नवीन लेखन...

मला भाराऊन टाकल याने

बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा. हे सारे मी संग्रहीत केलेल आहे.

स्टीव जॉब्स ” मी तुम्हाला आज तीन गोष्टी सांगणार आहे. मोठं …भाषणबिषण देणार नाहीये. पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याची. मी सहा महिन्यांतच कॉलेज सोडलं. माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या आईचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिने मला दत्तक द्यायचं ठरवलं होतं, जन्माच्या आधीच. तिची एकच अट होती, माझे दत्तक पालक कॉलेज ग्रॅज्युएट असले पाहिजेत. काही घोटाळ्यामुळे ज्यांनी अखेर मला दत्तक घेतले ते ग्रॅज्युएट नव्हते; पण त्यांनी वेळ येताच मला कॉलेजात प्रवेश घेऊन दिला खरा. पण सहा महिन्यांतच माझ्या लक्षात आलं की माझ्या पालकांचा कष्टाचा पैसा वाया जातोय. मी कॉलेज सोडलं. नंतरचं दीड वर्ष मी कॉलेजमध्येच ड्रॉपआउट म्हणून राहिलो. या दीड वर्षातच मी खूप काही शिकलो. मला खोली नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपायचो. दर रविवारी सात मैल चालत जाऊन हरे राम हरे कृष्ण मंदिरात फुकट जेवायचो. काही सेंट्ससाठी कोकच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा विकायचो.

त्या वेळेस माझ्या कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचे सर्वोत्तम शिक्षक होते. मी त्या वर्गात जाऊन बसायला लागलो. तिथे मी वेगवेगळे टाइपफेस आणि छपाईविषयी शिकलो. खरं तर त्या शिक्षणाचा मला प्रत्यक्ष उपयोग काहीच नव्हता; पण मी निव्वळ आनंदासाठी, मला आवडतं म्हणून ते शिकत गेलो. दहा वर्षांनंतर आम्ही जेव्हा पहिला मॅकिन्टॉश संगणक डिझाइन तयार करत होतो, तेव्हा ते सगळे मला आठवत गेले. आम्ही मॅकमध्ये ते वापरले. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. मी कॅलिग्राफी शिकत असताना हे मला माहीत नव्हते की, याचा मला उपयोग होणार आहे. ठिपके पुढचं पाहून जुळवता येत नाहीत, ते मागे वळूनपाहूनच जुळवावे लागतात. त्यामुळे ते कधी तरी जुळतील असा विश्वास ठेवूनच जगावं. मग तुम्ही त्याला काहीही म्हणा- कर्म, आयुष्य, नशीब, गट फीलिंग, काहीही. मला या भूमिकेमुळे कधीच तोटा झालेला नाही, तर माझं आयुष्यच बदलून गेलंय.

दुसरी गोष्ट आहे प्रेम किंवा आवडीबद्दलची.

मी नशीबवान आहे, मला काय आवडतं, हे मला आयुष्यात खूप लवकर उमगलं. मी आणि वॉझने माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून ‘अ‍ॅपल’ सुरू केली तेव्हा मी २० वर्षांचा होतो. दहा वर्षांनी ‘अ‍ॅपल’ दोन अब्ज डॉलरची कंपनी झाली तेव्हा मी तिशीत होतो; पण मला ‘अ‍ॅपल’ने हाकलून दिलं. आमच्या संचालक मंडळाचे आणि माझे मतभेद झाले.

२माझ्या जाणत्या वयाचा मोठा भाग ज्याने व्यापला होता, तोच गेला होता. मी उद्ध्वस्त झालो. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही; पण माझी ‘अ‍ॅपल’मधून झालेली हकालपट्टी ही माझ्याबाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती. यशामुळे जड झालेलं डोकं नवेपणाच्या आनंदाने हलकं झालं आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनशील कालखंडाला सुरुवात झाली.

पुढच्या पाच वर्षांत मी दोन कंपन्या सुरू केल्या. मुलीच्या प्रेमात पडलो. त्यातली एक कंपनी ‘अ‍ॅपल’नेच विकत घेतली आणि मी ‘अ‍ॅपल’ कुटुंबात परत आलो. मला या काळात एवढंच लक्षात आलं की, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही शोधलंच पाहिजे. आवडतं ते काम आणि आवडतात ती माणसं, दोन्हीला हे लागू होतं.

चांगलं काम करायचं असेल तर ते तुमचं आवडतं काम असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी तडजोड करू नका, शोधत राहा. प्रेमात पडल्यावर कसं लगेच कळतं, तसं हेही तुमच्या लक्षात येईल. एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे तुमचं कामही उत्तरोत्तर चांगलंच होत जाईल.

माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यूबद्दलची. – मी सतरा वर्षांचा असताना एक वाक्य वाचलं होतं, प्रत्येक दिवस तुम्ही तुमचा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे जगा… त्यानंतरचं माझं संपूर्ण आयुष्य मी या तत्त्वानुसार जगायचा प्रयत्न करतोय. रोज सकाळी मी आरशात पाहून मलाच विचारतो, आजचा दिवस तुझा अखेरचा असेल तर जे तू करणार आहेस, तेच तुला करावेसे वाटेल? जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सलग काही दिवस नाही येते, तेव्हा माझ्या लक्षात येते की मला बदलण्याची गरज आहे.

वर्षभरापूर्वी मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. मला डॉक्टरांनी केवळ तीन ते सहा महिने दिले. त्यांनी मला घरी जायला सांगितलं. म्हणाले, आवराआवर करायला लागा. म्हणजेच निरोप घ्यायला लागा, कुटुंबाला पुढे त्रास होणार नाही अशी व्यवस्था करा.

नंतर असं निदान करण्यात आलं की, शस्त्रक्रिया करून मी बरा होईन आणि माझा कर्करोग कायमचा जाईल. या अनुभवातून गेल्यानंतर मी अधिकाराने म्हणू शकतो की कोणालाच मरायचं नसतं, अगदी ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनाही त्यासाठी मरायचं नसतं; पण तरीही ते कुणालाही चुकलेलं नाही. ते तसंच असलं पाहिजे कारण मृत्यू हा जीवनातील सर्वोत्तम शोध आहे. जुने मागे टाकून तोच नव्यासाठी जागा करतो. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगून तो वाया घालवू नका. इतरांची मतं आपलीशी करू नका. तुमचं हृदय आणि मन काय सांगतायत तेच ऐकायचं धैर्य दाखवा. त्यांनाच माहीत असतं तुम्हाला खरं काय व्हायचंय. मी लहान असताना ‘दि होल अर्थ कॅटलॉग’ नावाचं मासिक निघायचं. कालांतराने ते बंद झालं. त्याच्या शेवटच्या अंकावर एका दूरवर जाणा-या रस्त्याचं छायाचित्र होतं आणि शब्द होते, ‘बी हंग्री, बी फूलिश…’ मी माझ्यासाठी कायम हाच विचार करत आलोय आणि तुम्हालाही त्याच शुभेच्छा देतो ”

संग्राहक
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..