गोव्याने अनेक दिगग्ज कलाकार रंगभूमीला दिले आहेत दुर्दैवाने इथे व्यावसायिक रंगभूमीला पोषक वातावरण नसल्याने अनेकांनी महाराष्ट्राची विशेषतः मुंबईची वाट धरली.
आपल्या कर्तृत्वाने तिथे आपले स्थान निर्माण केले असलेले एक म्हणजे मा दत्ताराम. ज्यांच्या नावाने नाट्य महोत्सव गोव्यात साजरा होत आहे. नव्या पिढीला त्याचे नाव कानावरून गेलेले असले तरी त्यांचे नेमके कर्तृत्त्व काय होते ? ह्याची कल्पना असेलच असे नाही. माझ्यासारख्या अनेक नाट्य रसिकांना त्यांचा अभिनय कधी बघायला मिळाला नव्हता पण त्यांनी वठविलेल्या भूमिका कायम रसिकांच्या समरणात राहिल्या आहेत असे जाणकार सांगतात. आपल्या तरुणपणी ते गावात म्हणजे वळविला नाटके जरूर करत पण त्यांना नट म्हणून खऱ्या अर्थाने घडविले ते त्यांचे मित्र मार्गदर्शक विष्णुपंत बोरकर ह्यांनी. हे बोरकर त्या काळी वेळवईला नाटके करत त्यांनीच दत्तारामना रंगभूमीवरची दिशा दाखविली ह्याच गावात मास्तर गंगाराम म्हणूनही अभिनेता नावारूपाला आले होते. दत्ताराम त्यांना पित्यासारखा मान द्यायचे. ह्या मा दत्ताराम ह्यांच्या स्मृतीची आठवण म्हणून एक नाट्यमहोत्सव जो २५ वर्ष सुरु आहे त्याची सांगता झाली. आयोजकांचा हा प्रयत्न खरोखरच अभिनन्दनीय होय.
वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी घर गांव सोडले ते रंगभूमीच्या प्रेमाने त्यांना ललितप्रभा कम्पनीच्या कुंजविहारी ह्या नाटकात लन्गड्या पेंद्याची भूमिका साकारायला मिळाली त्या नन्तर शारदा, प्रभात ह्या कम्पन्यांच्या नाटकातही त्यांनी भूमिका केल्या.
विशेष म्हणजे १० जूनला त्यांचा जन्म झाला व १२ जून १९८४ ह्या दिवशी त्यांचे निधन झाले.
ते जुन्या पद्धतीच्या अभिनयाचे शिष्य होते पण त्यांनी आधुनिक शैलीही आत्मसात केली रक्त नको मज प्रेम हवे या नाटकात ह्या शैलीचा प्रत्यय आला. पुढे कौंतेय वैजयंती मध्येही त्याने हा कित्ता गिरविला. गोव्यातील सखाराम बर्वे पासून पुरुषोत्तम दारव्हेकर , केशवराव दाते पासून चिंतामणराव कोळतकर अशा दिग्ग्ज दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला अभिनय केला होता. वळवई गोवा सोडून ते मुंबईला आले. विशेष म्हणजे अनेकदा त्यांना बदली भूमिका कराव्या लागायच्या व त्यांनी निष्ठेने केल्या आहेत.
त्यांची एक पद्धत होती ते नेहमी थंड पाण्याची आंघोळ करत व ती करताना आपली भूमिका असलेल्या नाटकाचे संवाद जोरजोरात बोलत . विशेष म्हणजे ते जिथे राहत तिथल्या मंडळाचा नळ देखील त्यांच्यासाठी रक्षित असायचा. ते आंघोळ करून गेले कि मग इतरजण तो वापरत!
इथली नाटके पाहून त्यांना साहित्यसंघाचे आमंत्रण आले. त्यांच्यातर्फे त्यांनी कौंतेय दुसरा पेशवा , भाऊबंदकी राजकुमार आदी नाटके केली त्यावेळी त्यांना नटवर्य नानासाहेब फाटक दुर्गा खोटे मामा पेंडसे ह्यांच्या बरोबर काम करायचा अनुभव मिळाला आणि ते करताना त्यांना नटवर्य हे मनाचे बिरुद मिळविले.
पुढे ललितकलादर्श च्या दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, पडछाया या नाटकातील त्यांचा भूमिका गाजल्या पण सर्वांच्या आठवणीत राहिला त्यांचा मत्स्यगन्धातील देवव्रत म्हणजे भीष्म !
त्यांनी रंगभूमीला एक व्रत म्हणून पहिले. एका व्यसनी नटाला त्यांच्या शब्दामुळे नाटकातून बाहेर जावे लागले. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी अनेक समस्यांना तोंड दिले पण रंगभूमीवरची त्यांची निष्ठा तसूभरही कमी झाली नाही. गोव्यात जन्मलेले, मुंबईत त्यांनी रंगभूमी गाजविली व पुढे वसईत स्थायिक झाल. त्यांच्या अभिनय ह्या बंगल्यातच त्यांनी ७२ व्या वर्षी प्राण सोडला. वासी ह्या त्यांच्या गावात मास्टर दत्ताराम रंगमंच आहे.
एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकाच्या भूमिका त्यांनी लीलया सादर केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट म्हटले आहे कि रसिकांना तृप्त करायचे कार्य माझ्याकडून होत राहो.
त्यांनी अनेकदा दुय्य्म प्रकारच्या भूमिका केल्या पण त्या संचाच्या गरजेपोटी. एकदा ते नाट्य प्रयोग बघायला आले होते त्यावेळी त्यांना एक नट न आल्याने त्यांनाच त्याची भूमिका करावी लागली. ते मुलाखतीत सांगतात कि जर तो नाट्यप्रयोग रद्द झाला असता तर त्यात भाग घेणाऱ्या कलाकारांचा मेहनताना बुडाला असता. स्वा सावरकरांनी सुद्धा त्यांचा गौरव केला होता.
एकदा का चेहऱ्याला रंग चढला कि ते त्या भूमिकेत शिरायचे, त्या रंगमंचाचे वातावरण जणू त्यांचा कायापालट करत. त्या नन्तर ते कधी रसिकांच्या मनावर अधिराज्य करत हे कुणालाच कळत नसे. म्हणून तर त्यांना अनेकांनी गौरविले आहे. अर्थात तो बावनकशी अभिनय आम्ही काही बघितला नाही तो करंटेपणा म्हणायला हवा. कुठलेही अभिनयाचे शिक्षण आपल्यापाशी नसताना त्यांनी उत्तम अभिनय केला. आपल्या भूमिका अजरामर केल्या त्याला तोड नाही . बापूजवळ उपजत प्रचंड निरीक्षण शक्ती आकलनशक्ती नैसर्गिक जाणिवा होत्या.
आपल्या मुलाखतीत ते सांगतात कि मला परमेश्वर कृपेने भरपूर काही मिळाले आहे. जीवनाबद्दल कसलीच तक्रार नाही. सर्वानी मला चांगले वागविले माझ्यावर लोकांनी खुप प्रेम केले. पोटासाठी हा व्यवसाय मी पत्करला. व्यवसाय प्रामाणिकपणे करायचा हि शिकवण मला बालपणीच मिळाली मी ती आयुष्यभर विसरलो नाही त्याचे उत्तम फळ मला मिळाले. मी पूर्ण समाधानी आहे. अशा ह्या समाधानी कर्तृत्ववान बापुना सलाम.
– प्रा रामदास केळकर
Leave a Reply