17 ऑगस्ट 2002 या दिवशी महिला क्रिकेटमधील एका डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम एका भारतीय फलंदाजाच्या नावे झाला. 1982मध्ये राजस्थानमधील जोधपूर शहरात जन्माला आलेल्या ‘त्या’ बालिकेने वयाच्या विसाव्या वर्षी टॉन्टन काऊन्टी ग्राऊंडवर इंग्लिश महिलांच्या संघाविरुद्ध 407 चेंडूंमध्ये 214 धावा काढल्या. त्यात 19 चौकार होते आणि 10 तासाला केवळ दोन मिनिटे कमी एवढा वेळ तिचे मैदानावर ‘राज’ होते. कॅरेन रॉल्टनचा नाबाद 209 धावांचा विक्रम तिने मोडला. मिथाली राजचा हा केवळ तिसरा कसोटी सामना होता. दोन वर्षांनंतर पाकिस्तानच्या किरण बलुचने वेस्ट इंडीजविरुद्ध कराचीत 242 धावांचा डाव रचत हा मिथालीचा विक्रम मागे टाकला.
तुफान वेगाने कंदुकफेक करणारांची पलटणच्या पलटण असूनही एका कॅरिबिअन गोलंदाजाने एका कसोटी सामन्यात घेतलेले सर्वाधिक बळी आहेत 14 एवढेच. हे एका वेगवान गोलंदाजाने घेतले आहेत आणि म्हणूनच ते खास उल्लेखनीय आहेत. (नव्या दमाचा प्रवीण कुमारही सहाव्या षटकात धपापू लागतो हे कालच्या सामन्यात अनेकांनी पाहिले असेल.) केनिंग्टन ओवलवर झालेल्या मालिकेतील पाचव्या सामन्यात (सन 1976) मायकल होल्डिंगने पहिल्या डावात 33 षटकांत 92 धावा मोजून तब्बल आठ इंग्रज टिपले होते. दुसर्या डावात त्याने 2-चेंडू-कमी-21-षटकांमध्ये अवघ्या 57 धावा मोजत अर्धा डझन फिरंग्यांना डावावर पाणी सोडावयास लावले. सामना वेस्ट इंडीजने जिंकला आणि 3-0ने मालिकाही. ’वेस्ट इंडीजची अवस्था दीनवाणी होईल’ अशी दर्पोक्ती मालिकेआधी करणार्या कर्णधार टोनी ग्रेगला होल्डिंगने दोन्ही डावांमध्ये त्रिफळाबाद केले. चेंडू प्रचंड वेगाने फलंदाजाकडे येत असले तरी होल्डिंग संथपणे आणि शांतपणे धावत येऊन चेंडूफेक करीत असे – या सवयीवरून त्याला टोपणनाव मिळाले ‘कुजबुजणारा मृत्यू!’
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply