स्तनामधे येणारी गाठ हाताला लागेपर्यंत, परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते ! म्हणजेच ती गाठ जर का कॅन्सरची असेल तर कदाचित ऑपरेशन करुनसुद्धा रुग्णाला काहीही फायदा होणार नाही. कारण ती पसरली जाते आणि म्हणूनच स्तनाचा कॅन्सर हाताला लागेपर्यंत थांबून रहाणे योग्य नव्हे. ३५ वर्षे वयानंतर प्रत्येक स्त्रीने मॅमोग्राफी हा तपास दरवर्षी करणे गरजेचे आहे. ह्या तपासात छोट्यात छोट्या कॅन्सरचे निदान होते.
मॅमोग्राफीमध्ये दोन्ही स्तनांचा दोन अॅंगल्समध्ये फोटो घेतला जातो. हा अतिशय स्पष्ट व अतिसूक्ष्म एक्स-रे च असतो व या मशिनची ट्यूब स्पेशल असल्याने क्ष-किरणांची मारक शक्ती कमीत कमी केलेली असते. त्यामुळे दरवर्षी मॅमोग्राफी केली तरीही काहीही धोका नाही.
या तपासात १ सें.मी. पेक्षाही छोटी गाठ त्या गाठीतील मुख्यत्वे कॅल्शिअम डिपॉझिशन पॅटर्नप्रमाणे पकडली जाते किंवा एखादी संशयास्पद गाठ जर पुढील वर्षे परत केलेल्या मॅमोग्राफीवर थोडी बदललेली दिसली तरीही सावधानता बाळगता येते व त्या गाठीची त्वरीत स्टिरीओटॅक्सी बायॉप्सी करुन ऑपरेशनने काढून टाकून ती नक्की कसली आहे हे समजते.
याचा मुख्य फायदा म्हणजे जर कॅन्सर असेल तर तो सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येतो. कॅन्सर नसला तर चांगलेच. दुसरा फायदा हा की कॅन्सर वाढला तर संपूर्ण ब्रेस्ट (स्तन) काढून टाकण्याची वेळ येते. ती वेळ लवकर निदान झाल्यावर येत नाही. लहान स्त्रियांमधील स्तन घनदाट दिसतात म्हणून त्यांच्या स्तनांमधील अधिक माहितीसाठी मॅमोसोनोग्राफी देखील केली जाते तसेच ४० वर्षांनंतर जरी फॅट डिपॉझिशनने स्तन विरळ झाले असले तरीही काही मोठ्या गाठींची अधिक माहिती मिळवण्याकरता मॅमोसोनोग्राफी केली जाते. मॅमोग्राफीला साधारण एक हजार रुपये तर स्टिरीओ टॅक्सी बायॉप्सीला दीड हजार रुपये खर्च येतो.
— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे
Leave a Reply