रविवार: ३ मार्च २०१३
आमच्या देशातून नेलेल्या लुटीवर तुमची श्रीमंती, तुमचा माज पोसला जात आहे आणि तुम्ही आम्हालाच कोहिनूर आमचा आहे, भवानी तलवार आमची आहे, असे सुनावणार आणि आम्ही ते षंढपणे ऐकून घेणार! कुठल्याच नेत्याने, कुठल्याच वर्तमानपत्राने किंवा अन्य मीडियाने कॅमरून यांच्या या मुजोरपणाचा निषेध केलेला नाही. खरे तर जालियनवाला बागप्रकरणी माफी मागण्यास कॅमरून यांनी नकार देताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळायला हवी होती; परंतु आमचे दुर्दैव असे, की कुठे संतापून उठावे आणि कुठे संयम दाखवावा, हेच आम्हाला कळत नाही.
काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे प्रधानमंत्री कॅमरून इथे येऊन गेले होते. कशासाठी आले आणि त्यांच्या येण्याने आपले काय भले झाले, हे कुणालाच माहीत नाही; परंतु ज्या पद्धतीने स्वागत झाले आणि त्यांनी इथे येऊन जी मुजोरी दाखविली, ती मात्र चीड आणणारी आहे. भारतात आल्यावर हे कॅमरून महाशय जालियनवाला बागेला भेट द्यायला गेले. जालियनवाला बागेत त्यांच्याच पूर्वजांनी घडवून आणलेल्या हत्याकांडाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला; परंतु माफी मागितली नाही. या ब्रिटिशांची मुजोरी अजूनही कायम आहे. माफी मागायची नव्हती, तर ते तिथे गेलेच कशाला? त्यामागेही राजकारणच आहे. ब्रिटनमध्ये लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत. ब्रिटनमध्ये भारतीय आणि त्यातही पंजाबी लोकांची संख्या भरपूर आहे. आपण जालियनवाला बागेला भेट दिली, शोक व्यक्त केला, तर इथल्या भारतीय मतदारांची सहानुभूती आपल्याला मिळू शकते, असा साधा राजकीय हिशेब त्यांच्या या भेटीमागे होता. खरे तर जालियनवाला बाग हत्याकांड इतके भयंकर होते, की त्या नृशंस हत्याकांडाबद्दल ब्रिटनच्या महाराणीने भारतात येऊन तमाम भारतीयांची माफी मागायला हवी. शोक व्यक्त करणे आणि माफी मागणे यात खूप फरक आहे. शोक मानवीय भावनेतून व्यक्त होतो; परंतु माफी मागायची असेल, तर त्याला राजकीय स्वरूप येते. शोक व्यक्त करताना कुणाच्या समोर झुकण्याची गरज नसते, माफी मागताना मात्र कुणासमोर तरी झुकावे लागते, कुणीतरी आपल्याला माफ करावे, असे आर्जव करावे लागते. मुजोर ब्रिटिशांनी आजपर्यंत त्या पाशवी हत्याकांडाबद्दल माफी मागितलेली नाही, ती एवढ्याचसाठी की आजही जनरल डायरने केले ते चूक होते, हे मानायला ब्रिटिश तयार नाहीत किंवा चूक असले तरी, काळ्या भारतीयांसमोर गोर्या इंग्रजांनी का झुकावे, हा वंशविद्वेषी विचार त्यांच्या मनात येत असावा.
जालियनवाला बाग हत्याकांड १३ एप्रिल १९१९ रोजी घडले. जालियनवाला बाग हे एक चारही बाजूने बंदिस्त असलेले मोठे मैदान आहे. त्या मैदानात प्रवेश करण्यासाठी लहान-लहान दरवाजे होते; परंतु एक थोडा मोठा दरवाजा सोडला, तर बाकी सगळे बंदच होते. या दरवाज्यातून मैदानात प्रवेश करण्यापूर्वी एका चिंचोळ्या मार्गावरून जावे लागत होते. ब्रिटिशांच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी १३ एप्रिल १९१९ रोजी एक सभा तिथे आयोजित करण्यात आली होती. सभेला १५ ते २० हजारांची गर्दी जमली होती, त्यात पुरुष, स्त्रिया, मुले, म्हातारे असे सगळेच होते. सभा ठीक साडेचार वाजता सुरू झाली आणि जनरल डायर साडेपाचला तिथे पोहचला. त्याच्यासोबत ६५ गुरखा आणि २५ बलुची जवान होते. त्यापैकी ५० जवान शस्त्रसज्ज होते. मशीनगन बसविलेली दोन वाहनेसुद्धा त्याने बरोबर आणली होती; परंतु त्या चिंचोळ्या रस्त्यातून ती प्रवेशद्वारापर्यंत जाऊ शकत नसल्याने त्याला ती बाहेरच ठेवावी लागली. हे खरे तर तिथे जमलेल्या लोकांचे नशीबच म्हणायला हवे. त्या मशीनगन बागेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहचल्या असत्या, तर कदाचित तिथून एकही व्यक्ती जिवंत बाहेर पडू शकला नसता. तिथे पोहचताच डायरने आपल्या शस्त्रसज्ज सैनिकांना त्या एकमात्र मुख्य दरवाज्याव पोझिशन घेण्यास सांगितले आणि त्यानंतर सभेतील लोकांना कोणतीही सूचना किंवा इशारा न देता, त्यांना सभा विसर्जित करून निघून जाण्याची संधी न देता डायरने आपल्या बंदूकधारी सैनिकांना गोळीबाराचा आदेश दिला. सतत दहा मिनिटे गोळ्यांचा वर्षाव सुरू होता, शेवटी त्या सैनिकांकडील गोळ्या संपल्या, तेव्हाच गोळीबार थांबला. या दहा मिनिटांच्या काळात १,६५० गोळ्या झाडण्यात आल्या आणि जवळपास १५०० लोकांचा बळी घेण्यात आला. यावरूनच त्या हरामखोर लाचार पोलिसांनी जे भारतीयच होते आणि केवळ पोट भरण्याकरिता ब्रिटिशांची नोकरी करीत होते; आपल्याच देशबांधवांवरच नेम धरून गोळ्या झाडल्या, हे स्पष्ट होते. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी त्या मैदानात असलेल्या विहिरीत उड्या घेतल्या, त्यात 120 लोकांचा जीव गेला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली, त्यामुळे मैदानात पडलेल्या जखमी लोकांना उपचारासाठी नेता आले नाही, रात्रभर ते तिथे तसेच पडून राहिले आणि त्यात अनेकांचा बळी गेला. बेशिस्त भारतीयांना धडा शिकविण्यासाठी हे करणे आवश्यक होते, असे निर्लज्ज उद्गार त्यानंतर डायरने काढले आणि त्याचा वरिष्ठ अधिकारी असलेल्या ओडवायरनेही त्याची पाठ थोपटली. जनरल डायर त्यानंतर ब्रिटनला गेल्यावर त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले, तो हीरो झाला. आजही डायर चुकला, असे मानायला ब्रिटिश तयार होत नाहीत, त्यांची मुजोरी आजही कायम आहे आणि आपण त्याच ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांसाठी पायघड्या घालतो.
जगाचा इतिहास पाहिला, तर ब्रिटन आणि अमेरिकेने जितका हिंसाचार केला, रक्तपात घडवून आणला, तितका इतर कुणीही घडवून आणल्याचे दिसत नाही. निर्दोष लोकांच्या कत्तलीने, त्यांच्या रक्ताने यांचे हातच काय, संपूर्ण शरीर माखले आहे आणि हे हरामखोर नरेंद्र मोदींना दंगलीत कथित सहभाग असल्याचे सांगत व्हिसा नाकारण्याची मुजोरी करतात. गुजरात दंगलीच्या संदर्भात जितके खटले न्यायालयात सुरू आहेत त्यापैकी एकाही खटल्यात नरेंद्र मोदींवर आरोप नाही. मीडिया, केंद्रातील सरकार, त्या सरकारच्या हाताखाली राबणारी सीबीआय या सगळ्यांनी लाख प्रयत्न करूनही मोदी अडकले नाहीत, कारण मुळात या दंगलीत त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नव्हताच. गुजरातच्या दंगलीत मुसलमानांची हानी झाली म्हणून छाती पिटून रडणार्या, मानवतेच्या नावाने गळे काढणार्या या देशातील काही लोकांना आणि ब्रिटन, अमेरिकेतील नाकाने कांदे सोलणार्या राजकीय पंडितांना दिल्लीच्या शीखविरोधी दंगलीत कुणाचा हात होता, कोण रस्त्यावर उतरून दंगलखोरांना सक्रिय मार्गदर्शन करीत होते, हे कधीच दिसत नाही. शीखविरोधी दंगल मानवतेला कलंक आहे म्हणून काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला अमेरिका किंवा ब्रिटनने कधी व्हिसा नाकारला नाही. एखादे मोठे झाड कोसळल्यावर आजूबाजूची जमीन थोडी हादरतेच, असे म्हणत या हिंसाचाराचे अप्रत्यक्ष समर्थन करणार्या राजीव गांधींना कुणी कधी जाब विचारला नाही. आपल्या सोईनुसार दंगलीची आणि तथाकथित मानवाधिकाराची व्याख्या करणार्या या ब्रिटिशांना त्यांनी त्यांचे राज्य असताना भारतात मानवाधिकाराची किती जपणूक केली, हे विचारण्याचे धाडस कुणी दाखवत नाही, उलट मुजोर कॅमरून इथे येतो आणि कोहिनूर हिरा आमचाच असल्याचे आम्हालाच सुनावून जातो. या गोर्या भामट्यांनी भारतातून शेकडो जहाजांतून लुटून नेलेली सगळी संपत्ती भारतात परत आणली तर अगदी आजच्याच तारखेत हे ग्रेट ब्रिटन भिकेला लागेल; तसेही सध्या या मुजोर आणि शिष्ट लोकांची हालत फारशी चांगली नाहीच. आमच्या देशातून नेलेल्या लुटीवर तुमची श्रीमंती, तुमचा माज पोसला जात आहे आणि तुम्ही आम्हालाच कोहिनूर आमचा आहे, भवानी तलवार आमची आहे, असे सुनावणर आणि आम्ही ते षंढपणे ऐकून घेणार! कुठल्याच नेत्याने, कुठल्याच वर्तमानपत्राने किंवा अन्य मीडियाने कॅमरून यांच्या या मुजोरपणाचा निषेध केलेला नाही. खरे तर जालियनवाला बागप्रकरणी माफी मागण्यास कॅमरून यांनी नकार देताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळायला हवी होती; परंतु आमचे दुर्दैव असे, की कुठे संतापून उठावे आणि कुठे संयम दाखवावा, हेच आम्हाला कळत नाही.
याच संदर्भात एक प्रश्न विचारावासा वाटतो, की दिल्लीत एका तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर पेटून उठणारी दिल्लीतील तरुणाई, ज्या तरुणाईचे मीडियाने प्रचंड गोडवे गायले ती कॅमरून यांच्या मुजोरपणावर गप्प का बसली? कॅमरून यांचा विषय जाऊ द्या, दिल्लीची तरुणाई केवळ बलात्कारासारख्या घृणित अपराधाबद्दल संवेदनशील आहे, असे मानले, तर इकडे भंडार्यात तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर पाशवी बलात्कार आणि १५ दिवस लोटूनही कुण्याच गुन्हेगाराला सरकारची हात लावायची हिंमत होत नाही; अनैसर्गिक बलात्कार करून त्यांची नंतर हत्या केली जाते आणि दिल्लीच्या रस्त्यावर एक साधे विरोधाचे पोस्टरही झळकत नाही, याला काय म्हणावे? बलात्काराला बळी पडणार्या पीडितेची जात, तिचा धर्म वगैरे पाहून निषेध किती तीव्र असावा, हे हा समाज ठरविणार असेल, तर आपल्या मारेकर्यांचे पायघड्या घालून स्वागत करणे, हेच या समाजाचे प्राक्तन आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
जुने प्रहार वाचण्याकरिता:फेसबुकवर प्रकाश पोहरे टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: prakash.pgp@gmail.com
Mobile No. ९१-९८२२५९३९२१
— प्रकाश पोहरे
Leave a Reply