मी दुसरी किंवा तिसरीत असताना (१९७२-७३ साली) झाडांविषयक काहीतरी उपक्रमासाठी केलेली ही एक कविता … पहिल्या दोन ओळी आता जिथे तिथे दिसतात मला आठवत
नाही की त्या मी सुचून लिहिल्या होत्या की त्या वाचूनच मला ही कविता सुचली होती ..
कावळा म्हणतो काव काव
माणसा माणसा झाडे लाव !
चिमणी म्हणते चिव-चिव
झाडांनाही असतो जीव !
राघू म्हणतो मिठू मिठू
झाडे लावत सुटू-सुटू !
घुट्टर्रघुम्म करतो पारवा
झाडांखाली मिळतो गारवा !
मियाओ मियाओ गातो मोर
झाडे तोडेल तो बदमाश-चोर !
टॉक-टॉक-टॉक-टॉक सुतार पक्षी ..
निळ्या आभाळाला हिरवी नक्षी !
वाघाची सांगे डरकाळी
झाडांना सगळ्या सांभाळी !
माकड म्हणते हुप हुप हुप
झाडे हवीत खूप खूप खूप !
(यानंतर अजून काही ओळी होत्या .. त्या बहुधा कुठे थांबायचं ते तेव्हा कळत नसल्याने होत्या .. त्या अश्या …)
झाडांखाली सावली असते
उन्हा-तान्हात विश्रांती मिळते
फांद्यात पाने, फळे-फुले पानांत
जरासे डोलतात आणि वारा देतात
मैत्री यांची प्राण्यांशी
गट्टी त्यांची पक्षांशी ..
झाडे दोस्त माणसांची
आपल्या सार्या दुनियेची !
जंगल वाढताच पडेल पाऊस
सुखी कायमचा होईल माणूस !
झाडे वाढवा, वाढवा जंगल
सार्या दुनियेचे त्यातच मंगल !
— प्रदीप वैद्य
Leave a Reply