रमाणे असू शकतो :

1. सुरेश कुठे निघाला होता?
2. चामड्याच्या पिशवीचा आकार कोणता असतो?
3. ऑफिसमधे कशाची पिशवी नेतात?
4. सुरेश किती पिशव्या घेऊन ऑफिसला जातो?

ह्या स्वाध्यायात नाही काही कल्पकता/रंजकता/उफम/प्रकल्प किंवा मुलांच्या सर्जनशीलतेला आवाहन व आव्हान! केवळ ‘घोकंबाज’ मुलेच ह्यातून तयार होतात. स्वाध्यायातील प्रश्न हे बहुआयामी असायला हवेत.त्या प्रश्नांना अनेक उत्तरे असायला हवीत.मुलांच्या विचाराला चालना मिळणे,त्याच्यातील सूप्त सर्जशीलता जागी होणे,विचार करण्याच्या विविध पध्दतींची त्यांना ओळख होणे आणि मी स्त:हून शिकू शकतो/नवीन शोधू शकतो हा विश्वास त्याच्या मनात निर्माण होणे हे स्वाध्यायाचे मुख्य उद्दीष्ट असले पाहिजे.

समजा, त्याच वाक्यातील आशयावर जर स्वाध्याय तयार करायचा असेल तर तो पुढील प्रमाणे असावा :

1. कुठल्या-कुठल्या गोष्टींपासून पिशव्या तयार होतात? उदा.नायलॉन,कापड इ.
2. ऑफिसला नेण्यासाठी,भाजी आणण्यासाठी,तेल आणण्यासाठी अशा आणखी कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या तुम्हाला माहित आहेत?
3. एकच पिशवी वेगवेगळ्या कामासाठी वापरता येऊ शकते का? कशाप्रकारे?
4. पिशव्यांचे किती वेगवेगळे आकार तुम्हाला माहित आहेत? तुम्हाला आवडणारा आकार तुमच्या वहीत काढा व रंगवा.
5. जुनी वर्तमानपत्रे घेऊन त्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या तयार करा.त्यावर नक्षी काढून त्या रंगवा. ह्यासाठी कुणाचिही मदत घ्या.तुम्ही तयार केलेल्या पिशव्यांचे वर्गातच प्रदर्शन भरवा.इ.

अध्यापन कौशल्य कार्यशाळांच्या यशस्वीतेनंतर मात्र ‘बहुआायामी स्वाध्याय निर्मिती’ कार्यशाळांचं आयोजन सुरू केलं. आणि शाळेतल्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुप बदलायला सुरुवात केली. मी लहानपणी शाळेत असताना कधीच प्रयोग केले नव्हते. आणि प्रयोग न करताच पुस्तकात पाहून प्रयोगाचे निष्कर्ष लिहिले होते. किमान माझ्या मुलांवर तरी अशी पाळी येऊ नये यासाठी प्राथमिक शाळांतून शून्य खर्चाच्या प्रयोग शाळा सुरू केल्या. दैनंदिन जीवन व विज्ञान याचा सहसंबंध मुलांना उलगडावा, त्यांना स्वत: प्रयोग करुन पाहाता यावा हा त्यामागचा हेतू होता. शून्य खर्चाचे किमान 49 प्रयोग तयार केले. मुले चुकतील पण त्यातूनच शिकतील अशी पॉलीसी ठेवली. पहिलीतली मुले सुध्दा प्रयोग करू लागली. त्यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि वेगवेगळ्या प्रयोगातून ती नवं काही शोधू लागली!!

वानगी दाखल एक छोटा प्रयोग सांगतो. (आणि मला खात्री आहे आत्तापर्यंत हा प्रयोग तुम्हीसुध्दा कधी केला नसेल.) इयत्ता तिसरीला विज्ञानाच्या पुस्तकात ज्ञानेंद्रियांची ओळख आहे व त्याखाली बालभारतीय स्वाध्याय आहेत. नाकाने वास समजतो व हाताला स्पर्श समजतो असे एक वाक्य आहे.

हे नेमकेपणानं उमजण्यासाठी व विज्ञान आणि माझे दैनंदिन जीवन यांच्यातील सहसंबंध उलगडण्यासाठी एका प्रयोगाचे आयोजन केलं. एक जुना सुती रुमाल आणला त्याचे तीन सारखे तुकडे केले. मग मेणबत्ती पेटवली.

एक तुकडा हातात घेऊन मुलांना विचारलं,हा तुकडा जळायला किती वेळ लागेल?

मुलांनी काहीही उत्तरे दिली. ‘एक तास,अर्धा तास, दहा मिनिटं वगैरे’. प्रत्येकाने आपापले अनुमान वहीत लिहून ठेवले. आत्तापर्यंत कापड जाळण्याची मुलांना मुभा नसल्याने कापड जळण्यासाठी किती वेळ लागेल हे मुलांन सांगणे अपेक्षितच नव्हते. तो तुकडा अकरा सेकंदात जळला. मग आम्ही सर्वांनी जळलेल्या कापडाचा वास घेतला. दुसरा तुकडा पाण्यात भिजवला व पिळला. आता हा तुकडा जळायला किती वेळ लागेल? या प्रश्नाला सगळ्या मुलांनी आता ‘सेकंदात’ उत्तरे दिली. हा तुकडा जळण्यासाठी वीस सेकंद लागले.

आम्ही सर्वांनी मिळून पाण्यात भिजून जळलेल्या कापडाचा वास घेतला. तो पहिल्यापेक्षा वेगळा होता.
तिसरा तुकडा तेलात भिजवून मग मेणबत्तीवर धरला.
हा तुकडा जळायला बत्तीस सेकंद लागली. कारण तेल आधी जळले मग कापड. हा वास ही वेगळाच होता.
मग मुलांनी अशा पदार्थांची यादी केली जे सुके,ओले व तेलात भिजून जळले असता वेगवेगळा वास येतो.

त्यानंतर अशा पदार्थांची यादी केली की, पदार्थ एकच पण वेगवेगळ्या स्टेजेसवर त्याचे वेगवेगळे वास येतात. उदा. ऊतू जाणारं दूध, लागलेलं दूध, आटणारं दूध इ.

त्याचप्रमाणे डोळे बंद करुन ओळखता येणारे वास. मुलांनी सुमारे 82 वासांची यादी तयार केली.

नाकाने आपल्याला फक्त वास समजत नाही तर त्या वासामुळे आपल्याला खूप माहिती समजू शकते, आणि तीच खरी महत्वपूर्ण असते. अशी विविध प्रकारची माहिती मिळविण्यासाठी वास हे केवळ एक माध्यम आहे आणि त्यासाठी नाक हे एक साधन आहे. पण त्या वासामागे दडलेली माहिती शोधणं हे आपलं खरं साध्य आहे. आपण मुलांवर विश्वास ठेवायला घाबरतो, त्यांना कमी लेखतो म्हणून मुले शिकत नाहीत असंच मला वाटतं.

पण हे सारं काही इतक्या सहजतेने घडलेलं नाही. पैसे खर्च करुन तर नाहीच नाही! वर्ग खोल्या बांधून, शैक्षणिक साधनांचा पुरवठा करुन किंवा दुपारी जेवायला देऊन प्रश्न सुटत नाही तर तो क्षणिक सुटल्यासारखा वाटतो. खरा प्रश्न हा मानसिकता आणि दृष्टीकोन याच्याशी निगडित आहे! शिक्षकांची मानसिकता बदलवणं,त्यांना शाळा, शिक्षण आणि शिकणं याबाबत नवा दृष्टीकोन देणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि बदललेल्या दृष्टीकोनानुसार त्याचे उपयोजन करण्यासाठी त्यांना सक्षम करणं म्हणजे मूल शिकण्याच्या प्रक्रियेला गती देणं. (यासाठी आम्ही व्हिजनिंग कार्यशाळा व अध्यापन कौशल्य कार्यशाळा यांचं एकत्रिकरण करुन तीन दिवसांच्या ‘कार्यवेध कार्यशाळा’ सुरू केल्या.) त्यासाठी तुम्हाला दोन किस्से सांगणं आवश्यक आहे.
एक…. सर्व शाळांतून मुलींसाठी लंगडीच्या व रांगोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. याचे कारण काय असं विचारल्यावर शिक्षक म्हणाले,’शासनाचे पत्रकच आहे की मुलींच्या लंगडीच्या स्पर्धा घ्या.

‘पण त्या पत्रकाखाली असं तर लिहिलेलं नाही ना, जर का शिक्षकांनी मुलांच्या पण लंगडीच्या स्पर्धा घेतल्या तर त्याला निलंबित करण्यात येईल?’ मी विचारलं.

त्यावर शिक्षक म्हणाले :

‘पण पत्रकाप्रमाणे वागलं तर काय झालं?’
‘पण आमच्या इथे तर अशीच पध्दत आहे!’
‘मुलं कशापायी लंगडी घालणार’
‘मुलांनी रांगोळ्या काढल्या तर सारा गाव त्यांना हसेल ते?’
‘ग्रामीण भागात मुलीच लंगडी घालतात. रांगोळी काढतात.’
‘तुम्हा शहरी लोकांना काय कळणार? इकडे असं चालत नाय!’

आता मी बोलायला सुरुवात केली,’तुमचं मत आणि तुमचा विश्वास हे वास्तव बदलू शकतात! महात्मा फुलेंच्या वेळी बायका शिकत नव्हत्या हे वास्तव होतं. पण फुलेंचं मत होतं की बायकांनी शिकलं पाहिजे आणि त्यांचा विश्वास होता की त्या शिकू शकतील. आणि त्यांनी वास्तव बदललं! मुले पण लंगडी घालू शकतात आणि सुंदर रांगोळी पण काढू शकतात.याबाबत तुमचं मत काय? आणि तुमचा विश्वास काय? हे आधी ठरवा. मला खात्री आहे आजपासून आपण बदलू शकतो. सर्व खेळ आणि सर्व स्पर्धा सर्वांसाठी ठेवू शकतो.ठ असं सांगितल्यावर किमान 15 टक्के शाळांतून काही वेगळं करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

दोन….. एका प्रशिक्षण कार्यक्रमात मी पिशवीतून पत्यांचा जोड बाहेर काढला आणि शिक्षकांना विचारलं,

‘हे शैक्षणिक साधन तुम्ही वर्गात वापरता का?’

