नवीन लेखन...

महर्षी भृगू

मानवी प्रतिभेचे उत्तुंग शिखर असणारे महर्षी भृगू यांनी जीवनाच्या आणि ज्ञानाच्या नानाविध शाखांमध्ये आश्चर्यकारक, अतुलनीय व मूलभूत काम केले आहे. अनेक ज्ञाती समाजाचे ते मूळ पुरूष आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि जीवनाचा परिचय प्रथमच मराठीत एकत्रितपणे करून दिला आहे. प्रा. विजय यंगलवार यांनी.

कर्नाटक आणि आंध्रप्रदेशाला लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रात बहुसंख्येने वसलेल्या व प्रामुख्याने विणकर व्यवसायात असलेल्या पद्मशाली समाजाचे आराध्य असलेले महर्षी भृगु आणि त्याच कुलपरंपरेतील मार्कंडेय ऋषी आणि भावना ऋषी यांच्यावर प्रा. विजय गोविंदराव यंगलवार यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेल्या तीन नव्या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच नागपूरच्या नचिकेत प्रकाशनने केले आहे. महर्षी भृगु, मृंत्युजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी नावाची ही तीन पुस्तके केवळ पद्मशाली समाजच नव्हे तर अन्यही समाजातील वाचकांच्या पौराणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक माहितीत भर घालणारी आहेत.आपल्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाणीव खरे तर प्रत्येक माणसात आणि विशेषत: प्रत्येक शिक्षित माणसात असावयास हवी, पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे विविध रंगी, विविध ढंगी भारतीय समाजजीवनातील अनेक शाखांचा इतिहास, कर्तृत्व, परंपरा यांची माहितीच काय, अस्तित्व देखील नामशेष झालेले आहे. पण प्रा. यंगलवार यांनी प्रकर्षाने ही जाणीव ठेवून पद्मशाली समाजाचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. पद्मशाली यशोगाथा या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने पद्मशाली समाजाच्या सखोल अभ्यासाचा वसा घेतलेल्या प्रा. यंगलवार यांनी, त्या दिशेत पुढचे पाऊल टाकताना महर्षी भृगु मृत्युंजय मार्कंडेय ऋषी आणि वस्त्रोद्योगाचे प्रणेते भावना ऋषी या तीन पुस्तकांची एक मालाच जणु समाजपुरुषाच्या गळ्यात टाकली आहे. अशा विषयांवर मान्यवर विद्वान लेखकांकडून मुद्दाम लिहून घेऊन ती पुस्तके प्रकाशित करून ही माहिती हे ज्ञान संपूर्ण समाजापर्यंत नेण्याचे जे धोरण नचिकेत प्रकाशन राबवित आहे त्यासाठी त्यांंचे अभिनंदन केले पाहिजे आणि अन्य समाज पुरुंषावरही त्यांच्याकडून अशीच पुस्तके प्रकाशित होतील. अशी अपेक्षा करू. या ही तीनही पुस्तके अतिशय उत्तम, दर्जेदार व देखणी झाली आहेत. सर्वच मुखपृष्ठ आकर्षक आहेत. दर्जेदार पुस्तकाची परंपरा नचिकेत ने कायम राखली आहे.

सृष्टीकर्ता भगवान ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांमध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ असलेल्या भृगु ऋषींची केवळ पौराणिकच नव्हे तर, आज जगात इतस्तत: विखुरलेल्या भृगुकुलोत्पन्नांची साधार व अभ्यासपूर्ण माहिती प्रा. यंगलवार यांनी या पुस्तकात दिली आहे. महर्षी भृगुंच्या जन्माच्या विविध कथा, त्यांचे पौराणिक दाखले, त्यांचा कुलविस्तार, त्यांचे कार्य, त्याचे आध्यात्मिक, सामाजिक महत्व अशी चौफेर माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. सामान्यत: वाचकांना महर्षी भृगुंच्या भृगुसंहिता या ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथाचीच माहिती असलेली आढळते. मात्र महर्षी भृगु यांनी ऋग्वेद, अथर्ववेद यांच्यावर केलेले विपुल लेखन, वास्तुशास्त्र, आयुर्वेदसंहिता, भृगुस्मृती, वेदान्तावरील भृगु-गीता आदींचाही परिचय या पुस्तकात लेखक प्रा. यंगलवार यांनी करून दिला आहे.

महर्षी भृगु यांच्याशी संबंधित भारतातील प्रमुख स्थाने आणि तेथे होणार्‍या कार्यक्रमांची माहितीही लेखकाने रोचकपणे दिली आहे. अवघ्या साठ पानांचे आणि नाममात्र 60 रुपये किंमतीचे हे पुस्तक पद्मशाली समाजासाठी जणु भृगु-पुराणच ठरावे.

महर्षी भृगु

प्रा. विजय यंगलवार

पाने : ६२ किंमत : ६० रू.

प्रकाशक : नचिकेत प्रकाशन

ISBN : 978-93-80232-32-4

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..