नवीन लेखन...

माझी ओमानची शैक्षणिक भेट

ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात नुकत्याच मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्‍यातील अनुभव लिहिलेले आहेत.

आखाती राष्ट्र म्हणजे तेलविहिरींचे आगर ! हे जरी खरे असले तरी ओमान देशाने तेलाव्यतिरिक्त अनेक वस्तू व सेवांच्या उत्पादनांचे जाळे उभे केलेले आहे. सुमारे सात दशकांच्या परकीय राजवटीनंतर ओमानमध्ये १९७० चे दशक म्हणजे प्रगतीचा मैलाचा दगड ठरलेला आहे. त्यानंतरच्या उण्यापुर्‍या चार दशकांतच या देशाने औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत तसेच नागरीकरणाची लक्षणीय झेप मारलेली दिसते. आजमितीस तेल हा घटक राष्ट्रीय उत्पन्नात ६० टक्के तर औद्योगिक उत्पादने, पर्यटनक्षेत्र, खाद्यपदार्थ व इतर सेवाक्षेत्रांचे ४० टक्के योगदान दिसून येते. या पाठीमागे ओमान देशाच्या राष्ट्रप्रमुखपदी असलेल्या सुलतान काबूस यांची दूरदृष्टी जशी महत्त्वाची ठरलेली आहे, तसेच गेल्या चार दशकांतील राजकीय व आर्थिक स्थैर्य, खासगी क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन, मानवसंसाधनाचे ओळखलेले महत्त्व आणि बदलत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीला साजेशी जागतिकीकरणाची मानसिकता हे घटक महत्त्वाचे आहेत.

सुलतान काबूस यांच्या कारकिर्दीत १९७५ पासून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून पद्धतशीरपणे विकासाची कास धरलेली दिसते. सुरुवातीच्या काळात जागतिक बाजारात तेलाच्या किमती प्रचंड वधारल्यामुळे या देशाला आर्थिक बळकटी लाभली. त्यानंतर ऊर्जाक्षेत्र, दळणवळणाची साधने, प्रचंड लांबी-रुंदीचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते, व्यापक पुलांची जोडणी, औद्योगिक वसाहतींची योजना, मुबलक व योग्य ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी समुद्रातून पाणी उपसून त्याचे वापरास योग्य रूपांतर करण्याची कारखानदारी, खासगीकरण म्हणजे खासगी क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन व त्याची राष्ट्रीय उत्पन्नातील योगदानाची दखल असे आर्थिक प्रगतीचे द्योतक ठरणारे विविध दाखले जागोजाग पहायला मिळाले. या देशाने आजपर्यंत पाच पंचवार्षिक आर्थिक योजना पूर्ण केलेल्या असून सध्या सहावी योजना चालू आहे. “ओमान २०२०” ही परिषद मस्तकमध्ये जून १९९५ मध्ये झाली आणि त्यातून देशाच्या विकासाची दिशाच ठरली. तेव्हापासूनच खनिजतेलाबरोबरच इतर औद्योगिक उत्पादनांकडे लक्ष केंद्रित करायला हवे, सेवाक्षेत्राचे जाळे उभारायला हवे ही दृष्टी विकसित केली गेली. ओमानने जागतिक बाजार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले असून बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार ध्येयधोरणे आखायला सुरुवात केलेली आहे. आखाती देशातील या राष्ट्राची यापुढील काळात खूप महत्त्वाची भूमिका अपेक्षित आहे.

खाजगीकरण म्हणजे खाजगी क्षेत्राचा विकास -:
खाजगीकरण म्हणजे सरकारचे अंग काढून घेण्याचे धोरण नव्हे तर, ओमानमध्ये राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये खाजगी क्षेत्र म्हणजे विकासाचे मुख्य ऊर्जाकेंद्र मानले गेले आहे. त्या दृष्टीने पंचवार्षिक योजनांमधून, विकासविषयक परिषदांमधून, बदललेल्या कायदेकानूंमधून आणि सुलतानांच्या प्रतिवर्षीच्या वर्धापनदिनाच्या भाषणांतून खाजगी क्षेत्राच्या योगदानांची नोंद घेतली जाते, त्याला प्रोत्साहन म्हणून बॅंका, विमा कंपन्या, वीजनिर्मिती व वितरण तसेच पर्यटनक्षेत्रातून खाजगीकरणाचे धोरण राबवले गेलेले आहे. याशिवाय दळणदळण, संपर्कसाधने तसेच शिक्षणक्षेत्रातही खाजगी क्षेत्राच्या पुढाकाराने विकासाची वाटचाल चालू आहे.

ओमान – गुंतवणुकीसाठी योग्य देश ! -:
१७०० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला हा देश परकीय गुंतवणुकीसाठी जणू खुणावतो आहे. सुलतानांच्या धोरणांनुसार विदेशी नागरीकांना तसेच उद्योग व्यवसायांना येथे गुंतवणुकीसाठी स्वातंत्र्य व मुभा आहे. सुमारे २५ लाखांच्या नागरी लोकसंख्येच्या या देशात संपन्नता असल्यामुळे व्यक्तिगत खरेदीक्षमता भरपूर आहे. नजीकच्या भविष्यकाळात इराक व येमेन या निकटच्या राष्ट्रांमधूनही बाजारपेठ वाढती होणार आहे. ओमानमध्ये सर्वसाधारणपणे राजकीय स्थैर्याबरोबरच खनिजतेल, सोने, कोळसा, तांबे इ. नैसर्गिक प्रचंड साठ्यांच्या खाणींमुळे उद्योग व्यवसायाची चलती राहणार आहे असे चित्र दिसते. अद्ययावत साधनसामग्री व उद्योगाला पोषक अशा पाच विविध ठिकाणी औद्योगिक वसाहतींचे जाळे पसरलेले आहे. त्यामध्ये रूसैल सोहारा, रायसत, निझवा, बुरैमी अशा पाच औद्योगिक वसाहतींमधून सुनियोजित उद्योगांचे जाळे योजलेले दिसते. तेथील सेवा-सुविधांचे (पाणी, जागाभाडे, विमा इ.) दरपत्रक तसेच विकास आराखड्यातील विवक्षित उद्योजकांचे विशिष्ट ठिकाण दाखवलेले आहे. याशिवाय खाजगी क्षेत्रातील उद्योगांसाठी विशिष्ट ठिकाण दाखवलेले आहे. याशिवाय खाजगी क्षेत्रातील उद्योजकांचे जाळे प्रामुख्याने मस्कत व दोफरजवळ पसरलेले आहे. नव्या सहस्त्रकाला सामोरे जातानाच अद्ययावत अशा कायदेकानूंचा संचही या राष्ट्राने अंगीकारलेला आहे.

ओमानमध्ये सर्व उद्योग व्यवसायांना वाणिज्य मंत्रालयाच्या अधिपत्याखाली चालणार्‍या ओमान चेंबर ऑफ कॉमर्सचे सभासदत्व स्वीकारणे व मार्गदर्शन बांधील आहे. मस्कतचा १९८९ मध्ये स्थापन झालेला शेअर बाजार अत्याधुनिक साधनसामग्रीने व कार्यपद्धतीने सुसज्ज आहेच परंतु त्याला जोडुन असणार्‍या डिपॉझिटरी, तसेच जागतिक शेअर बाजारांशी नाळ जोडणारी विचारप्रणाली पाहिली, म्हणजे या देशाच्या शेअर बाजारांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारकिर्दीची नांदी म्हणता येईल. याबरोबर खाजगी बॅंका, विमा कंपन्या यांच्या माध्यमांतून परकीय गुंतवणुकीला आकर्षक व पोषक वातावरणाची ग्वाही दिसून येते. याशिवाय खुल्या व मुक्त बाजाराच्या आर्थिक धोरणांचा अंगीकार, व्यक्तिगत आयकर नाही, तसेच विदेशी चलनांवरील निर्बंध नाही, उलट विदेशी गुंतवणूकदारांना पहिली पाच वर्षे करमाफी, आयात केलेल्या कच्च्या मालावरील करामध्ये माफी, सवलतीच्या दराने विदेशी गुंतवणूकदारांना औद्योगिक कर्जे, आखाती सहकार्य परिषदेमुळे (Gulf Co-operation Council) मुक्त व्यापार या व इतर अनेक सुविधा दिसून येतात.

ओमान देशाच्या दौर्‍यात तेथील वाणिज्य महाविद्यालयांना व सुलतान काबूस विद्यापीठाला भेटी देऊन तेथील उपक्रम पहाण्याची व विद्यार्थ्यांपुढे व्याख्यान देण्याची संधी मला मिळाली. तेथे खासगी महाविद्यालयांना महत्त्वाचे स्थान आहे. सोमानीकरणाच्या लाटेत तेथील तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला अनेक उपक्रम राबविता येतील व त्यामुळे परस्परांच्या शिक्षण पद्धती, आचार-विचार व संस्कृतीची देवाण-घेवाण होऊन उभय देशांचा भरपूर फायदा होईल.

ओमान चेंबरशी सहयोग -:
आपल्या देशातील चेंबर ऑफ कॉमर्स तसेच व्यापारी संघटनांनी ओमान चेंबरच्या माध्यमातून या देशाशी सहयोग जरूर साधावा. या देशातील व्यवसायांबरोबरच शिक्षणसंस्था, विद्यापीठे तसेच बॅंका व विमा कंपन्यांबरोबर मैत्री करार करावेत. आखाती देशातील खजूर व सुकामेवा उत्पादन तसेच मासेमारी या व्यवसायांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात करार करता येतील. नैसर्गिक साधनसंपन्नतेबरोबरच मानवी शक्तीचा विकास हे या राष्ट्राचे यापुढील काळात ध्येय असल्यामुळे प्रशिक्षित, कार्यकुशल नोकरशक्तीची येथे गरज आहे. विशेषत: ओमानीकरणाच्या लाटेत निव्वळ नोकरभरतीपेक्षा सक्षम नोकरभरती ही या देशाची गरज आहे. त्यासाठी कुशल प्रशिक्षकांचे आदानप्रदान तेथील नोकरदारांच्या समूहाचे भारतात विशेषत: महाराष्ट्रासारख्या भागात अभ्यास दौरे आयोजित करता येतील. जागतिक व्यापार संघटनेच्या सेवाक्षेत्राच्या संदर्भात अभिप्रेत असलेल्या चार मार्गांपैकी या प्रकारे एका मार्गाचा विकास आपल्या देशाला जागतिकीकरणाचा मोठा फायदा होऊ शकेल.

समारोप -:
ओमान हा देश गेल्या चार दशकांच्या अत्यल्प काळात खूप मोठी भरारी मारून विकासाची क्षितिजे गाठत आहे. या दौर्‍यांमध्ये शैक्षणिक प्रदर्शनांबरोबरच वाळवंटी प्रदेशातून प्रवास करताना, धार्मिक स्थळे, बॅंका, विमा कंपन्यांच्या टोलेजंग इमारती, तसेच विशाल समुद्रकिनारे मला पाहता आले. ओमानी भाषेत “येथील समुद्रकिनार्‍यांची रेती ज्यांच्या पायाला चिकटते त्यांचे (परदेशी पर्यटकांचे) या देशात पुन्हा पुन्हा स्वागत होते.” या उक्तीप्रमाणे भरगच्च माहितीची शिदोरी घेऊन परतलेला मी पुढच्या निमंत्रणांची प्रतीक्षा करतो आहे.

— डॉ. संजय कंदलगावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..