सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला – ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’
खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.
अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे – हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.
मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी *रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्या जाणार्या श्वासाला डोळे मिटून जाणत रहा*. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल.
शेवटी म्हणतात ना, ‘‘मन करा रे प्रसन्न – सर्व सिध्दीचे कारण.’’
Forwarded Post
Leave a Reply