जीवंत भूत पाहिल्याप्रमाणे शिक्षक माझ्याकडे पाहू लागले. काही शिक्षिकांचा चेहरा तर लकवा भरल्याप्रमाणे वेडावाकडा झाला. एका शिक्षिकेच्या हातात मी पत्ते देऊ लागलो तेव्हा दोन पावलं मागे सरत ती म्हणाली,’म..माफ करा! मी पत्यांना हात लावत नाही. माझ्यावर लहानपणीच चांगले संस्कार झाले आहेत!’ शिक्षक वर्गात पत्ते वापरत नाहीत कारण ‘पत्ते म्हणजे जुगार’ याविषयी सर्व शिक्षकांचं एकमत होतं.

जुगार ही वृत्ती आहे किंवा जुगार हा डोक्यात असतो आणि तो पत्ते नसताना ही खेळता येतो. आपण पत्यांचा वापर कसा करतो यावर सारे अवलंबून असते. ही वरवर साधी वाटणारी गोष्ट कुणालाच माहित नव्हती.

बदाम म्हणजे एकक,किलवर म्हणजे दशक व चौकट म्हणजे शतक असं जर आपण गृहित धरलं तर..815 ही संख्या कशी सांगता येईल? सोपं आहे,चौकट अठ्ठी,किलवर एक्का व बदाम पंजी ज्यांच्याकडे आहे ती मुले उभी राहतील. पत्ते हे अंकपत्ते आहेत असं समजलं तर त्यातून शिकवणं सोपं होईल.

प्रत्येक गोष्ट हेच शैक्षणिक साधन आहे. त्यामुळे पैसे खर्च करून नवीन काही करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. आजूबाजूला जे काही उपलब्ध आहे त्याचा कल्पकपणे वापर करणं आणि त्याचा वापर करुन मुलांना शिकवणं नाही तर ते स्वत:हून शिकू शकतील यासाठी प्रोग्रॅम तयार करणं हे शिक्षक म्हणून आपलं काम आहे! विश्वास ठेवा, त्या प्रशिक्षणात आम्ही सर्वांनी मिळून गणिताचे नवीन 19 खेळ तयार केले. हे खेळ सर्वजण मिळून आणि पत्ते वापरून खेळलो. त्यावेळी आमच्या बरोबर त्या ‘सुसंस्कारी शिक्षिका’ पण सहभागी झाल्या होत्या.

‘शिक्षण-विचार’ या विनोबांच्या पुस्तकात ‘गुरुचा अधिकार : मार्गदर्शन’ असा एक परिच्छेद आहे. तोच इथे मांडतो. ‘एका प्राचीन वचनात असे सांगितले आहे की, प्रसंगी ज्याचा सल्ला आपण घेऊ असा सर्वात जवळचा माणूस म्हणजे गुरू. जीवनात कधी एखादी समस्या उद्भवली, कठीण प्रश्न समोर उभा राहिला, तर सल्ला कोणाचा घ्यावा? शास्त्रकारांनी सांगितले आहे की तटस्थ गुरुजनांचा घ्या. आज आपली स्थिती काय आहे? संपूर्ण नोकरीच्या काळात हजारो विद्यार्थी आपल्या हातातून पार होतात.आपण त्यांना शिक्षण दिले,संस्कार दिले यात शंका नाही. परंतु त्यातले किती विद्यार्थी त्यांच्या जीवनातील समस्या घेऊन तुमचा सल्ला मागण्यासाठी आले? ते आईचा सल्ला घेतात, वडिलांचा घेतात, पत्नीचा किंवा पतीचा घेतात. भावाचा किंवा मित्राचा सल्ला घेतात; परंतु शिक्षकाला मात्र दूर ठेवतात. हा, शिक्षक म्हणून आपला केव्हढा मोठा पराभव आहे! वास्तविक शिक्षकाचा सल्ला हा सर्वात श्रेष्ट मानला गेला पाहिजे. परंतु आज ही स्थिती नाही. याचे कारण एकच आणि ते म्हणजे शिक्षकाला सामान्य नोकरापेक्षा आज वेगळे स्थान नाही.’

काही प्रमाणात हे आजचे वास्तव आहे हे नाकारता येत नाही. पण शिक्षकांचे म्हणजेच पर्यायाने समाजाचे मत आणि त्यांचा विश्वास हे वास्तव बदलू शकतात! आपण आपल्यापासून सुरुवात करू. शिक्षकांसोबत मुलांच्या शिकण्याचा ध्यास घेऊ. मग काहीच अशक्य नाही! तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि तुमचा विश्वास जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.

मी तुमच्या ध्यास पत्रांची वाट पाहतोय.

– राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..