विज्या मी येतोय 5 सप्टेंबरला, या वेळेला जय्यत तयारी करशील, 10 दिवस रेलचेल राहिली पाहिजे, साल्या कुठेही काही कमी पडले असे व्हायला नको म्हणून हि आगाऊ सूचना.
च्यायला, इकडे येण्यासाठी जीव कासावीस होत असतो, वर्षातील 355 दिवस मी कसे काढतो, माझे मलाच ठाऊक. बेचव, रटाळ या शिवाय दुसरे कुठलेच शब्द इकडच्या जीवनाला योग्य नाहीत. आमच्या जगात वर्षभर फार फार तर पंचवीस तीस लोकांचा सहवास, इथे मात्र 10 दिवस लोकांची मला भेटण्यासाठी नुसती झुंबड लागलेली असते. मज्जा म्हणजे काय ते फक्त या 10 दिवसात मला अनुभवायला मिळते.
सर्वात महत्वाचे आमचे पिताश्री, व माय या दिवसात माझ्याकडे ढुंकूनही पहात नाहीत! काय पाहणार, जे दरवर्षी चालते तेच या वर्षी पण होणार.
या वर्षी किती हप्ता गोळा केलास?, त्याची आकडेवारी दे, त्यात कट मारलेला मला चालणार नाही, धमकी वजा सूचना आली. मी कोणताच हिशोब कधीच दिला नाही, तरी याला कसे माझे कटींग किती आहे हे समजले ! आमच्या सानिध्यात राहून भलताच बेरकी झाला आहे. आता विचार करावाच लागेल, पार्टी बदलायचा, लवकरच याला बदलून नवीन कुणाची वर्णी लाऊन त्याच्या जीवावर मौज करायची, असा विचार मनात आला. याला डोईजड बनवून चालणार नाही, कारण आम्ही एकतर याच्या येण्याच्या आधी महिनाभर वसुलीला लागतो, त्यासाठी धमक्या द्याव्या लागतात, वेळ प्रसंगी जे शानपट्टी करतात त्यांना हाडांवर नंबर टाकून ठेवा, डाक्टरला जोडताना त्रास नको, असा पंटर मार्फत निरोप द्यावा लागतो, इतके करून बाचाबाची ( बा चा व बा ची) होतेच. हिशोब मागणे, हे मात्र जरा अतीच झाले.
या वर्षी स्वारी जरा, जास्तच रंगात आली असे दिसते, चक्क म्हणाला, या वेळेस मी सर्व म्हणजे सर्व कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणार आहे. तुम्ही लोक माझ्या नावावर वसुली करता, मज्जा करता, मी काय नुसते पहात राहू?
पूर्ण दहादिवस मी तुमच्यातील एक म्हणून राहणार आहे, जो गल्ला इथे गोळा होईल, त्यावर माझी करडी नजर राहील. दररोज रात्री समोरचा पडदा पडला की, स्टेज मागे आपली बैठक झालीच पाहिजे. या वेळेस ब्रँड चांगले हवेत, घेतल्यानंतर वास नको म्हणून भरपूर अगरबत्या लाऊन ठेवा. भाविकांचा प्रसाद मी चकणा म्हणून खाणार नाही, सांगून ठेवतो. काजू, बदाम, पिस्ता, जर्दाळू, हेच पाहिजेत, नाहीतर आणाल मसाला शेंगदाणे, बटाटा चिप्स, आणि फारसाण.
या वर्षी पत्त्यांचे डाव मांडायचेच, मागीलवर्षी पैशावरून बराच वाद झाला, तसा या वर्षी होणार नाही याची दक्षता घे. रमी, तीनपत्ती, झालीच पाहिजे, मी यात सामील होणार नाही, कारण सर्व डाव मीच जिंकणार हे त्रिवार सत्य आहे, आणि काय सांगावे, तुमचा तो पप्या, बाल्या, बंटी, दादा लोक माझ्या पोटाला चाकू लाऊन शेवटच्या दिवशी मी मिळवलेले सर्व घेऊन पसार होतील. बाकी तुमचे हे चलन आमच्या राज्यात चालत नाही, आणि बदलून पण मिळत नाही, त्यामुळे तुमचा तमाशा पाहण्याचाच मी आनंद घेतो.
