‘मन चंगा तो बगल मे गंगा’ असे म्हणतात. तुमचे मन जर शुद्ध, पवित्र असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टी शुद्ध व चांगल्याच वाटतील. एखादा चांगला पदार्थ जर स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या भांड्यात ठेवला तर कोणाला देताना निश्चितच आनंद होईल.
एका मनुष्याने सत्संगतीसाठी एक चांगले गुरू केले होते. दररोज तो त्यांच्याकडे जायचा व म्हणायचा, मला चांगला उपदेश करा. परंतु त्याचे मन विकारी होते हे त्या गुरूला चांगले माहीत होते म्हणून ते रोज काही ना काही कारण सांगून त्याला टाळत असत.
एके दिवशी मात्र त्या मनुष्याने गुरूला फारच आग्रह केला. त्यामुळे गुरू म्हणाले, ठीक आहे. उद्याचा दिवस चांगला आहे. मी उद्या चांगला उपदेश करीन, मात्र येताना तू माझ्यासाठी घरून चांगली खीर करून घेऊन ये.
प्रत्यक्ष गुरूंनी सांगितल्यामुळे त्या माणसाने चांगल्या घट्ट दुधाची, काजू-किसमिस घातलेली खीर तयार केली व तो दुसऱ्या दिवशी गुरूंकडे गेला.
गुरूंनी त्याच्यापुढे एक भांडे धरले व ते म्हणाले, ती खीर यामध्ये टाक.
त्या माणसाने ते भांडे पाहताच त्याला शिसारी आली. तो गुरूंना म्हणाला, अहो, हे भांडे फारच अस्वच्छ आहे. त्यामध्ये शेण आणि माती दिसते. ही खीर त्यामध्ये टाकली तर ती खराब होईल व तुम्हाला खाता येणार नाही.
त्यावर गुरू त्याला म्हणाले, तू म्हणतोस ते बरोबर आहे. चांगली खीर ठेवायला भांडेही चांगले स्वच्छ हवे, त्याचप्रमाणे चांगला उपदेश ऐकायला मनही तेवढेच स्वच्छ व शुद्ध हवे.
तो माणूस गुरूला काय म्हणायचे आहे ते समजून चुकला व त्याने आपल्या मनातील विकारीपणा घालविण्याचा निर्धार केला.
Leave a Reply