भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश “मेंढ्याचा गणपती” म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहेत. महर्षी भृशुंडीऋषींचा आश्रम या परिसरात होता. त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ते स्वत:च गणपतीरुप झाले ती ही मूर्ती असे या गणपतीबाबत सांगितले जाते. गणपतीचे हे मंदिर काही काळ पूर्णपणे दूर्लक्षित होते. एखाद्या कॉलनीतले हनुमान मंदिर असावे तेवढेच आणि तसच हे मंदिर होते. पण या गणपतीचे महत्व लक्षात येऊन भक्तांनीं आता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केले आहे.
नागपूरपासून ६१ किमी अंतरावर नागपूर, कलकत्ता राष्ट्रीय मार्गावर भंडारा हे जिल्ह्याचं ठिकाण असून तेथून पूर्वेला भंडारा तुमसर रस्त्यावर अंदाजे ३० किमी अंतरावर मेंढा नावाचं प्राचीन गाव आहे. इथं एका घुमटीत गणेश प्रतिमा असून प्रथमदर्शनी ती थोडी चमत्कारीक वाटते. मानवाच्या मुखाप्रमाणे असलेली ही प्रतिमा आठ फूट उंच आणि चार फूट रूंद आहे. इ.स.पूर्व ११ व्या शतकात प्रज्ञावान भृशुंड ऋषींनी या गणेशाची स्थापना केली होती. शेंदूर लेपून केलेली ही चतुर्भुज मूर्ती रक्ताश्मावर कोरलेली असून उंदरावर आरूढ झालेली आहे. या गणपतीनं उजवा पाय खाली सोडलेला असून डाव्या पायाची मांडी घातलेली आहे. तिच्या एका हातात अंकुश, दुसर्या हातात पाश, तिसर्या हातात मोदक आणि चौथा हात आशीर्वादाचा आहे. नागसंस्कृतीचं वैशिष्ट्य असणारा पाच फण्यांचा नाग या गणेशाच्या डोक्यावर आहे. ऋषीस्वरूप या मूतीर्ला दाढीमिशाही आहेत. डाव्या हातातील मोदकाकडे वळलेल्या सोंडेची ही भव्यदिव्य मूर्ती अतिशय आकर्षक वाटते.
गणपतीच्या मूर्तीसमोर शिवलिंग व नंदी आहे. जवळच गोसावींच्या समाधी आहेत. या देवस्थानाची व्यवस्था गोविंदगिरी बुवांच्या पिढीपासून गोसावी परिवाराकडेच आहे. विश्वास गणपतराव जोशी सध्या देवस्थानाचे अध्यक्ष असून १० ते ११ वर्षांपूर्वीच ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. देवळाच्या बाहेर हनुमानाचं मंदिर आहे. येथून अंदाजे दोन किमी अंतरावर पूर्वेला असलेल्या पवित्र वैनगंगा नदीच्या काठावर आंभोरा, पवनी, कोरंभी आदी तीर्थक्षेत्रं आहेत. दरवर्षी माघ चतुर्थीला होणार्या इथल्या यात्रेला विदर्भातील अनेक गणेशभक्त गर्दी करतात.
।। ॐ गं गणपतये नम: ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply