एक आरमारप्रमुख होता. आपल्या आरमारातील सैनिकांनी साहसी असावे, आपली आज्ञा पाळताना कोणतेही संकटं आले तरी त्यांनी न डगमगता संकटावर मात करावी, असा त्याचा नेहमीच आग्रह असे. त्यामुळे कधी कधी तो आपल्या सैनिकांची परीक्षाही पाही. ही परीक्षा कधीकधी फार कठोरही वाटे.
एकदा तो जहाजावरून फिरत असताना त्याला एक सैनिक दिसला. आरमारप्रमुखाने ताबडतोब त्याला समुद्रात उडी मारायला सांगितले. मात्र त्या सैनिकाला उडी मारायला थोडासा वेळ लागला. ते पाहून संतप्त झालेल्या त्या आरमारप्रमुखाने त्या सैनिकाला त्याचा कोट काढण्यास सागितले. सैनिकाने कोट काढताच आरमारप्रमुखाने तो कोट समुद्रात भिरकावून दिला.
तेवढ्यात अचानक समुद्रात वादळ सुरू झाले मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाच त्या सैनिकाने त्या वादळातही समुद्रात उडी घेतली व लाटांवर तरंगत असलेला तो कोट घेऊन पुन्हा जहाजावर आला.
आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाही त्या सैनिकाने उडी मारली होती म्हणजे एका परीने त्याने आरमारप्रमुखाचा आज्ञाभंग केला होता. हा आरमारप्रमुख कठोर शिस्तीचा भोक्ता होता. हा आज्ञाभंग तो सहन करणार नाही, असे साऱ्यांनाच वाटले. त्यामुळे इतर सैनिकांना आता आरमारप्रमुख काय करतात याबाबत कमालीची उत्सुकता वाटत होती.
आरमारप्रमुखाला मात्र उडी मारणाऱ्या त्या सैनिकाचे आश्चर्य वाटले होते म्हणून त्याने त्याला विचारले, ‘ ‘मी नाही म्हणत असतानाही तू वादळात उडी मारण्याचे एवढे मोठे धाडस का केलेस?”
त्यावर तो सैनिक नम्रपणे म्हणाला, ” त्या कोटात माझ्या आईचा फोटो होता व मला जेव्हा जेव्हा आईची आठवण होते, तेव्हा तेव्हा मी तो फोटो पाहत असतो. ”
त्या सैनिकाची मातृभक्ती पाहून तो आरमारप्रमुखही चकित झाला व त्याने त्याला आज्ञाभंगाच्या मुख्यातून मुक्त केले.
Leave a Reply