नवीन लेखन...

मस्तीखोर फुगे

आज वर्गात गेलो तर वर्ग एकदम शांत. माझ्यासाठी हे दृश्य नवीनच होतं. इतक्यात मिहिरने गाल फुगवून रोहनकडे बोट दाखवलं. सिमरनने पण तसंच केलं. तर शिल्पाने तोंड फुगवून प्रियाकडे बोट केलं. मला समजेना हा काय प्रकार आहे? प्रिया आणि रोहनला जवळ बोलावलं. तोंड फुगवून, हाताने खुण करुन विचारलं म्हणजे काय? प्रिया व रोहनने चुपचाप खिशातून फुगे काढून टेबलावर ठेवले…. आणि सगळा वर्ग फुगा फुटल्यासारखा ठॉपकन हसला.
टेबलावर आता वेगवेगळ्या रंगाचे पाच फुगे होते. “काय करायचं या फुग्यांचं?” असं म्हणताच मुले एकदम उसळत म्हणाली,“फुगवूया… फोडूया…. उडवूया… त्यात पाणी भरुया… जादू करुया… काहीतरी धमाल प्रयोग करुया.” एकदम सही. आज आपण फुग्यांना मस्ती करायला लावूया… ढकलाढकली करायला लावूया…. नाचवूया… डोलवूया… एका जागेवर बसवूया…काय… चालेल? मुले ओरडली, चालेल काय म्हणता? हे तर मस्त धावेल. पण हे करायचं कसं?

आम्ही फटाफट फुगे फुगवले. त्यातल्या दोन फुग्यांना दोरे बांधले आणि ते फळ्यावर अडकविले. हं चला, आता करु दे त्यांना मस्ती. “पण कशी ?” अस मिहिरने विचारताच त्याला जवळ बोलावलं. ते टांगलेले फुगे त्याच्या डोक्यावर खसाखसा घासले. आणि मग त्या दोन टांगलेल्या फुग्यांची आपापसात भांडणं सुरू झाली. त्यांची आपापसात ढकलाढकली सुरू झाली. त्यातला एक फुगा दुसऱ्याजवळ नेला की तो लांब पळायचा. सगळा वर्ग श्वस रोखून आणि डोळे मोठे करुन ही गंमत पाहात होता.

आता आणखी एक गंमत पाहू. या भांडणाऱ्या फुग्यांमधे एक फुगवलेला साधा फुगा ठेवला. आणि काय मजा… त्या दोन भांडखोर फुग्यांनी या फुग्याला जाम धरुन ठेवलं. हे पाहून मुलांनी इतक्या जोर-जोरात आरडाओरडा केला की ते टांगलेले फुगे पण दचकले! व तो मधला फुगा घसरला. मग हा घसरलेला फुगा फळ्यावरच्या दुसऱ्या कोपऱ्यात बांधून ठेवला.
मिहिरच्या डोक्यात मस्ती आहे म्हणून बहुधा या फुग्यांना मस्ती सुचली असावी. असं म्हणताच प्रिया म्हणाली, मग आता माझ्या डोक्यावर घासा पाहू हा दुसरा फुगा. पाहुया काय होतं? एक नवीनच फुगा प्रियाच्या डोक्यावर घासला. तो दुसऱ्या कोपऱ्यातल्या टांगलेल्या फुग्याजवळ नेला….. पण काहीही झाले नाही! मुले विचारात पडली. हे असं का झालं? हातात फुगा घेऊन प्रिया निरीक्षण करू लागली.

मुलांना क्लू देण्यासाठी विचारलं, दोघांच्याही डोक्यावर ज्या ठिकाणी फुगा घासला त्या ठिकाणी तुम्हाला काय फरक दिसतोय पाहा बरं. “मिहिरपेक्षा प्रियाचे केस चकचकीत आहेत.” असं मुलांनी म्हणताच प्रिया म्हणाली, मी तेल लावलंय तेल!” “हां…! तेल लावल्याने जादू झाली नाही!!” असं मुले ओरडली त्याचवेळी सिमरन धावतच फळ्याजवळ आली.

तिने प्रियाच्या हातातला फुगा हिसकावून घेतला. स्वत:च्या स्वेटरवर खसाखसा घासला. आता ती तो फुगा दुसऱ्या फुग्याजवळ नेणार इतक्यात प्रियाने तिला मागे खेचलं. सिमरनने आधारासाठी भिंत पकडण्याचा प्रयत्न केला,त्यावेळी तिच्या हातातला फुगा सुटला…. आणि काय हो चमत्कार… फुगा भिंतीला चिकटूनच बसला.
वर्गातल्या सर्व शास्त्रज्ञांनी आनंदाने आरडाओरड करत टाळ्या वाजवल्या, कारण त्यांना हा एक नवीनच शोध लागला होता. मुले म्हणाली,“आता आम्ही सुध्दा घासाघिस करुन घरातल्या भिंतींवर चिकटवू की असे फुगे.”

इतका वेळ रोहन अस्वस्थ होऊन पाहात होता. तो चटकन उठला आणि त्याने टेबलावरचा पाचवा फुगा उचलला. स्वत:च्या डोक्यावर घासला. फळ्यावरच्या दुसऱ्या कोपऱ्यात टांगलेल्या फुग्याकडे तो निघाला. फळ्याजवळ पोहोचला. आता रोहन आपल्या हातातला फुगा त्या टांगलेल्या फुग्याकडे नेणार इतक्यात सिमरन आणि प्रिया रोहनच्या दिशेने धावल्या. रोहनने टांगलेल्या फुग्याच्या दिशेने हात सरळ केला. त्याचवेळी प्रिया व सिमरनने त्याला मागे खेचलं आणि…. आणखी एक चमत्कार झाला! “इतकावेळ फळ्यावर लोळणारा फुगा एकदम हडबडून खडबडून जागा झाला. त्या फुग्याने रोहनच्या हातातल्या फुग्याकडे झेप मारली. रोहनच्या हातातला फुगा आणि हा फुगा यातले अंतर सुमारे दोन सेंटिमीटर होते.
या अचानक झालेल्या हल्ल्याने रोहन दचकला व त्याने हात वर केला, इकडे तिकडे हलवला… आणि… तो टांगलेला दोरा अचानक ताठ झाला! रोहनच्या हातातल्या फुग्या समोर तो टांगू फुगा “ताठ दोऱ्याने व नाक वर करुन” नाचू लागला. हे दृश्य पाहून मुले टाळ्या वाजवायची पण विसरली.

आता या मागचं रहस्य मुलांना सांगायचं ठरवलं.
जेव्हा रबरी फुगा रेशमी, नायला दोन किंवा लोकरीच्या कपड्यावर घासला जातो तेव्हा कपड्यातील इलेक्ट्राॅन्स फुग्याच्या पृष्ठभागावर येतात आणि फुगा ऋणभारित होतो. असे दोन ऋणभारित फुगे जेव्हा एकमेकाजवळ आणले जातात तेव्हा ते एकमेकांना दूर ढकलतात. याला “अपसरण” म्हणतात. विद्युतभारित फुग्याजवळ जर साधा फुगा आणला तर तो मात्र आकर्षिला जातो. कारण दोन असमान विद्युतभार एकमेकांना आकर्षित करतात त्याला “आकर्षण” म्हणतात. भिंतीवर विद्युतभारित फुगा चिकटविला तर ‘विषमभार आकर्षण’ या तत्वामुळे फुगा भिंतीला चिकटतो. थोड्यावेळाने इलेक्ट्राॅन्स हवेत विरतात आणि भिंतीवरचा फुगा खाली पडतो.|

आता आमच्या शालेतल्या मुलांनी नाच केला असेल की फुग्यांनी? आणि तुमच्या घरात फक्त तुम्हीच नाचता की टांगलेले फुगे? मला कळवाल?
मी तुमच्या “मस्तीखोर पत्रांची” वाट पाहतोय.

– राजीव तांबे.

Avatar
About राजीव तांबे 45 Articles
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..