नवीन लेखन...

मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर

विश्राम बेडेकर आज मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांची पुण्यतिथी

विश्राम बेडेकर यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला.

नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते, त्या विश्राम बेडेकरांचे हे वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु करताना देखील अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट यशस्वी झाले आहेत. चित्रपट तंत्राच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि आल्याआल्याच त्यांच्या हातून ‘रणांगण’ सारख्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती झाली. रणांगण नंतर त्यांनी केलेली अनेक नाटय रुपांतरे रंगभूमीवर आली. मात्र ‘वाजे पाऊल आपुले’ आणि ‘टिळक आणि आगरकर’ या रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या अजोड कलाकृती. चरितार्थासाठी नाटक आणि चित्रपट हे क्षेत्र निवडले अणि तेथेही ते पटकथा लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरले. माझं बाळ, वासुदेव बळवंत, चूल आणि मूल या श्रेष्ठ पटकथा त्यांनी दिल्या. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ही त्यांची एक सर्वोत्तम कथा.

अर्थगर्भ आणि अजोड कलाकृती देऊन विश्राम बेडेकरांनी एक आदर्श उभा केला आहे. मराठी रंगभूमीवरील विख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर व श्रेष्ठ गायक नट मास्टर दीनानाथ हयांनी सुरू केलेल्या ‘बलवंत पिक्चर्स’ ह्या संस्थेच्या कृष्णार्जुन युद्ध ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपटव्यवसायात आले. तत्पूर्वी मास्टर दीनानाथांच्या ‘बलवत संगीत नाटक मंडळी’साठी ब्रह्मकुमारी हे नाटक त्यांनी लिहिले होते. ह्या नाटकातील ‘मी लोपले मधुमीलनात या’ हे पद अत्यंत लोकप्रिय ठरले. बलवंत पिक्चर्स ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी कृष्णार्जुन युध्दाचे आणखी एक सहदिग्दर्शक वा. ना. भट ह्यांच्या सहकार्याने ‘भट-बेडेकर प्रॉडक्शन्स’ ही चित्रसंस्था स्थापन केली. राम गणेश गडकरी आणि चि.वि. जोशी ह्यांच्या अनुक्रमे ‘ठकीचे लग्न ‘आणि ‘ सत्याचे प्रयोग’ ह्या विनोदी कथांवर त्यांनी बोलपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी बोलपट होत. त्यानंतर लक्ष्मीचे खेळ हा आणखी एक विनोदी बोलपट त्यांनी निर्माण केला. प्रभातच्या शेजारी ह्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा व संवादत्यांनीच लिहिले होते. तसेच रामशास्त्री बोलपटाचे निम्म्यापेक्षा अधिक भागाचे दिग्दर्शन व लेखनही त्यांनी केले. १९४२ साली ‘न्यू हसं पिक्चर्स’ चा पहिला पाळणा हा तुफान विनोदी बोलपट त्यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाच्या कथा संवादांचेही लेखन केले. राजकमलच्या अमर भूपाळीची (१९५१) कथाही त्यांचीच. फिल्म डिव्हिजनसाठी लोकमान्य टिळक व विनोबा भावे ह्यांच्यावरील अनुबोधपटही त्यांनी तयार केले. चित्रपटमाध्यमाची अत्यंत मार्मिक जाण त्यांनी लिहिलेल्या नेमक्या, नीटस संवादातून जाणवते. १९५१ नंतर बेडेकर चित्रपटव्यवसायात फारसे वावरले नाहीत. १९५१ ते १९८१ह्या तीन दशकांत त्यांनी फक्त दिग्दर्शन केले आणि तेही अवघ्या सहा चित्रपटांचे. त्यात वासुदेव बळवंत आणि रुस्तुम सोहराब यांचा समावेश होतो. याच काळात त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपटाचे व ‘प्रभात’ साठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चित्रपटाचे बरेचसे काम केले पण ते प्रयत्न अपूर्ण राहिले. ह्या काळात ते पुन्हा नाट्यलेखनाकडे वळले. त्यांनी नरो वा कुंजरो वा (१९६१),वाजे पाऊले आपुले (१९६७) टिळक आणि आगरकर(१९८०) ही नाटके लिहिली. तथापि रणांगण (१९३९) ह्या कांदबरीमुळे बेडेकरांची वाङ्मयीन कीर्ती अनेक अर्थानी मराठीत अपूर्व ठरली. १९३८ साली बेडेकरांना सिनेमॅटोग्राफीच्या अभ्यासार्थ इंग्लंडला जाण्यासाठी एक निमसरकारी शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी फावल्या वेळात हस्ताक्षरतज्ञ म्हणून डिप्लोमा मिळवला. भारतात परत येताना बोटीवर काही निर्वासित जर्मन-ज्यू मंडळींचे जीवन त्यांना फार जवळून बघायला मिळाले. त्या अनुभवातून रणांगण या कादंबरीचा जन्म झाला. चक्रधर नावाचा एक मराठी तरुण आणि ज्यूद्वेष्ट्या नाझी हुकुमशाहीखाली जिचे जीवन अंतर्बाह्य उद्ध्वस्त झाले अशी एक जर्मन ज्यू तरुणी हॅर्टा ह्यांच्या असफल प्रेमाची ही कहाणी आहे. जेनोआहून निघालेल्या एका इटालियन बोटीवर त्या दोघांची भेट होते आणि दहा दिवसांच्या सागरी प्रवासात ती दोघे उत्कटपणे परस्परंच्या जवळ येतात. चक्रधर आधी एका प्रेमप्रकरणात फसलेला असतो, तर हॅर्टा आपला पराक्रम सोडून परागंदा होण्यापूर्वीच आपल्या जर्मन ख्रिश्चन प्रियकराला मुकलेली असते. चक्रधराला पाहून तिला अपल्या प्रियकराची आठवण येते आणि चक्रधरही तिच्या प्रेमाने भारावून जाऊन तिच्याशी विवाह करावयास तयार होतो. तथापि हॅर्टापाशी जर्मन पासपोर्ट असल्यामुळे तिला चक्रधराबरोबर मुंबईस उतरता येत नाही. बोट चक्रधराला सोडून निघून जाते आणि विफल प्रेमाचा दुसरा आघात असह्य झालेली हॅर्टा हाँगकाँगपर्यंत गेल्यावर समुद्रात उडी मारून आत्महत्या करते. ह्या कांदबरीचा विषय, तीत असलेली विरोधवादाची पार्श्वभूमी, तिच्यातील सूक्ष्म, अभिजात कलात्मकता, तीतून व्यक्त झालेला संवेदनस्वभाव, तिची अनेकसंदर्भसूचकता हे सारेच मराठी कांदबरीत अपूर्व होते. मराठीतील मोजक्या, उत्कृष्ट कादंबऱ्यात बेडेकरांच्या रणांगणाची गणना केली जाते. १९८६ साली विश्राम बेडेकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते. मराठी लेखिका मालती बेडेकर (माहेरच्या बाळूताई खरे) या त्यांच्या पत्नी होत. विश्राम बेडेकर यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९८ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..