यावर्षी मला निरोप देताना कोणती गाणी लावणार, जरा यादी देशील, डीजे जोरदार झाला पाहिजे सांगून ठेवतो, आर्ची परश्या ला बोलावशील, सैराटचा धुडगूस केलास तर गर्दी वाढेल, वसुलीतील सर्व अडका इथेच खर्च होउदे, नाहीतर त्या साक्षी- सिंधू सारख्याचे पोस्टर लाऊन बेरंग करशील. भाजनांचा, किर्तनांचा तर मला अगदी वीट आला आहे. वाजले कि बारा, चोली के पीछे, चुम्मा दे अशी गाणीच लावायची.
आणि काय रे तुझ्या डोक्यात नसते विचार येऊ लागले आहेत, पोरीबाळी साठी वेगळ्या रांगा म्हणे, अरे येड्या, पोर उनाड असतातच, जरा मुलींची छेड काढली, गर्दीचा फायदा घेऊन, त्यांना हात लावला तर इतकं मनावर घ्यायचे नसते. अचकट विचकट हाव भाव करू देत, काही फरक पडत नाही, जरा नशापाणी केल्यावर असं होतेच, आदर्शवाद मी गेल्यानंतर.
स्वच्छ पाण्याची मला ऍलर्जी आहे, दर वर्षी तुम्ही लोक मला गटारी सारख्या निर्मळ पाण्यात बुडवता, आता त्याचीच सवय झाली आहे. पर्यावरण वाद्यांचा आयचा घो, खूप माजले आहेत, प्रत्येक सणात काहीतरी दोष काढतातच, म्हणे मला पाण्यात बुडवल्याने मासे मरतात, अरे या विश्वाचा कर्ता करविता मीच आहे, दहा पंधरा हजार मासे मेले तर काय मोठा फरक पडणार आहे? तुम्ही सर्व कायदे झुगारून मला तलावात, नदीत, समुद्रात टाकाच.
दुसऱ्या दिवशी मी हात पाय मोडलेल्या, तुटलेल्या अवस्थेत तीरावर, पडलेला दिसणार आहे, असुदे. सफाई कामगार मग माझे तुकडे त्यांच्या कचऱ्याच्या गाडीत भरून, घेऊन जातील, आणि गावाच्या बाहेर फेकतील. तसेही आपला धर्म सांगतोच, आत्मा गेल्यावर शरीर नश्वर आहेच, ते नष्ट करायलाच पाहिजे. पण थोडा हा पण विचार करा, तुम्हालाही मेल्यानंतर असेच कचऱ्यात टाकून दिलेले आवडेल का? कुत्री, मांजरे तुमच्या देहाचे लचके तोडतील तर तुमच्या घरच्यांना त्याचे काही दुःख होणार नाही, असे मी समजायचे का? माझी जी अवस्था तुम्ही करताय, तशीच तुमची नको का व्हायला?
माझ्या उंचीवर बंधने आणणारे, उपदेश देणारे यांना मात्र उलटे टांगून मिरचीची धुरी द्या, या वर्षी माझी उंची किमान 30 फूट असली पाहिजे, आणि हो, वीज आकडा टाकून घ्यायची, वर्गणीतील पैशाने विजेचे बिल भरशील तर मी मुळीच खपवून घेणार नाही.
तो लोकमान्य उर्फ केशव (बाळ) गंगाधर टिळक, त्याचा तिकडे गेल्यावर चांगलाच समाचार घेतो, लोकांना उगीचच आदर्शवाद, देशाभिमान, सुसंस्कृत, असले सुतकी विचार सुचवण्याचा, तसेच त्यांना सुधरवण्याचे, त्यांचे दुःसाहस यासाठी त्यांना चांगला धडा शिकवतो.
— विजय लिमये
(9326040204)
Leave a Reply