बर्याच दिवसांनी लिहीतोय.अश्विनी एकबोटे.अचानक आपल्यातुन निघुन गेल्यामुळे काही सुचतच न्हवतं.सैरभैर झाल होतं मन.गेल्या १५ वर्षांचा सहवास.एक अत्यंत गुणी अभिनेत्री व चांगली माणुस.पहिल्यांदा काम केल आम्ही ते एका वॉशिंग मशिनच्या जाहीरातीत.आणि तिथेच सुर जुळले.ते शेवटापर्यंत.पुण्यात घर.लहान मुलगा.सगळ कुटुंबच पुण्यात.मुंबईच माहित नाही.पण आली.दबकत दबकत.पहिली मालीका ” काना मागुन आली””डॉ.गिरीष ओकांच्या पत्नीची मुख्य भूमिका.मीच नाव सुचवल.आली व चक्क ८०० रु.पर डे वर काम सुरु केलं.मग मुंबईत रहायला घर नाही.विजयनगर सोसा.मग वनराई कॉलनीतल्या ४ जागा.सतत डोक्यावर संसार घेऊन फिरायचं.सतत पुणे मुंबई.महिन्यात्यातुन ७ ते ८ वेळा मुंबई पुणे.तेही रात्री १२ ची टु बाय टु एशियाड पकडुन जायची.तीचा मुलगा शुभंकर लहान होता.सगळा जीव तिचा त्याच्यात गुंतला होता.हिरकणी सारखी वेळ काळ कशाचीही पर्वा न करता पुण्याला पळायची.भोर ला सोनियाचा उंबराचं शुट चालायचं.पण ही कित्येक वेळेला रात्रीची ड्रायव्हींग करत पुण्याला जायची.त्यात पुण्यात चालु केलेला भरतनाट्यमचा क्लास.त्या विद्यार्थिनींमधे जीव गुंतलेला असायचा.त्यांना कधी फक्त विदयार्थीनी म्हणुन पाहीलच नाही.मुलींसारखं प्रेम करायची.नृत्या व्यतिरीक्त.माणुस घडवण्याचा प्रयत्न करायची.जे करेल ते मन लावुन सर्वस्व ओतुन.मग हळु हळु मुंबईतलं स्थान पक्क करत चालली.मग मारुती 800 घेतली.त्या आधी माझ्या स्कुटरवरुन जाताना पाऊस आला.पंक्चर झालं पडलो.असे अनेक प्रकार घडले.पण ते क्षण सुध्दा तक्रार न करता भरभरुन जगली.एक सळसळता नदिचा प्रवाह होता अश्वीनी.मी तीला सुंदर म्हटलं की “तुला दिसते रे वेड्या.” असं म्हणायची.आम्ही “मांदिआळी शब्द तालांची” कार्यक्रम सुरु केला त्याचे देश विदेशात प्रयोग केले.एकटीच नाचायची पण १० मुली नाचल्याचा आभास निर्माण करायची.दिवसभरातुन किमान १० फोन करायची.सतत चौकशी करायची.जी व्यक्ती तिला भेटायची ती तिच्या प्रेमात पडायची.हुशार.अभ्यासपूर्ण भुमिका करायची.मी ते करत नाही म्हणुन चिडायची.सिनेमा नाटक पाहिल्या नंतर त्याचं विच्छेदन सुंदर करायची.मग.” तु फक्त हो म्हण”, एका क्षणात”,”त्या तिघांची गोष्ट”,”नांदी”, ” नाच ग घुमा”,”कितीतरी चित्रपट ,पौराणीक सीडी्ज.ईतकं अप्रतिम काम करायची सगळे कौतुक करायचे पण पुरस्कार मात्र मिळाला नाही.मग लहान मुलासारख ऊदास व्हायची.पण तिने स्वतःच ह्यातुन स्वतःला बाहेर काढलं.ते सगळं पचवल.व ती आणखीनच प्रगल्भ झाली.नााचाचे कार्यक्रम शास्त्रीय नृत्याचे करायला मिळत नाहीत म्हणुन सतत खंत व्यक्त करायची.आणि आत्ता कुठे करीयरला छान आकार यायला लागला होता.पहिल्यांदाच महेश मांजरेकरांनी मिक्टाला बोलावलं किती खुष होती.एक लोकप्रीय अभिनेत्री म्हणुन नावारुपाला यायला लागली.नुकतीच जाण्यापुर्वी ८ दिवस होंडा सीटी घेतली.खुष होती.नविन नाटक मिळालं होतं.ज्यात मी नव्हतो त्याचा आनंद होता.कारण ऊगाचच लोक समज करुन घेतात.की ही शरद शिवाय काम करत नाही.तस काहीच नव्हतं.म्हणुन मला म्हणाली! की लोकांचा गैरसमज दूर होईल. तिचा मुलगा ह्याच क्षेत्रात करीयर करायला सिध्द झालाय.त्याचं करीयर व्हावं म्हणुन जीव तळमळाचा तीचा.त्याला कारण तीन ऊशिरा सुरु केलं होतं सगळं.पण नियतीच्या मनात वेगळच असतं.स्टेजवर नाचताना भैरवी रागावरचं गाणं चालु त्यावर तीचा नाच चालु.गाण संपलं नाचही संपला.व माझी जीवश्च मैत्रीणही संपली.तिलाच कळलं नाही.मला म्हणाली की नंतर लगेचच माझा प्रयोग होता तर पहिला अंक बघुन जाईन.पण तीच्या जिवनाचाच तिसरा अंक संपला होता.तिनं एक्झीट घेतली होती.रंगभुमी मालिका चित्रपट ह्या प्रत्येक ठिकाणी तिची ऊणीव नक्कीच जाणवणार.ती गेली आणि माझ्या हातात राहील्या फक्त सुंदर आठवणी.त्या खुपच सुंदर आहेत.पण तरीही ४४ हे जाण्याचं वय नाही.खुप काही करायचं होतं.सगळच अर्धवट राहीलं.पण शेवटी परमेश्वरापुढे कोणाचच काहीच चालत नाही.आपण फक्त बाहुल्या आहोत कठपुतळ्या.
– शरद पोंक्षे
Leave a Reply